वर्धा येथील पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (सनातनच्या ११९ व्या समष्टी संत) यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी अनुभवलेली भावस्थिती आणि केलेले सूक्ष्म परीक्षण

‘१०.४.२०२२ या दिवशी, म्हणजेच श्रीरामनवमीच्या दिवशी झालेल्या एका सत्संगाच्या आरंभी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी रामजन्माचा प्रसंग सांगितला. त्यानंतर प्रसारातील एका साधिकेच्या आवाजातील ध्वनीचकतीद्वारे भावप्रयोग ऐकवण्यात आला. तेव्हा बर्‍याच साधकांना ‘संतच बोलत आहेत’, असे जाणवले. तो भावप्रयोग ऐकून सर्वांची भावजागृती झाली. त्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘तो आवाज श्रीमती मंदाकिनी डगवार यांचा असून आजच्या शुभदिनी त्यांनी संतपद गाठले आहे.’’ या संपूर्ण सोहळ्यात मला जाणवलेली सूत्रे आणि केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या रामजन्माच्या प्रसंगाचा भावप्रयोग ऐकतांना जाणवलेली सूत्रे

या सत्संगात आरंभी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामजन्माचा प्रसंग सांगितला. तेव्हा ‘त्या प्रसंगी मी प्रत्यक्ष उपस्थित असून ते क्षण अनुभवत आहे’, असे मला वाटले. त्यानंतर ‘मी अयोध्येच्या राजवाड्यात असून बाल राम पाळण्यात आहे. राजा दशरथ, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, दासदासी इत्यादी सर्व जण आनंदात असून ते प्रत्यक्ष येथे आहेत. सर्व देवता, ऋषिमुनी आणि दिव्यात्मे हेही येथे उपस्थित असून ते पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला अनुभवता आले. तो प्रसंग अवर्णनीय होता.

आधुनिक पशूवैद्य अजय जोशी

२. सत्संगात घेतलेला भावप्रयोग ऐकतांना आलेल्या अनुभूती 

२ अ. नंतर सत्संगात एका ध्वनीचकतीद्वारे भावप्रयोग लावला. तो मधुर आवाज ऐकून मला वाटले, ‘हा भावप्रयोग एक स्त्री संत घेत आहेत.’

२ आ. भावप्रयोगातील बालिकेने केलेला सुंदर हार श्रीकृष्णाने तिलाच घातल्यावर बालिकेचा भाव जागृत होणे : भावप्रयोग सांगणार्‍या साधिकेने सांगितले, ‘एक तीन वर्षांची परकर-पोलके घातलेली बालिका श्रीकृष्णासाठी फुलांचा सुंदर हार करत आहे. तिने हारात मधेमधे तुळस आणि हाराच्या मध्यभागी कृष्णकमळ ओवले आहे. ‘तो हार पहातच रहावा’, असा सुंदर झाला आहे. ती बालिका तो हार श्रीकृष्णाच्या गळ्यात घालण्याचा विचार करत असतांना श्रीकृष्णानेच तो हार बालिकेच्या गळ्यात घातला. तेव्हा ती बालिका भावस्थितीत गेली. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. तिचे चित्त हरपून ती श्रीकृष्णाकडे पहातच राहिली. ‘तिचा भाव जागृत झाल्याने तिच्या अंगावर रोमांच आले’, असे मला जाणवले.

२ इ. श्रीकृष्णाच्या बासरीचा सुमधुर नाद ऐकू येणे : त्या वेळी ‘साक्षात् श्रीकृष्ण बासरी वाजवत असून त्या बासरीच्या सुमधुर नादात जग गुंग झाले आहे’, असे मला जाणवत होते. ते सूर ऐकतांना माझे देहभान हरपले होते. या प्रसंगी सर्वच साधक भावविभोर झाले होते.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी श्रीमती मंदाकिनी डगवार संत झाल्याचे घोषित केल्यावर जाणवलेली सूत्रे

३ अ. सत्संगात ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात श्रीकृष्ण आला आहे’, असे जाणवणे : भावप्रयोगानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी बोलण्यास आरंभ केल्यावर मला श्रीकृष्णलहरींचे अस्तित्व जाणवले. मला त्या लहरींचा स्पर्श आणि सुगंध दैवी जाणवत होता. तेव्हा ‘श्रीकृष्णच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात आला आहे’, असे मला जाणवले.

३ आ. ‘बालरूपातील श्रीकृष्ण पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्या रूपातील गोपी बालिकेला प्रेमाने गोंजारून तिला तुळशीची माळ घालत आहे’, असे जाणवणे : नंतर  श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘श्रीमती मंदाकिनी डगवार संतपदी विराजमान झाल्या आहेत’, असे घोषित केले. तेव्हा ‘साक्षात् बालरूपातील श्रीकृष्ण पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्या रूपातील गोपीला आपल्या कोमल हाताने गोंजारत आहे. तो तुळशीची पवित्र माळ त्यांच्या गळ्यात घालून त्यांना मायेतून अलिप्त करत आहे’, असे मला जाणवले.

३ इ. ‘भावप्रयोगातील बालिकेने केलेला हार श्रीकृष्णाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपातून बालिकारूपी श्रीमती मंदाकिनी डगवार यांच्या गळ्यात घालून त्यांना संतपदी विराजमान केले’, असे जाणवणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा हार घालून सन्मान केला. तेव्हा मला वाटले, ‘भावप्रयोगातील बालिकेने केलेला हार श्रीकृष्णाने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात येऊन प्रेमळ, निरागस आणि प्रांजळ असलेल्या पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्या, म्हणजे गोपीरूपी भक्त बालिकेच्या गळ्यात घातला. ही गुरुकृपाच होती.

४. सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण

अ. चैतन्य  ६० टक्के

आ. भाव  ६५ टक्के

इ. आनंद  ७० टक्के

ई. श्रीकृष्णतत्त्व  १५ टक्के

५. कृतज्ञता

हा विलक्षण सोहळा पहाणारे आम्ही साधक कलियुगातील पुण्यात्मेच होतो. ‘हे सर्व मला गुरुकृपेमुळेच अनुभवता आले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२२)

  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक