धर्मांधता जिंकली !

फ्रान्सने मोरोक्कोचा पराभव केल्यानंतर फ्रान्स आणि बेल्जियम येथील मोरोक्कोप्रेमींचा हिंसाचार

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या दुसर्‍या उपांत्य सामन्यामध्ये फ्रान्सने मोरोक्कोचा २-० अशा गोलफरकाने पराभव केल्यानंतर फ्रान्स आणि बेल्जियम येथील मोरोक्कोप्रेमींनी हिंसाचार केला. या हिंसाचाराचा बेल्जियमपेक्षा फ्रान्सला अधिक फटका बसला. या हिंसाचाराला पाश्चात्त्य देशांतील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी दिली; मात्र त्यातील धर्मांधतेच्या धाग्यावर बहुतांश प्रसारमाध्यमांनी प्रकाश टाकला नाही किंबहुना हिंसाचारामागची धर्मांधतेची छटा उलगडून लोकांसमोर आणायला तेथील पत्रकार सिद्ध नाहीत. फ्रान्स आणि मोरोक्को यांचे संबंध तसे ताणलेले; कारण फ्रान्सने एकेकाळी मोरोक्कोवर राज्य केले होते. दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मोरोक्कोमधील कामगार फ्रान्समध्ये रोजगारासाठी जातात. यांतील बहुतांश जण अनधिकृतपणे फ्रान्समध्ये वास्तव्य करत आहेत. हे घुसखोर सर्व सुविधा घेतात फ्रान्सकडून; मात्र त्यांची निष्ठा मोरोक्कोवर आहे. त्यामुळे फुटबॉल सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा पराभव केल्यानंतर फ्रान्समधील मोरोक्कोप्रेमींचे पित्त खवळले आणि त्यांनी थेट कायदा हातात घेऊन तेथील सामाजिक शांतता भंग केली. या मोरोक्कोप्रेमींकडून हिंसाचार झाल्यावर युरोपमधील वातावरण ढवळून निघाले आहे. जागतिक स्तरावर धर्मनिरपेक्षतेचा फटका अनेक देशांना बसू लागला आहे. त्यांत फ्रान्सचाही समावेश आहे. वर्ष २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटचा उदय झाल्यानंतर सीरिया आणि त्याच्या परिसरातील इस्लामी देशांतील मुसलमानांनी युरोपीय देशांमध्ये आश्रय घेण्यास आरंभ केला. त्या वेळी युरोपीय देशांनी या शरणार्थींना सढळ हस्ते साहाय्य करत स्वतःच्या देशात रहाण्याची अनुमती दिली. युरोपीय देशांमध्ये धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि मानवाधिकार यांना फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळे या शरणार्थींच्या मानसिकतेचा अभ्यास न करताच किंवा बेगडी मानवतावादापायी त्यांना देशात सामावून घेण्याची फार मोठी चूक युरोपीय समाजाने केली. त्याची फळे ते आता भोगत आहेत.

२०२२ च्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सकडून मोरोक्कोचा पराभव झाल्यानंतर दु:खाचे लवकरच हिंसाचारात रूपांतर झाले आणि ब्रुसेल्स आणि फ्रान्सच्या काही भागांमध्ये मोरोक्कोप्रेमींनी केल्या दंगली

युरोपमधील देशांसमोरील आव्हान !

फ्रान्स किंवा बेल्जियम या देशांमध्ये ज्या हिंसक घटना घडल्या, त्यांकडे डोळेझाक करून चालणार नाही. युरोपमध्ये साधारण अडीच कोटी मुसलमान वास्तव्य करतात. त्यांतील सर्वाधिक मुसलमानांची संख्या ही फ्रान्समध्ये आहे. वर्ष २०१४ नंतर फ्रान्समध्ये जिहादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. तेथील वाढत्या जिहादी कारवाया या देशासाठी डोकेदुखी बनल्या आहेत. वाढती धर्मांधता रोखण्यासाठी बुरखाबंदी, जिहादी कारवाया चालणार्‍या मशिदींना टाळे ठोकणे आदी कारवाया तेथे केल्या जात आहेत. अन्य युरोपीय देशांमध्ये धर्मांधांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया होत नाहीत; मात्र फ्रान्स यासंदर्भात तरी कणखर म्हणावा लागेल. त्यामुळे धर्मांधांचाही फ्रान्स सरकारवर राग आहे. फ्रान्सने मोरोक्कोचा पराभव केल्यानंतर हा राग उफाळून आला. येणार्‍या काळात या हिंसक समुदायावर नियंत्रण मिळवणे, हे युरोपमधील देशांसमोरील मोठे आव्हान असेल.

धर्मनिरपेक्षता कि राष्ट्रवाद ?

फ्रान्स आणि बेल्जियम येथील हिंसाचारानंतर पाश्चात्त्य देशांतील वृत्तांकन आणि काही लेख वाचल्यास तेथील बहुतांश पत्रकारांवरील धर्मनिरपेक्षतेचे भूत अजूनही उतरले नसल्याचे स्पष्ट होते. ‘युरोपमध्ये आलेल्या शरणार्थींमधील बहुतांश जण हे उज्ज्वल भवितव्यासाठी युरोपमध्ये आले आहेत. त्यांतील काहीच जण हिंसा करतात’, असा काहीसा सूर आळवला गेला. केवळ युरोपच नव्हे, तर इस्लामी देशांत जिहादी किंवा हिंसक कारवाया करणारे अल्प असले, तरी त्यांचे समर्थन करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांना विरोध करणार्‍यांची संख्या मात्र तुरळक आहे. आताही जो हिंसाचार झाला, तेव्हा युरोपमधील किती शरणार्थींनी या हिंसेचा विरोध केला ? किती जणांनी या हिंसाचाराच्या विरोधात मोर्चे काढले किंवा विविध व्यासपिठांवरून त्याला वरोध केला ? युरोपमधील मुसलमानांनी या हिंसाचाराविषयी न बोलणे, हे एकप्रकारे त्याला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. अशा घटनांनंतर पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. ‘पोलीस शरणार्थींकडे वेगळ्या दृष्टीने पहातात’, असे सांगितले जात आहे. थोडक्यात शरणार्थींच्या उद्रेकाला तेथील पोलीस किंवा व्यवस्था यांना उत्तरदायी ठरवले जाते; मात्र ‘पोलिसांवर तशी वेळ का आली ?’, याचा मात्र सारासार विचार होत नाही. हा विशिष्ट समाज कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात नेहमीच अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे सामाजिक शांतता भंग करणार्‍या या समाजाकडे पोलिसांनी बारीक लक्ष ठेवल्यास चूक ते काय ?

प्रत्येक राष्ट्राचा उत्कर्ष हा प्रखर राष्ट्रवादावर अवलंबून असतो. ज्या राष्ट्रातील जनतेमध्ये देशाभिमान आणि राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी लढा देण्याची सिद्धता असते, ती राष्ट्रे काळाच्या कसोटीत टिकून रहातात. ज्या देशांमध्ये मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्या देशांचा राष्ट्रवाद, तेथील संस्कृती आणि परंपरा धोक्यात येतात, हे उघड सत्य आहे. काही कारणांमुळे एका वेगळ्या देशात गेल्यावर तेथील लोकांमध्ये मिसळून त्यांचे होणे आवश्यक असते. तसे झाले नाही, तर सामाजिक संघर्ष हा अटळ असतो. युरोप किंवा अन्य खंडांमध्ये वास्तव्य करणार्‍या मुसलमान समाजात संकुचित वृत्ती दिसते. वास्तविक युरोपमध्ये शरणार्थी म्हणून गेलेल्या मुसलमानांनी त्यांच्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून वागणे आवश्यक आहे; मात्र तेथे उलट होतांना दिसत आहे. त्यांनी युरोपची संस्कृती किंवा परंपरा अवलंबली नाहीच उलट युरोपमधील लोकांवर ते स्वतःची संस्कृती, परंपरा आणि कायदे थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे फ्रान्स किंवा बेल्जियम या देशांमध्ये जे घडले, ती धोक्याची घंटा आहे. ‘स्वतःची हेकेखोर वृत्ती सोडण्यास सिद्ध नसलेल्या या समाजाचे काय करायचे ?’, याचे उत्तर जगभरातील समाज धुरिणांनी आणि राजकीय नेत्यांनी शोधायचे आहे.

येणार्‍या काळात युरोपमधील हिंसक समुदायावर नियंत्रण मिळवणे, हे तेथील शासनकर्त्यांसमोरील मोठे आव्हान !