चि. श्रीरंग सुदेश दळवी (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) याच्या अंडकोषाला बसलेला पीळ सोडवण्यासाठीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याने आणि त्याच्या आईने अनुभवलेली गुरुकृपा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आजारपणात कठीण प्रसंगाला तोंड कसे द्यायचे, हे या लेखावरून सर्वांना शिकायला मिळेल. त्याचा आपत्काळात सर्वांनाच लाभ होईल. याबद्दल दळवी कुटुंबातील सर्वांचेच अभिनंदन ! ‘त्यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पर्वरी (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक चि. श्रीरंग सुदेश दळवी याच्यावर नोव्हेंबर २०१९मध्ये पणजी येथील रुग्णालयात एक अत्यंत नाजूक आणि महत्त्वाची शस्त्रक्रिया पार पडली. आजाराचे निदान वेळेत होणे, आधुनिक वैद्य वेळेत उपलब्ध होणे, औषधोपचारांसह योग्य आध्यात्मिक उपायसुद्धा वेळेत मिळणे, या सर्व गोष्टींमुळे श्रीरंग मोठ्या संकटातून लवकर बाहेर पडू शकला. या आजारपणात त्याच्याकडून त्याच्या आईला शिकायला मिळालेली सूत्रे, श्रीरंग आणि त्याच्या आईला आलेल्या अनुभूती, तसेच त्यांनी विविध प्रसंगांत अनुभवलेली गुरुकृपा येथे देत आहोत.

२२.१२.२०२२ या दिवशी यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

पूर्वार्ध वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/638333.html

चि. श्रीरंग सुदेश दळवी

७. बारा घंटे (तास) उलटून गेल्याने आधुनिक वैद्यांनी श्रीरंग याचा अंडकोष वाचवण्याला प्राधान्य देऊन त्याला तातडीने शस्त्रक्रियेसाठी नेणे

रुग्णालयात पोचल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘श्रीरंगचे तातडीने शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले. श्रीरंगच्या अंडकोषाला पीळ बसला होता. आधुनिक वैद्य त्याची प्राथमिक तपासणी करतांना म्हणाले, ‘‘एवढी सूज आली आहे, तरी हा शांत कसा ? त्याला पुष्कळ दुखत असेल. तुम्ही कल्पना करू शकत नाही, एवढा त्याला त्रास होत असणार. बारा घंटे (तास) होऊन गेले आहेत. तुम्ही अर्ज भरा. पाहूया, अंडकोष वाचवता येतात का ?’’ त्यांच्या या वाक्याने मी घाबरले. आम्ही लगेच अर्ज भरला. तोपर्यंत त्यांनी श्रीरंगला शस्त्रक्रियेसाठी नेले होते.

८. आधुनिक वैद्या (सौ.) देशमाने आणि पू. बाबा (पू. गडकरीकाका) यांनी भ्रमणभाषद्वारे धीर देऊन चिंता न करता देवाला शरण जाण्यास सांगणे 

पू. रमेश गडकरी

‘आधुनिक वैद्य ‘पुष्कळ वेळ झाला’, असे का म्हणाले ?’ हे जाणून घेण्यासाठी मी आधुनिक वैद्या (सौ.) अमृता देशमाने यांना भ्रमणभाषवरून संपर्क केला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार सहा घंट्यांनंतर (तासांनंतर) ‘टेस्टीज’ खराब होतात. त्या पूर्णपणे काळ्या पडतात आणि काढूनच टाकाव्या लागतात; म्हणूनच मी लवकरात लवकर त्याला रुग्णालयात भरती करण्यास सांगितले होते. तू काळजी करू नकोस आणि रडूही नकोस. गुरुदेवांवर श्रद्धा ठेव. आधुनिक वैद्य सावंत निष्णात तज्ञ आहेत. ते योग्य उपचार करतील.’’ थोड्या वेळाने मला पू. बाबांचा (पू. रमेश गडकरी) भ्रमणभाष आला. मी त्यांना आधुनिक वैद्यांशी झालेले बोलणे सांगितले. पू. बाबा म्हणाले, ‘‘वैद्यकीय शास्त्राला आणि वैद्यांना मर्यादा आहेत. त्यांना वेळेचे बंधन असते. देवाच्या कृपेला मात्र कोणतेही बंधन नाही, कोणत्याही मर्यादा नाहीत. तो अखंड आपल्यावर कृपा करत असतो. आपण केवळ त्याला संपूर्ण शरण जायचे. देवाने तुला शरण येण्याची आणि भावाच्या स्थितीत रहाण्याची संधी दिली आहे. तू काळजी करू नकोस. नामजप आणि आध्यात्मिक उपाय यांकडे लक्ष दे. मीसुद्धा त्याच्यासाठी नामजप करतो.’’

सौ. रसिका सुदेश दळवी

९. पू. बाबांशी (पू. गडकरी काकांशी) बोलल्यानंतर मन सकारात्मक होणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर त्यांचे श्रीविष्णूच्या विराट रूपात दर्शन होणे आणि मन शांत होणे

पू. बाबांशी बोलल्यावर माझे मन पुष्कळ सकारात्मक झाले. मी शस्त्रकर्म गृहाबाहेर बसून नामजप आणि प्रार्थना करू लागले. त्या वेळी मी गुरुदेवांना पुढील प्रार्थना केली, ‘परात्पर गुरु डॉक्टर, मी श्रीरंगला त्याचा जन्म झाला, तेव्हाच तुमच्या चरणी अर्पण केले आहे. आज त्याचा देह पुन्हा एकदा तुमच्या चरणांवर ठेवत आहे. आता त्याचा देह आणि त्याचा प्रत्येक अवयव हा तुमचा आहे. त्याला जो शारीरिक त्रास होत आहे, तो तुम्हीच बघा. श्रीरंगला त्रास सहन करण्याची शक्ती द्या.’ प्रार्थना झाल्यावर मी डोळे मिटले असता मला पुढील दृश्य दिसले. ‘मी श्रीरंगला हातांत घेऊन उभी आहे. माझ्यासमोर पांढरा सदरा घातलेले परात्पर गुरु डॉक्टर डोळे मिटून शांतपणे उभे आहेत. मी श्रीरंगला त्यांच्या चरणांशी ठेवले. त्याक्षणी परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीविष्णूचे विराट रूप धारण केले.’ त्या वेळी मला माझ्या चेहर्‍याभोवती थंड हवेच्या लहरी जाणवत होत्या आणि मन शांत झाले होते. एरव्ही मला परात्पर गुरु श्रीकृष्णाच्या रूपात दिसतात.

१०. बारा घंटे उलटूनही अंडकोष सुरक्षित असल्याचे पाहून आधुनिक वैद्यांनाही आश्चर्य वाटणे आणि त्यांनी श्रीरंग भाग्यवान असल्याचे सांगणे

एक घंट्याने शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर आधुनिक वैद्य बाहेर आले. ते अत्यंत उत्साहात होते. ते म्हणाले, ‘‘कसे ते कळत नाही; पण १२ घंटे होऊनही पीळ बसलेले डाव्या बाजूचे अंडकोष सुरक्षित होते. एकूण दोन पीळ (वेढे) बसले होते. ५ मिनिटेही विलंब झाला असता, तर अंडकोष काळे पडून खराब झाले असते. जंतूसंसर्गही झाला असता. असे झाले असते, तर अंडकोष काढून टाकण्याला पर्याय नव्हता. खरेतर ६ घंट्यांतच अंडकोष खराब होतात. तुमचा मुलगा भाग्यवान आहे. हा चमत्कार त्याच्याविषयी घडला.’’

११. अतीदक्षता कक्षातील परिचारिकेने श्रीरंगच्या शांत स्वभावाचे कौतुक करणे

श्रीरंग अतीदक्षता कक्षामध्ये असतांना आम्ही बाहेर थांबलो होतो. तो शुद्धीवर आला. तेव्हा परिचारिकेने येऊन सांगितले, ‘तुम्हाला त्याला भेटायचे असेल, तर आत येऊ शकता.’ मी थोडा वेळ त्याला भेटून पुन्हा बाहेर येऊन थांबले. दुपारी जेवायला जाण्यापूर्वी मी त्या परिचारिकेला सांगायला गेले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘तुमचा मुलगा पुष्कळ शांत आहे. त्याचा कसलाच आरडाओरडा नाही. एरव्ही लहान मुले अतीदक्षता कक्षामध्ये आईला सोडून रहात नाहीत. ‘सलाईन’ ओढतात, ‘ऑक्सिजन मास्क’ काढून टाकतात. रडून आणि ओरडून गोंधळ घालतात. त्यामुळे आम्ही पालकांना येथून कुठेही जाण्याची अनुमती देत नाही; पण तुमचा मुलगा शुद्धीवर आला, तेव्हाही त्याने ‘आई-बाबा कुठे आहेत ?’ किंवा कुटुंबियांविषयी काहीच विचारले नाही. तो सभोवतालच्या उपकरणांना (मॉनिटर, ऑक्सिजन इत्यादींना) घाबरून रडला नाही. अगदी गुणी आहे. तुम्ही निवांत जेवून या. आम्ही त्याची काळजी घेतो.’’

१२. ‘शस्त्रक्रिया यशस्वी होणे’, ही गुरुकृपा असून देवानेच नामजप आणि मुद्रा सुचवल्याचे पू. बाबांनी सांगणे

श्रीरंगचे शस्त्रकर्म यशस्वीरित्या पार पडल्याचे मी पू. बाबांना सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘ही सर्व गुरूंचीच कृपा आहे. तू त्याचे पोट दुखते; म्हणून आध्यात्मिक उपाय विचारण्यासाठी भ्रमणभाष केला होतास, त्या वेळी देवाने नामजप आणि मुद्रा तुला सांगण्यास सांगितली. तो जप आणि मुद्रा नेमकेपणाने मूत्राशय अन् ‘टेस्टीज’ या अवयवांच्या रक्षणार्थच केली जाणारी होती. तेव्हा मलाही वाटले, ‘हा जप आणि मुद्रा माझ्याकडून कशी सांगितली गेली ?’ ‘देवाने सांगितली म्हणजे तीच आवश्यक असणार’, अशी माझी श्रद्धा होती.’’ ‘पू. बाबांच्या माध्यमातून गुरुदेवच बोलत आहेत’, हा भाव असल्याने मी मनात शंका न ठेवता जप, मुद्रा आणि न्यास केला; म्हणूनच श्रीरंगच्या त्या अवयवाचे रक्षण झाले.

१३. ‘सलाईन’मधून औषध दिले जात असतांना श्रीरंगला पुष्कळ वेदना होणे, त्या वेळी भावप्रयोग केल्यानंतर श्रीरंगच्या वेदना न्यून होणे आणि त्याला स्वतःच्या जागी पिवळा प्रकाश दिसून खोली अधिक प्रकाशमान दिसणे

श्रीरंगला सलाईनमधून प्रतिजैविके (‘ॲण्टीबायॉटिक औषधे’) दिली जात होती. ती देत असतांना त्याला पुष्कळ वेदना होत होत्या. एकदा असेच औषधांचे सलाईन चालू असतांना तो वेदनेमुळे रडू लागला. तेव्हा देवाने त्याच्या वेदना न्यून होण्यासाठी भावप्रयोग करण्यास सुचवले. त्यानुसार आम्ही दोघांनीही पुढीलप्रमाणे भावप्रयोग केला. ‘आपण रुग्णालयात नसून रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत आहोत. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीरंगला त्यांच्या पलंगावर झोपवले आहे. या सलाईनमधील औषध म्हणजे चैतन्याचा रस आहे. जो श्रीरंगच्या शरीरातील पेशी-पेशी चैतन्यमय करत आहे.’ हा भावप्रयोग करत असतांना मला पुष्कळ हलके वाटत होते. ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण श्रीरंगच्या पलंगाजवळ उभा राहून त्याला चैतन्य देत आहे’, असे जाणवत होते. श्रीरंगलाही वेदना थांबल्याचे लक्षात आले. भावप्रयोगाच्या कालावधीत श्रीरंगला स्वतःच्या जागी पिवळा प्रकाश दिसत होता. डोळे उघडल्यावर त्याला खोली अधिक प्रकाशमान दिसत होती.

१४. औषधे आणि आध्यात्मिक उपाय यांमुळे जखम लवकर बरी होणे, आधुनिक वैद्यांनी श्रीरंग भाग्यवान असल्यानेच अंडकोष वाचवणे शक्य झाल्याचे सांगणे

रुग्णालयातून घरी सोडण्यापूर्वी आधुनिक वैद्य सावंत श्रीरंगला बघायला आले. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘याची जखम बरी होण्यास १० ते १५ दिवस लागतील. तोपर्यंत काळजी घ्यावी लागेल.’’ प्रत्यक्षात नियमित औषधांबरोबर आध्यात्मिक उपाय केल्याने त्याची जखम ५ दिवसांतच ८० टक्के बरी झाली. आम्ही दोन आठवड्यांनंतर तपासणीसाठी गेलो. तेव्हा आधुनिक वैद्य सावंत आम्हाला म्हणाले, ‘‘तुमचा मुलगा भाग्यवान आहे. माझ्या २३ वर्षांच्या कारकिर्दीत हा पहिलाच असा मुलगा आहे, ज्याचे अंडकोष (टेस्टीज) मी वाचवू शकलो. तसे यापूर्वी एका मुलाचेही वाचवले होते; परंतु त्याचे आई-वडील दोघेही आधुनिक वैद्य असल्याने त्यांना तासाभरातच त्याचे निदान करून त्याला शस्त्रक्रियेसाठी आणता आले होते. सर्वसामान्य पालकांना नेमका त्रास लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते; पण हा मात्र या सगळ्यातून वाचला; म्हणूनच मी तुमच्याकडून रुग्णालयात समुपदेशन शुल्क (कन्सल्टेशन फी) घेतले नाही. यापूर्वी अशाच प्रकारे एका ३ वर्षांच्या मुलीच्या गर्भपिशवीला पीळ बसल्याने ती काढून टाकावी लागली होती. त्या मुलीची केवळ ४ घंट्यांतच (तासांतच) गर्भपिशवी पूर्ण खराब झाली होती.’’

१५. श्रीरंगच्या आजारपणात पदोपदी गुरुकृपा अनुभवायला मिळणे आणि ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा’ ही प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण श्रीरंग प्रत्यक्षात आचरणात आणत आहे’, असे वाटून भावजागृती होणे

या सर्व प्रसंगात मला पदोपदी गुरुकृपा अनुभवता आली. एरव्ही श्रीरंग पुष्कळ भित्रा आहे. थोडे लागले, तरी तो रडतो. त्यामुळे ‘त्याने एवढा त्रास सहन केला’, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्या दिवसांत मला श्रीरंगच्या जागी परात्पर गुरु डॉक्टरांचेच अस्तित्व जाणवत होते. त्याचे डोळे आणि चेहर्‍यावरचे भाव यांत मला परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन होत होते. एरव्ही घरातील व्यक्तींसमोर कपडे पालटण्यासही तो लाजतो; मात्र रुग्णालयात लघवीसाठी भांडे धरण्यासाठी परिचारिकाच येत असत. असे असूनही तो कसलेही गार्‍हाणे (तक्रार) करत नसे. त्या वेळी त्याच्याकडे बघून मला प.पू. भक्तराज महाराज यांची पुढील शिकवण आठवून माझा भाव जागृत होत असे. ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा’, ही प.पू. बाबांची शिकवण तो प्रत्यक्ष आचरणात आणत आहे’, असे मला वाटले.

१६. या कालावधीत अखंड गुरुकृपा अनुभवल्याने व्यक्त झालेली कृतज्ञता !

श्रीरंगच्या आजारपणाचा घटनाक्रम पहाता असे लक्षात आले, ‘देवाने त्याला त्रास होण्यापूर्वीच त्याच्या रक्षणार्थ त्याच्याकडून महामृत्यूंजय जपाचे आणि हनुमान चालिसाचे पठण इत्यादी करवून घेतले, तसेच पू. बाबांच्या (पू. रमेश गडकरी यांच्या) माध्यमातून देवाने योग्य नामजप देऊन त्याचे रक्षण केले. आमचे गतजन्मीचे पुण्य म्हणून आम्हाला सनातन संस्थेत येऊन साधना समजली आणि अखंड गुरुकृपा लाभली.

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या कृपेने श्रीरंगच्या जिवावरचे संकट टळले. तुम्ही आम्हा कुटुंबियांवर कृपेचा अखंड वर्षाव करत आहात, त्यासाठी आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

(समाप्त)

– सौ. रसिका सुदेश दळवी (चि. श्रीरंगची आई), पर्वरी, गोवा. (नोव्हेंबर २०१९)