वादग्रस्त ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात श्रीरामपूर न्यायालयात दावा प्रविष्ट !

न्यायालयाने ‘यशराज प्रॉडक्शन’ला ‘कारणे दाखवा’ नोटीस

श्रीरामपूर (जिल्हा नगर) – अभिनेते शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी पठाण या वादग्रस्त चित्रपटाच्या विरोधात श्रीरामपूर येथील न्यायालयात सुरेश पाटील यांनी दावा प्रविष्ट केला आहे. एखाद्या चित्रपटाचे विज्ञापन करतांना केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाकडून (‘सेन्सॉर बोर्डा’कडून) मिळालेले ‘सर्वांना पहाण्यासाठी / केवळ प्रौढांसाठी’ (यु/ए) प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक असते; मात्र पठाण चित्रपटाचा संक्षिप्त भाग (टिझर) आणि ‘बेशरम रंग’ हे गाणे दाखवतांना हे प्रमाणपत्र दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे या चित्रपटाचे कोणत्याही सामाजिक माध्यमावर ‘टिझर’, ‘ट्रेलर’, गाणे, दृश्य, विज्ञापने, होर्डिंग, पोस्टर ‘यु/ए’ प्रमाणपत्र असल्याविना प्रसिद्ध करू नये, यासाठी हा दावा प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने ‘यशराज प्रॉडक्शन’ यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली आहे.