जगासाठी मोठी डोकेदुखी : चीनमधील अण्वस्त्रांची वाढती संख्या !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. अमेरिकेच्या ‘पेंटागॉन’ या संरक्षण संस्थेने चीनकडे येत्या १३ वर्षांत १ सहस्र ५०० हून अधिक अण्वस्त्रे असण्याची शक्यता वर्तवणे 

अमेरिकेच्या ‘पेंटागॉन’ या संरक्षण संस्थेने नुकताच एक अहवाल सिद्ध केला आहे. त्यात ‘वर्ष २०३५ पर्यंत चीनकडे असलेल्या अण्वस्त्रांची संख्या ही १ सहस्र ५०० हून अधिक असेल’, असे म्हटले आहे. ही संख्या जगात सर्वाधिक गणली जाईल. त्यामुळे भारतालाच नाही, तर जगालाही धोका निर्माण होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यात अण्वस्त्रे बनवण्याची स्पर्धा लागली होती. त्यानंतर ही शस्त्रे अधिक वाढणार नाहीत, यादृष्टीने एक करार करण्यात आला. तेव्हा चीनने अशा करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्याच्यावर जगाचे किंवा संयुक्त राष्ट्रांचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे तो त्याच्या मनाप्रमाणे शस्त्रे वाढवू शकतो.

चीनने पाकिस्तान आणि उत्तर कोरिया यांच्यासारख्या विचित्र वागणार्‍या राष्ट्रांनाही अण्वस्त्रे बनवण्यासाठी साहाय्य केले आहे. पाकिस्तानचा भारताला किती धोका आहे, याची आपल्याला कल्पना आहे. गेल्या ६ मासांतील घटना पाहिल्या, तर उत्तर कोरिया स्वतःकडील क्षेपणास्त्रांचा दक्षिण चीन समुद्रात, तसेच जपानवर करत आहे. ती क्षेपणास्त्रे जपानवरून सोडल्यामुळे जपानच्या समुद्रात पडत आहेत. ते चुकून जपानवर पडले, तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अशाच प्रकारची दमदाटी चीन तैवानलाही करत असतो.

 २. महासत्ता बनण्यासाठी चीनने संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे 

चीनच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. गेले काही दिवस चीनमध्ये लोकांची निदर्शने चालू आहेत; कारण चीन कोरोना धोरणानुसार देशात संपूर्ण दळणवळण बंदी करत आहे. त्यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेचा वेग २ टक्क्यांहून अल्प होणार आहे. या पार्श्वभूमीवर १ सहस्र ५०० अणूबाँब बनण्याची गती निश्चितच अल्प होईल. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे अतिशय क्रूर आहेत. त्यांना महासत्ता बनून अमेरिकेच्या पुढे जायचे आहे. त्यासाठी ते केवळ चीनचाच विचार करत आहे. त्यांना केवळ एका राक्षसी महत्त्वाकांक्षेने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष देशाच्या संरक्षण व्यवस्थेला अधिक मजबूत करण्याकडे लागले आहे. ते चिनी लोकांची निदर्शने चिरडून टाकतील; पण जे अणूबाँब बनवायचे ते बनवतीलच ! चीनचा अण्वस्त्रेच नाही, तर अन्य शस्त्रे बनवण्याचा वेगही प्रचंड आहे. त्यामुळे पारंपरिक युद्धाचा निश्चितच धोका आहे. तसेच ‘ग्रे झोन वॉर फेअर (युद्ध आणि शांतता दोन्ही नाही)’, म्हणजे दमदाटी करण्यासाठीही चीन या शस्त्रांचा वापर करेल.

३. चीनच्या तुलनेत भारताची अण्वस्त्र सज्जता ! 

आज भारताकडे १५० ते २०० अणूबाँब असल्याचे समजले जाते. अणूबाँब घेऊन मारा करण्यासाठी लागणारी क्षेपणास्त्रेही भारताकडे आहेत. त्यात पृथ्वी, अग्नी-१, अग्नी-२, अग्नी-३, अग्नी-४ यांचा समावेश आहे. त्यांच्या साहाय्याने भारत चीनला पूर्णपणे वेढू शकतो. यासमवेतच भारताकडे ‘सुखोई’सारखी लढाऊ विमानेही आहेत. ज्यातून चीन किंवा पाकिस्तान यांच्यावर अणूबाँब टाकता येईल. भारतीय नौदलाकडे फ्रिगेट्स (युद्धनौकेचा प्रकार) आणि ‘डिस्ट्रॉयर्स’ (विनाशक) आहेत. त्यांच्यावरूनही क्षेपणास्त्रांचा मारा करता येईल. आताच भारताकडे अणुशक्तीवर चालणारी ‘अरिहंत’ ही पाणबुडी तैनात झालेली आहे. पाण्याच्या खालूनही क्षेपणास्त्रे सोडण्याची तिची क्षमता आहे. याचा अर्थ भारताकडे काही अणूबाँब आहेत. भारताकडे आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याची क्षमता निश्चित आहे.

४. जागतिक धोका टाळण्यासाठी चीनला विध्वंसक शस्त्रे बनवण्यापासून थांबवणे आवश्यक !

भारताकडे चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता असली, तरी चीनकडे असलेल्या शस्त्रांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे केवळ भारतालाच नाही, तर सर्व जगालाच याचा धोका आहे. त्यामुळे अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात विध्वंस करणारी शस्त्रे बनवणे थांबवावे, यासाठी सर्व जगाने एकत्र येऊन चीनवर दबाव टाकला पाहिजे. अचानक एखाद्याकडून चुकून क्षेपणास्त्र सोडण्यात आल्यास जगाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भारत किंवा जग यांनी त्याच्यावर दबाव टाकणे अत्यंत आवश्यक आहे; कारण हा धोका भयंकर आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.