राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील श्री. भालचंद्र दत्तात्रय सोवनी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती

‘२०.३.२०२२ या दिवशी आम्ही (मी आणि माझी पत्नी) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलो. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. भालचंद्र सोवनी

१. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात डोळे मिटून ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप करत असतांना ध्यानमंदिरातील शिवाच्या चित्रात असल्याप्रमाणे भगवान शिवाचे रूप डोळ्यांसमोर उभे रहाणे

मी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून डोळे मिटून ‘ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप करत असतांना मला दिसले, ‘माझ्या डोळ्यांसमोर भगवान शिव उभा आहे. त्याची अंगकांती निळसर आहे. त्याच्या डोक्यावरून गंगामाई जलाचा अखंड अभिषेक करत आहे. त्याच्या पाठीमागे निळसर रंगाचे आकाश दिसत आहे.’

खरेतर ध्यानमंदिरातील गुरुपरंपरेतील छायाचित्रे आणि अष्टदेवतांची चित्रे, यांविषयी मला काहीच ठाऊक नव्हते. काही वेळाने मी डोळे उघडून समोर पाहिल्यावर ‘अष्टदेवतांच्या चित्रातील भगवान शिवाचे चित्र आणि मी डोळे बंद केल्यावर दिसलेले शिवाचे रूप सारखेच आहे’, असे मला जाणवले.

२. ‘ध्यानमंदिराच्या जवळ असलेल्या प्रांगणात आपोआप उगवलेल्या औदुंबराच्या रोपांच्या माध्यमातून आश्रमाच्या परिसरात गुरुतत्त्व वेगाने वाढत आहे’, असे जाणवणे

मी ध्यानमंदिराच्या जवळ असलेल्या प्रांगणातील औदुंबराच्या रोपांच्या समोर उभा राहिलो. (ध्यानमंदिराच्या जवळ असलेल्या प्रांगणात अनेक औदुंबराची रोपे आपोआप उगवली आहेत.) ‘औदुंबराच्या रोपांची अत्यंत वेगाने वाढ होऊन लवकरच त्यांचे रूपांतर महाकाय वृक्षांत होईल आणि ते वृक्ष संपूर्ण आश्रमावर छत्र धरून आश्रमाचे रक्षण करतील’, असे मला जाणवले. औदुंबर वृक्ष हे गुरुतत्त्वाचे प्रतीक असून ‘संपूर्ण परिसरात गुरुतत्त्व वेगाने वाढत आहे’, असे मला जाणवले.’

– श्री. भालचंद्र दत्तात्रय सोवनी, राजापूर, जिल्हा रत्नागिरी (१४.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक