चीनमध्ये कोरोनाबाधितांना रस्त्यावर खांबांना दोरी बांधून दिले जात आहे सलाईन !

रुग्णालयांतील खाटांच्या कमतरतेचा परिणाम !

चीनमधील कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिति !

बीजिंग (चीन) – चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीविषयी ‘ब्लूमबर्ग’ या अमेरिकेतील वृत्तवाहिनीने चीनच्या ‘राष्ट्रीय आरोग्य आयोगा’चा संदर्भ देत म्हटले आहे की, २० डिसेंबर या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३ कोटी इतकी नोंदवण्यात आली आहेत; मात्र अधिकृत आकडेवारीत या दिवशी केवळ ३ सहस्र रुग्णसंख्या सांगण्यात आली आहे. डिसेंबर मासाच्या पहिल्या २० दिवसांत २४ कोटी ८० लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये एका दिवसात ४० लाख कोरोना रुग्ण आढळले होते.

मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात रस्त्यांवर खांबांना दोरी बांधून लोकांना सलाइन दिले जात असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार रुग्णालयांमध्ये खाटांच्या कमतरतेमुळे होत आहे.

(सौजन्य : Inconvenient Truths by Jennifer Zeng)

१. चीनमध्ये मृतदेह कंटेनरमध्ये गोळा केले जात आहेत. बीजिंगमधील सर्वांत मोठ्या स्मशानभूमीत २४ घंटे अंत्यसंस्कार केले जात आहेत. लोक स्मशानभूमीबाहेर लांबच लांब रांगा लावून वाहनांमध्ये मृतदेह घेऊन उभे आहेत.

२. चीनमध्ये औषधांचाही तुटवडा आहे. ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’च्या मते चीनमधील लोक ऑनलाईन कोरोनाविरोधी (अँटी-कोविड) औषधे शोधत आहेत. भारतात बनवलेल्या ‘जेनेरिक अँटी व्हायरल’ औषधाला चीनमध्ये भरपूर मागणी आहे.

३. चीनमध्ये पसरलेला बीएफ्.७ हा कोरोनाचा विषाणू भारतासह जगातील ९१ देशांमध्ये पसरला आहे. ‘स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या अहवालानुसार, हा विषाणू गेल्या २ वर्षांपासून आहे. तो आता धोकादायक बनला आहे.

जपानसह अन्य देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ

  • ‘कोरोना वर्ल्डोमीटर’च्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ घंट्यांत जपानमध्ये १ लाख ७३ सहस्र नवीन रुग्ण आढळले आहेत. तेथे ३१५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथे कोरोनाची ही ८ वी लाट आली आहे.
  • दक्षिण कोरिया आणि फ्रान्स या देशांमध्ये गेल्या २४ घंट्यांत १ लाख ११ सहस्रांंहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. दक्षिण कोरियामध्ये नवीन रुग्णांची संख्या ६८ सहस्र १६८ इतकी नोंदवली गेली, तर फ्रान्समध्ये ही संख्या ४३ सहस्र ७६६ इतकी आहे. यासह दक्षिण कोरियामध्ये ६३ जणांचा, तर फ्रान्समध्ये १५८ जणांचा मृत्यू झाला आहे.