स्वयंसूचनांचे सत्र करतांना साधिकेला ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली ‘स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ ही ‘आत्मसंजीवनी’ आहे, याची येणारी अनुभूती

कु. रजनीगंधा कुर्‍हे

१. नवीन स्वभावदोष किंवा अहंच्या पैलूवर प्रयत्न करत असतांना ‘मन स्वयंसूचना ग्रहण करत असल्यामुळे स्वयंसूचनेचे सत्र करण्यास अधिक वेळ लागत आहे’, असे जाणवणे

‘साधारण २ वर्षांपूर्वी मला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठीचे एक स्वयंसूचना सत्र करायला बराच वेळ (१२ ते १३ मिनिटे) लागायचा. मी एखादा नवीन स्वभावदोष किंवा अहंचा पैलू घेतला असेल, तर त्यावर स्वयंसूचना द्यायला मला बराच वेळ लागायचा. तेव्हा ‘माझे मन ती स्वयंसूचना ग्रहण करत आहे आणि त्यामुळे सत्र करण्यास अधिक वेळ लागत आहे’, असे मला वाटायचे.

२. तीन – चार दिवसांतच मनाने स्वयंसूचना घेण्यास कंटाळा करणे

माझ्याकडून नवीन स्वयंसूचना २ – ३ दिवस व्यवस्थित ग्रहण केली जायची; पण ३ – ४ दिवस झाल्यावर माझे मन तीच स्वयंसूचना घ्यायला कंटाळा करायचे. त्यामुळे स्वयंसूचनांची ५ सत्रे करणे मला जमत नव्हते.

३. मन अधिक ग्रहणशील झाले असल्याचे जाणवणे

मागील ७ – ८ मासांमध्ये मला असे लक्षात आले की, ‘माझे मन आता अधिक ग्रहणशील झाले आहे. मी मनाला स्वयंसूचनेचा थोडासा भाग सांगितला, तरी ते स्वीकारते. स्वभावदोष किंवा अहंचा पैलू नवीन असेल, तर त्या संबंधित स्वयंसूचना माझे मन लगेच ग्रहण करते; पण कालांतराने ती स्वयंसूचना परत ग्रहण करत नाही.

४. प्रसंग घडण्यापूर्वी अथवा घडल्यानंतर मनाने तात्कालिक स्वयंसूचना चालू करणे आणि त्यातून आनंद अन् समाधान मिळणे

आताच्या टप्प्याला मी स्वयंसूचना चालू केली की, माझी भावजागृती होऊ लागते. दिवसभरात माझी स्वयंसूचनांची सत्रे जरी अल्प झाली, तरी माझे मन प्रसंग घडण्यापूर्वी अथवा घडल्यानंतर स्वतःला तात्कालिक स्वयंसूचना देते. या स्वयंसूचनेतून मला वेगळा आनंद मिळून समाधान अन् शांती लाभते.

‘स्वयंसूचनांमधील हे सर्व पालट योग्य आहेत कि अयोग्य ?’, हे मला कळत नाही; मात्र ‘स्वयंसूचना’ म्हणजे ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्व साधकांना षड्रिपूंच्या डोहातून मुक्त होण्यासाठी प्रदान केलेली एक ‘आत्मसंजीवनी’च वाटते.’

५. अंतर्मनापर्यंत सूचना ग्रहण होण्याच्या संवेदना पोचून चित्तशुद्धी होऊन मन निर्विचार अवस्थेत जाणे

मी स्वयंसूचना घेत असतांना माझे मन आवश्यक त्या शब्दांवर अधिक वेळ थांबते. माझ्या मनाला स्वतःवर जो भाग बिंबवायचा असेल, त्यावर ते अधिक वेळ थांबते. त्या वेळी माझे मन काही भाग ग्रहण करते आणि माझ्या अंतर्मनापर्यंत तो भाग ग्रहण होण्याच्या संवेदना पोचतात. तेव्हा मला ‘माझी चित्तशुद्धी होत आहे’, असे जाणवते. त्यामुळे काही वेळा स्वयंसूचना सत्र केल्यानंतर मी आपोआप निर्विचार अवस्थेत जाते आणि गर्दीच्या ठिकाणीही स्वयंसूचना सत्र घेऊ शकते.

प्रार्थना

‘हे गुरुमाऊली, आपण अखिल मानवजातीला वरदान स्वरूपात दिलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’, ही प्रत्येक मानवासाठी मोक्षाचे द्वार उघडणारी आहे. आम्हा साधकांना या प्रक्रियेद्वारे ‘आंतरिक स्वरूपाचा आनंद काय असतो ?’, हे आपल्या कृपेमुळेच अनुभवता येत आहे. यासाठी आम्ही सर्व साधक, तसेच ईश्वरी राज्यातील पिढी अनंत काळापर्यंत आपल्या चरणी कृतज्ञ राहील.’

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक