१ सहस्र ५०० लक्षवेधी सूचना, तर सहस्रावधी तारांकित प्रश्‍न प्रलंबित असतांना पहिल्या दिवशी प्रश्‍नोत्तरे न घेण्याची प्रथा हिवाळी अधिवेशनातही कायम !

नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेसाठी आतापर्यंत १ सहस्र ५००, तर विधान परिषदेसाठी लक्षवेधी सूचनांसाठी प्रश्‍न आले आहेत. विधान परिषदेसाठी १ सहस्र ८०० तारांकित प्रश्‍न आले आहेत. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील मागील अधिवेशनांपासून प्रलंबित असलेल्या तारांकित प्रश्‍नांची संख्या सहस्रावधींच्या घरात आहे. जनतेचे सहस्रावधी प्रश्‍न प्रलंबित असतांना ते सोडवण्यासाठी सभागृह अधिकाधिक वेळ चालवण्याऐवजी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाची प्रश्‍नोत्तराची तासिका न घेण्याची परंपरा यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही कायम ठेवण्यात आली.

१. १९ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता विधानसभा, तर दुपारी १२ वाजता विधान परिषद या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला ‘वन्दे मातरम्’ने प्रारंभ झाला.

२. त्यानंतर नवनिर्वाचित आमदार श्रीमती ऋतुजा लटके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ओळख करून दिली.

३. दोन्ही सभागृहांमध्ये अध्यादेश पटलावर ठेवणे, पुरवणी मागण्या सादर करणे, सभागृहात संमत करण्यात आलेल्या विधेयकांना राज्यपाल आणि राष्ट्रपती यांची संमती असल्याची मान्यता देणे, तालिका सभापतींची नावे घोषित करणे, शासकीय विधेयकांचे वाचन करणे या प्रशासकीय कामांची औपचारिकता पूर्ण करून दोन्ही सभागृहांत शोकप्रस्ताव सादर करण्यात आले.

४. विधानसभेत काही आमदारांनी आयत्या वेळी उपस्थित केलेल्या हरकतींच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली. तथापि प्रथेप्रमाणे विधीमंडळाच्या पहिल्या दिवशी घेण्यात येणारे तारांकित प्रश्‍न किंवा लक्षवेधी सूचना आदी कोणतेही कामकाज पहिल्या दिवशी घेण्यात आले नाही.

५. जनतेच्या समस्यांचे सहस्रावधी प्रश्‍न असूनही पहिल्या दिवशी प्रश्‍नोत्तरे न घेणे, तसेच सुटीच्या आदल्या दिवशी कामकाज लवकर संपवणे, अशा सोयीच्या प्रथा वर्षानुवर्षे चालवण्यात येत आहेत.

संपादकीय भूमिका

जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी अधिकाधिक वेळ कामकाज करून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी जनहित कधी साधणार ?