चीनमध्ये कोरोनामुळे हाहा:कार उडाला असतांना सर्व काही आलबेल असल्याचे सरकारी वृत्तांकन !

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेच्या सीऍटल येथील वॉशिंग्टन विद्यापिठाने चीनमध्ये वाढत असलेले कोरोनाचे संक्रमण अत्यंत भयावह असल्याचे म्हटले आहे. या विद्यापिठाने, ‘पुढील वर्षीच्या एप्रिलपर्यंत किमान ५ लाख चिनी नागरिक मृत्यू पावतील, तर डिसेंबर २०२३ पर्यंत १६ लाख चिनी नागरिक या विषाणूचे बळी ठरतील’, असे म्हटले आहे. या जोडीलाच साथीच्या रोगाच्या अभ्यासकांनीही (‘एपिडियमॉलॉजिस्ट’नीही) ‘चीनला भयावह संकटाला सामोरे जावे लागत आहे’, असे म्हटले आहे. चीनमध्ये ‘ओमिक्रॉन बीएफ्.७’ हा कोरोेना विषाणूचा प्रकार अत्यंत गतीने संक्रमित होत असतांना तेथील कावेबाज साम्यवादी सरकारने सर्व काही आलबेल असल्याच्या बातम्या प्रसृत केल्या आहेत.

१. चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार कोरोनापासून बरे झालेले लोक कोणतीही चाचणी न करता त्यांच्या कामाच्या ठिकाणी रुजू होऊ शकतात. तेथील हॉटेल्स, चित्रपटगृहे आदी उघडण्याला अनुमतीही देण्यात आली आहे.

२. १९ डिसेंबर या दिवशी राजधानी बीजिंगमध्ये कोरोनामुळे ७ जण मृत्यूमुखी पडल्याचे, तर २० डिसेंबर या दिवशी एकही जण बळी गेला नसल्याचे चीन सरकारकडून सांगण्यात आले. तथापि ‘ही आकडेवारी प्रचंड मोठी आहे’, असे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून सोदाहरण सांगण्यात येत आहे.

३. देशातील अनेक स्मशाने २४ घंटे चालू असून अनेक ठिकाणी प्रेतांचे अंत्यविधी करण्यासाठी ५-६ दिवस थांबावे लागत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. तथापि चिनी प्रसारमाध्यमे मात्र याविषयी मौन बाळगून आहेत.

४. एवढेच नव्हे, तर चीनचा मित्र म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेकडूनही चीनच्या वाढत्या संक्रमणाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. चिनी सरकारने लसीकरणाची गती मोठ्या प्रमाणात वाढवण्याची सूचनाही संघटनेने केली आहे. ‘असे असूनही चीन त्याची स्थिती जगासमोर येऊ देत नाही’, असे अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

स्वतःच्या अंतर्गत समस्येविषयी जगाला खोटी माहिती देणारा चीन विश्‍वास ठेवण्यास पात्र नाही. भारताने त्याच्यापासून सदैव सावध रहावे !