निकष ठरवण्यासाठी समिती नेमण्यात येणार !
नागपूर – सततच्या पावसाने हानी झालेल्या पिकांसाठी हानीभरपाई देण्यात येईल; मात्र यासाठी निकष ठरवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देतांना दिली.
अतीवृष्टीमुळे मिळणार्या अनुदानापासून वगळण्यात आलेल्या गावांविषयी सदस्य नारायण कुचे यांनी २१ डिसेंबर या दिवशी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. तिला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री बोलत होते. या विषयावरील चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य सर्वश्री राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, डॉ. संजय कुटे, हसन मुश्रीफ, हरिभाऊ बागडे, श्रीमती यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला होता.
मदत आणि पुनर्वसन मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, सततचा पाऊस पडणार्या परिसरात साहाय्य देण्याच्या दृष्टीने निकष ठरवण्यासाठी अपर मुख्य सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे.
विम्याविषयीच्या तक्रारींच्या निवारणासाठी विशेष कक्ष कार्यान्वित करणार !
विमा आस्थापनांकडून देण्यात येणार्या हानीभरपाईविषयी विचारलेल्या एका उपप्रश्नाला उत्तर देतांना फडणवीस यांनी सांगितले की, विमा आस्थापनांनी किती नफा कमवावा, याविषयी मर्यादा निश्चित करण्यासाठी नविन धोरण आणणार आहोत. शेतकर्यांना हानीभरपाईपोटी देण्यात येणार्या रकमेसाठी न्यूनतम १ सहस्र रुपये किमतीचा साहाय्याचा धनादेश असावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. विम्याविषयीच्या तक्रार निवारणासाठी विशेष तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात येईल.