पाकचा ‘लिट्टे’ला पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न उधळला !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून ९ जणांना अटक

नवी देहली – श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम्’ (लिट्टे) या संघटनेला तेथील सैन्याने कारवाई करत काही वर्षांपूर्वी नष्ट केले; मात्र आता या संघटनेला पुनर्जिवित करून अमली पदार्थ आणि शस्त्र यांचा पुरवठा करण्यासाठी पाकिस्तान वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. तमिळनाडूत लिट्टेला जिवंत करत आहे’, अशी माहिती ‘द आयलंड’ या वृत्तसंकेतस्थळाने दिली आहे. यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) ९ जणांना अमली पदार्थ आणि शस्त्रे यांच्यासहित अटक केली आहे. श्रीलंकेतील अमली पदार्थ माफिया गुनाशेखरन् आणि पुष्पराजा हे पाकमधील एका अमली पदार्थ आणि शस्त्र पुरवठादार यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.

१. भारताच्या गुप्तहेर संस्थेच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, फेब्रवारीतही लिट्टेला तमिळ राष्ट्रवादाशी जोडून जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याची माहिती मिळाल्यावर ग्रामीण भागातील काही जणांवर लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अन्वेषणातून युरोपमधून काही जण लिट्टेला आर्थिक साहाय्य करण्यासाठी पैसे गोळा करण्याच्या प्रयत्नात होते. हे सर्वजण एका अशासकीय संस्थेच्या संपर्कात होते. ते त्यांच्या माध्यमातून तमिळ राष्ट्रवादावर ऑनलाईन संमेलन आयोजित करण्याचा प्रयत्न करत होते. चेन्नई विमानतळावर मेरी फ्रान्सिस्का नामक एका श्रीलंकेच्या महिलेला अटक केल्यानंतर हे उघड झाले.

२. यापूर्वी वर्ष २०१४ मध्येही पाकने लिट्टेला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोलंबो स्थित पाकच्या उच्चायुक्ताकडून एक टोळी चालवण्यात येत होती. या टोळीच्या माध्यमातून भारतात विविध ठिकाणी घातपात घडवण्याचा पाकचा कट होता.

३. ‘लिट्टे’ ही श्रीलंकेपासून एक वेगळ्या आणि स्वतंत्र तमिळ देशासाठी आंदोलन करणारी संघटना होती. या मागणीसाठी हळूहळू या संघटनेने आंदोलन अत्यंत हिंसक झालेे. त्यात सहस्रो जणांचा बळी गेला. के. प्रभाकरन् या संघटनेचा प्रमुख होता. त्याला श्रीलंकेच्या सैन्याने ठार केले.

संपादकीय भूमिका

  • श्रीलंकेतील ‘लिट्टे’ला उर्जितावस्था देऊन त्याचा वापर भारतविरोधी कारवाया करण्याचा पाकचा कट आहे. पाकलाच नष्ट केल्यावर भारतातील बर्‍याच समस्या संपुष्टात येतील, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे !