प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणार्‍यावर कारवाई; २ टन किलो प्लास्टिकचा माल जप्त

प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणार्‍यांवर कारवाई

नवी मुंबई, २६ डिसेंबर (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा विभाग, तसेच तुर्भे विभाग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तुर्भे (ए.पी.एम्.सी.) येथे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.

तुर्भे ए.पी.एम्.सी. मार्केटच्या बाहेरील परिसरात व्यापारी इमारती आहेत. या इमारतीमध्ये मसाले, अन्नधान्य, सुका मेवा, गृहोपयोगी वस्तू, स्टेशनरी साहित्य, बांधणीचे साहित्य यांची दुकाने आहेत. माथाडी भवन ते जलाराम मार्केट यांच्यापर्यंत या दुकानांची रांग आहे. यातली काही दुकानांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा सर्रासपणे वापर आणि विक्री करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वर्षाचे ३६५ दिवस येथे प्रतिबंधित प्लास्टिक विकले जात आहे.

याचाच एक भाग म्हणून ए.पी.एम्.सी.मधील सेक्टर १९ येथील एकूण ६ दुकानदारांवर कारवाई करून एकूण २ टन किलो प्लास्टिकचा माल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून एकूण रक्कम ५० सहस्र रुपये दांडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्यामध्ये दोन व्यावसायिकांकडे पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्याने यांच्याकडून प्रत्येकी ५ सहस्र रुपये, तर अन्य काही जणांकडून १० सहस्र रुपये दांडात्मक रक्कम वसूल करण्यात आले.

संपादकीय भूमिका

केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून प्रतिबंधित प्लास्टिक बंदीच्या मोहिमा राबवण्याचे आदेश आले की, जागे झालेले पालिका प्रशासन तेवढ्यापुरती वर्षातील २ मास कारवाई करते !