कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग अशा मार्गांनी साधना करणार्‍या कणगलेकर कुटुंबियांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभलेला सत्संग !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘कुटुंबातील एक ज्ञानयोगानुसार, दुसरा कर्मयोगानुसार, तिसरा भक्तीयोगानुसार आणि चौथा सर्वयोगानुसार साधना करणारे असे वैशिष्ट्यपूर्ण कणगलेकर कुटुंब !’ – – परात्पर गुरु डॉ. आठवले

२३ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी श्री. यशवंत कणगलेकर आणि सौ. अंजली कणगलेकर यांनी सांगितलेली सूत्रे पाहिली. या भागात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सौ. कणगलेकर यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांचा मुलगा होमिओपॅथी वैद्य अंजेश यांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.           

(भाग २)

भाग १ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/638646.html

सौ. अंजली कणगलेकर

३. सत्संगात परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारलेले प्रश्न आणि सौ. अंजली कणगलेकर यांनी दिलेली उत्तरे

परात्पर गुरु डॉ. आठवले (सौ. अंजली कणगलेकर यांना उद्देशून) : तुम्ही प्रगती करत पुढे-पुढे चाललाय ! काही कळते का ?’

सौ. कणगलेकर : मला त्यातील काही कळत नाही. ‘माझी प्रगती होते कि नाही ?’, हे सगळे गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) हातात आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही मुलांवर संस्कार कसे केलेत ?

सौ. कणगलेकर : मी कोण संस्कार करणारी ? सर्वकाही तुम्हीच केलेत. श्री. कणगलेकर चाकरीच्या निमित्ताने उत्तर भारतात अनेक ठिकाणी राहिले. मीही मुलांना घेऊन त्यांच्या समवेत रहात होते. त्या भागात ‘मारामारी करणे, घेराव घालणे, मुलांना पळवून नेणे’, असे घडण्याची शक्यता पुष्कळ होती. त्या वेळी दूरभाष किंवा भ्रमणभाष इत्यादींची सुविधाही नव्हती. त्यामुळे श्री. कणगलेकर कामानिमित्त घरातून बाहेर पडले की, ते घरी येईपर्यंत त्यांची वाट बघण्याविना अन्य पर्यायच नसायचा. त्यातून काही कामानिमित्ताने ते १५ दिवसही बाहेरच असायचे. अशा वेळी मी मुलांना घेऊन देवासमोर बसायचे आणि त्यांना सांगायचे, ‘आपल्याला देवाविना अन्य कोणताच आधार नाही.’ ‘त्यातूनच मुलांच्या मनावर संस्कार झाले असावेत’, असे वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले (उत्तर ऐकून आनंदाने मुलांना) : आता खरे कारण समजले. (सौ. कणगलेकर यांना उद्देशून) आधीपासून तुम्ही काय साधना केलीत ?

सौ. कणगलेकर : माझ्या जीवनात ४ – ५ संत आले. त्या सर्वांनी मला जे-जे करायला सांगितले, ते-ते मी करत गेले. त्यामुळे ‘मी साधना केली’, असे काहीच नाही. सगळे आपोआप होत गेले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणजे पहिल्यापासूनच तुम्ही स्वेच्छेने नाही, तर परेच्छेने वागलात. हे चांगले झाले.

श्री. यशवंत कणगलेकर

४. सत्संगाच्या वेळी सौ. अंजली कणगलेकर यांना आलेल्या अनुभूती

४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चेहरा काही क्षण पूर्ण पुसट आणि इतर वेळी विरळ दिसणे : पूर्ण सत्संगाच्या कालावधीत मला परात्पर गुरुदेवांचा चेहरा मधूनच काही क्षण पूर्ण दिसला. अन्य वेळी तो पुसट, अंधुक आणि विरळ दिसत होता. त्यामुळे मला क्षणभर ‘माझ्या डोळ्यांचा नंबर पालटला असावा’, असेही वाटले. मी चष्म्याच्या जवळचे आणि लांबचे पहाण्याच्या दोन्ही भिंगांतून वेगवेगळ्या प्रकारे त्यांना पहाण्याचा प्रयत्न केला, तरीही परात्पर गुरुदेवांचा चेहरा पुसट, अंधुक आणि विरळच दिसत होता. काही वेळा तो धुक्याप्रमाणे पूर्ण विरळ दिसत होता.

(प्रश्न : असे होण्यामागचे कारण काय ?

उत्तर : सौ. अंजली कणगलेकर यांना होणार्‍या अनिष्ट शक्तींच्या त्रासांमुळे त्यांना परात्पर गुरुदेवांचा तोंडवळा अस्पष्ट दिसायचा.)

४ आ. सत्संगाच्या वेळी आनंद आणि शांती यांची अनुभूती येणे : मला सत्संगाच्या वेळी आनंद आणि शांती यांची अनुभूती आली. सगळी सूत्रे ऐकूनही एकही सूत्र माझ्या लक्षात राहिले नाही किंबहुना ‘मी काही ऐकले आहे’, असे मला वाटलेच नाही. त्यानंतर मला हलकेपणा जाणवत असून मनात ‘कोणताही अनावश्यक विचार नको’, असे अत्यंत तीव्रतेने जाणवू लागले आहे.

४ इ. सत्संगाची ओढ असूनही मन आनंदी, स्थिर आणि शांत असणे : पूर्वी सत्संगाच्या संदर्भात मला पुष्कळ उत्साह आणि काहीसा उतावळेपणा जाणवायचा. या वेळी सत्संगाची ओढ पुष्कळ दिवसांपासून लागली असूनही प्रत्यक्ष सत्संगाच्या वेळी वेगळे असे काहीच वाटले नाही. मन नेहमीप्रमाणेच आनंदी, स्थिर आणि शांत होते. ही वेगळी स्थिती अनुभवली.’

(प्रश्न : याचे कारण समजले नाही.

उत्तर : साधनेत झालेल्या प्रगतीमुळे.)

होमिओपॅथी वैद्य अंजेश कणगलेकर

वैद्य अंजेश कणगलेकर

१. श्री. कणगलेकर यांनी चाकरी सोडली, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘आता तुमचे घर खर्‍या अर्थाने आश्रम झाले’, असे सांगणे : ‘बाबांनी चाकरी सोडून घरी परत येण्याआधीच तुम्हाला एक पत्र पाठवले होते. त्या पत्राला लिहिलेल्या उत्तरात तुम्ही लिहिले होते, ‘आता तुमचे घर खर्‍या अर्थाने आश्रम झाले आहे.’ त्या दिवसापासूनच ‘घर आश्रमच आहे’, असा आमचा सर्वांचाच भाव होता. आमचे घर विकायचे ठरले. तेव्हा ‘ते अधिक चांगल्या पद्धतीने कसे करू शकतो ?’, असे प्रयत्न देवानेच आमच्याकडून करवून घेतले. या पूर्ण विक्रीच्या प्रक्रियेत ‘सर्वकाही पूर्वनियोजित होते’, असेच आम्हाला वाटत होते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले बेळगाव येथील घरात राहून गेल्यामुळे घराविषयी थोडी अधिकच आत्मीयता वाटणे : तुम्ही (परात्पर गुरु डॉ. आठवले) बेळगाव येथील आमच्या वास्तूत आला होतात आणि राहिला होतात. त्यामुळे मला त्या वास्तूविषयी थोडी अधिकच आस्था वाटत होती; परंतु मागे एकदा तुम्ही म्हणाला होतात, ‘‘मी त्या एकाच घरात आहे का ?’’ त्यावरून माझ्या लक्षात आले, ‘आपण कुठेतरी अडकत आहोत आणि देव मला व्यापक करत आहे.’

३. आई (सौ. अंजली कणगलेकर), बाबा (श्री. यशवंत कणगलेकर) आणि श्री. सत्यकाम (धाकटा भाऊ) यांच्याविषयी लक्षात आलेली काही सूत्रे

श्री. सत्यकाम कणगलेकर

३ अ. आईचा ‘कर्मयोग’, बाबांचा ‘ज्ञानयोग’ आणि सत्यकामचा ‘भक्तीयोग’ असल्याचे जाणवणे : आईचा परिपूर्ण सेवेवर भर असतो आणि त्याला भावाची ोड असते. त्यामुळे तिचा ‘कर्मयोग’ असावा’, असे मला वाटले. ग्रंथांचा अभ्यास करून त्याला भावाची जोड देण्याचा बाबांचा प्रयत्न असतो. ‘त्यांचा ‘ज्ञानयोग’ असावा’, असे मला वाटले आणि सत्यकाम प्रत्येक कृती प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) केंद्रबिंदू ठेवून भावाच्या स्तरावरून परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ‘त्याचा ‘भक्तीयोग’ असावा’, असे मला वाटले.

(प्रश्न : हा विचार योग्य आहे का ?

उत्तर : हो.)

३ आ. ‘श्री गुरूंची सगुण सेवा करत आहे’, असा भाव ठेवून आई-वडिलांची सेवा करत आहे ! : देवाने मला आई-बाबांची सेवा करण्याची संधी दिली आहे. सर्वांनाच श्री गुरूंच्या प्रत्यक्ष सगुण सेवेची संधी मिळणे शक्य नाही; म्हणून मी ‘आई-बाबांची सेवा ही संतसेवाच आहे’, असा भाव ठेवून करतो. ‘देवच माझ्याकडून असा प्रयत्न करून घेत आहे’, असे माझ्या लक्षात आले. काही वेळा असे प्रयत्न करतांना माझे स्वभावदोष आणि अहं उफाळून येतात. त्यामुळे माझ्याकडून अयोग्य वागणे अन् बोलणे होते. तेव्हा ‘त्यांनी केलेला त्याग, त्यांनी आपल्याला जन्मापासून कसे सांभाळले असेल ? त्यासाठी त्यांना झालेले कष्ट आणि त्यांनी आपल्याला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांपर्यंत नेले’, या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर पुन्हा कृतज्ञताभाव जागृत होतो. मग त्या कृतज्ञताभावात राहून सेवा करण्याचा प्रयत्न करणे शक्य होते. शेवटी हा संस्कारही त्या दोघांनीच आमच्यावर केला आहे. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञताच वाटते.

३ इ. पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रेष्ठत्व समाजापर्यंत पोचवण्याचा ध्यास असणारे श्री. यशवंत कणगलेकर (वडील) ! : बाबांना वयानुसार शारीरिक त्रास आहेत. त्यांना पौरुषग्रंथींचा (‘प्रोस्टेट’चा) त्रास होतो. त्यामुळे त्यांना वरचेवर लघवीला जावे लागते. त्यांच्या नाडीचे ठोके कधी न्यून, तर कधी अधिक होतात. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटते. अलीकडे त्यांना ऐकू यायचेही न्यून झाले आहे आणि उजव्या डोळ्याला काचबिंदूमुळे दिसायचे न्यून झाले आहे. असे असूनही त्यांची नामजप पूर्ण करण्याची तळमळ असते आणि ज्योतिषाचा अभ्यास करून सेवा अधिकाधिक लवकर पूर्ण करण्याचा ध्यास असतो. त्यामागे त्यांचा ‘विविध कुंडल्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांचे श्रेष्ठत्व समाजापर्यंत पोचावे’, हा एकच विचार असतो.

३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उचललेल्या ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या गोवर्धनाला आपली एक काठी लागली, तरी जीवनाचे सार्थक होईल’, या भावाने सेवा करणार्‍या सौ. अंजली कणगलेकर (आई ) ! : आईला मधुमेह (डायबिटीस) आहे. ५ – ६ मासांपूर्वी तिच्या एका पायातील शक्ती पूर्णपणे न्यून झाली होती. अशा स्थितीतही तिची एकही दिवस सेवा खंडित झाली नाही. मिळेल  तेवढा वेळ आणि जमेल तेवढी सेवा करण्याचा तिला ध्यास लागलेला असतो. परात्पर गुरु डॉक्टरांना आपत्काळ चालू होण्यापूर्वी अधिकाधिक सेवा पूर्ण करायच्या आहेत. त्यात आपण आपला खारीचा वाटा उचलायलाच हवा. ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा गोवर्धन परात्पर गुरु डॉक्टरच उचलणार आहेत. त्यांच्या कृपेनेच ‘आपण आपली एक काठी लावू शकलो, तरी आपल्या जीवनाचे सार्थक झाले’, असा तिचा भाव असतो.

३ उ. सतत ‘श्री गुरूंना आवडेल’, अशी सेवा करण्याचा ध्यास असलेले श्री. सत्यकाम कणगलेकर (धाकटा भाऊ)! : सत्यकाममध्येही पुष्कळ पालट झाला आहे. प्रत्येक कृती करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी ही कृती कशी केली असती ?’, असा विचार करून तशी कृती करण्याचा त्याचा ध्यास असतो. त्याला तुमचा सहवास मिळाला आहे. तो त्यातील प्रत्येक क्षण आणि शब्द आठवून ‘प्रत्येक कृती तुम्हाला आवडेल’, अशी करण्याचा प्रयत्न करतो. घरी असतांनाही ‘नियोजन, आयोजन आणि त्यानुसार पाठपुरावा घेऊन सेवा पूर्णत्वाला नेणे’, हा गुण त्याच्यात वाढला असल्याचे लक्षात आले. त्याच्यात ‘इतरांचा विचार करणे, नेतृत्व, नियोजनकौशल्य, अभ्यासपूर्ण आणि उपाययोजनात्मक (सोल्युशन ओरिएंटेड) कृती करणे, हे गुण वाढले आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

(समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक