शांत आणि समंजस असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चिंचवड, पुणे येथील कु. तन्वी अतुल पेठे !

शांत आणि समंजस असलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चिंचवड, पुणे येथील कु. तन्वी अतुल पेठे (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. तन्वी पेठे ही या पिढीतील आहे !

‘मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी (२१.१२.२०२२) या दिवशी चिंचवड, पुणे येथील कु. तन्वी अतुल पेठे हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. तन्वी पेठे

कु. तन्वी अतुल पेठे हिला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. तन्वी अतुल पेठे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची ५५ टक्के पातळीची आहे’ , असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ५६ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२०.१२.२०२२)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. शांत आणि समंजस

अ. ‘कु. तन्वी शांत आहे. तिला सत्संग, प्रथमोपचार सराववर्ग किंवा सेवा या ठिकाणी घेऊन गेल्यास ती तिथे शांत बसते. त्यामुळे मी सेवा करू शकते.

आ. वर्ष २०२२ मध्ये १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या प्रथमोपचार शिबिरासाठी मी तन्वीला समवेत नेले होते. ४ दिवसांच्या शिबिरात तिने काहीच त्रास दिला नाही. तिच्यामुळेच मी शिबिराचा लाभ घेऊ शकले.

२. प्रेमभाव

सौ. रेवती पेठे

घरात कुणी रुग्णाईत असल्यास तन्वी त्यांची विचारपूस करते आणि पाणी देते. घरात कुणी पाहुणे आले आणि ते घरून निघतांना एखादी वस्तू घ्यायला विसरल्यास तन्वी त्यांना आठवण करून देते. तिचा ‘समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये’, असा विचार असतो.

३. तत्परता

रामनाथी आश्रमातील प्रथमोपचार शिबिराच्या वेळी काही वेळा साधकांच्या काही वस्तू सभागृहात रहात असत. त्या वेळी ‘त्या वस्तूंवरील नावे वाचून संबंधितांना आपण ती वस्तू पटकन् नेऊन देऊया’, असे ती म्हणाली.

४. धर्माचरणाची आवड

तिला कपाळावर मोठे कुंकू आणि हातात बांगड्या घालायला पुष्कळ आवडतात.

५. विचारण्याची वृत्ती

ती प्रत्येक कृती विचारून करते. तिला कुणी ‘चॉकलेट’ दिल्यास ती मला ‘मी हे खाऊ का ?’, असे विचारते आणि मी ‘हो’ म्हटल्यावरच खाते.

६. सेवेची आवड

तन्वीला सेवा करायला पुष्कळ आवडते. ती माझ्या समवेत नेहमी सेवेला येते. ती मला सेवेत साहाय्य करते. मला प्रसारसेवेसाठी कितीही लांब जावे लागले, तरीही ती माझ्या समवेत यायला सिद्ध होते.

७. चुकांविषयी संवेदनशील

तन्वीकडून काही चूक झाल्यास तिला त्याची पुष्कळ खंत वाटते. ‘एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये’, याची ती काळजी घेते.’

– सौ. रेवती अतुल पेठे (कु. तन्वीची आई), चिंचवड, पुणे. (२१.९.२०२२)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.