‘वकिली’ हा समाजात प्रतिष्ठित व्यवसाय समजला जातो. अधिवक्ता जसा राजकीय नेत्यांना कायद्याविषयी साहाय्य करतो, तसा सामाजिक संस्था, कामगार संघटना, तसेच मंदिरे अशा विविध घटकानांही दिशा देण्याचे काम करतो. त्यामुळे ‘अधिवक्ता’ हा समाजाचा अविभाज्य घटक झाला आहे. अशा अधिवक्त्यांना साधना करण्याची आवश्यकता या लेखातून विशद केली आहे.
११ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘न्यायालयामध्ये सूत्रे ठामपणे मांडतांना अधिवक्त्यांमध्ये ‘आपण म्हणू तेच खरे’, अशी घातक प्रवृत्ती निर्माण होण्याची शक्यता असणे, अधिवक्त्यांना साधना आणि अध्यात्म शिकून घेण्याची सर्वाधिक आवश्यकता असणे अन् कर्मफलन्यायानुसार दोषी मनुष्य निर्दाेष सुटणे किंवा निरपराध्याला शिक्षा होणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
६. गुन्हेगाराचे कृत्य हे चालू जन्मातील होते कि तो पूर्वजन्मांतील कृत्याचा परिणाम होता ? याविषयी फौजदारी प्रक्रिया संहितेत विचार केलेला नसणे
आपला हा जन्म एकमेव नाही, तर ते याआधीही झाले होते आणि आता साधना केली नाही, तर पुढेही जन्म होणारच आहेत. हे भारतीय उपखंडात जन्मलेले धर्म अथवा विचारसरणी मानतात ज्यांत जैन, बौद्ध, शीख या सर्वांचा समावेश आहे. या दृष्टीने जर आपण कर्मफलन्याय पाहिला, तर दोषी, निर्दाेष आणि शिक्षा हे सर्व अधिक स्पष्ट होईल. या जन्माचे कृत्य हे चालू जन्मातील होते, नवेच होते कि तो पूर्वजन्मांतील कृत्याचा परिणाम होता ? याविषयीचा विचार भारतीय दंड विधान किंवा फौजदारी प्रक्रिया संहितेत कुठेही येत नाही. बुद्धीच्या स्तरावरील पुराव्यांच्या आधारे खटल्यांचे निवाडे होतात.
त्यामुळे होते असे की, तांत्रिकदृष्ट्या शुद्ध अशा या निवाड्यांवर ‘ते योग्यच होते’, असा आपला विश्वास बसत नाही. ‘जे होत आहे, ते योग्य नाही’, हे कळत असते; परंतु नवीन काय करायचे ? हे ठाऊक नसते. अर्थात् ज्यांना सद्सद्विवेकबुद्धी असते, त्यांच्यासाठी हे आहे. ‘न्यायालयात जे सिद्ध होते, तेच खरे असते’ आणि ‘अधिवक्त्याचा व्यवसाय हा पैसा कमवण्याचे केवळ एक साधन आहे’, असे मानणार्यांना हे मानवणारे नाही.
७. प्रचंड मोठी न्याययंत्रणा लागणे, हे समाजाची अधोगतीकडे वाटचाल होत असल्याचे लक्षण !
सध्या नवनवीन कायदे केले जातात. गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे सर्वत्र लावण्यात येत आहेत. सहस्रो पोलिसांचा व्यय आणि न्यायालयांची वाढती संख्या, हे समाजाच्या प्रगतीचे निर्देशक आहेत कि अधोगतीचे ?
७ अ. कुटुंब न्यायालयाची मोठी इमारत उभी रहाणे, हा विकास नव्हे ! : कोरोना महामारीच्या काळानंतर बर्याच दिवसांनी मी पुणे येथील न्यायालयात गेलो होतो. तेथे एक नवीन इमारत उभी राहिलेली दिसली. ती कुटुंब न्यायालयाची इमारत असल्याचे समजले. थोडक्यात पती-पत्नी यांच्यातील वादाच्या संदर्भातील निवाडा देण्यासाठी ही वेगळी टोलेजंग इमारत आहे. आता कुणी म्हणेल, ‘‘न्याय लवकर मिळावा, यासाठी सर्व सोयी करण्यात येत आहेत.’’ याला आपण विकास म्हणायचा का ? पती-पत्नीमधील वेबनाव (भेदभाव) वाढत आहेत, म्हणून याचिका वाढत आहेत. ‘याचिका वाढत आहेत म्हणून त्यांचा निकाल लवकर लागण्यासाठी आम्ही आवश्यक ती यंत्रणा निर्माण करत आहोत’, असे सांगणे हे काही अभिमानास्पद नाही. हा समाजाच्या प्रगतीचा निर्देशांक नाही. अशा कारणांसाठी न्यायाधिशांची आवश्यकता भासू नये.
कुणी असे म्हणेल की, भांडणे आताच होत नव्हती, तर ती शेकडो वर्षांपासूनची आहेत, आता केवळ ती समोर येत आहेत आणि त्या अर्थाने ही प्रगतीच आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा उद्घोष करणारे असे मांडू शकतात. ‘भांडणे, वाद समोर येणे म्हणजे प्रगती’, असे नाही, तर ‘हे विषय आपापसात चर्चेने, वडीलधार्यांचे साहाय्य घेऊन कुटुंबभावनेने ते सोडवणे’, ही प्रगती नाही का ? याचे मूळ शोधतांना पुन्हा आपण तेथेच येतो. पती-पत्नी यांच्यातील भांडणे म्हणजे षड्रिपूंचे प्रकटीकरण असते. ‘सासूशी पटत नाही’, ‘मी सांगेन तसे घरात व्हायला पाहिजे’, अशी कुणा एकाची तरी भूमिका असते, म्हणजे एकतर हे षड्रिपू आहेत किंवा कर्मफलन्याय आहे किंवा दोहोंचेही मिश्रण आहे.
ही अडचण अधिवक्ता न्यायालयात मांडू शकत नाही; परंतु खरेच ज्या अधिवक्त्याला ‘मला चार पैसे अल्प मिळाले, तरी चालतील; परंतु पक्षकाराचे अंतिम हित मला पहायचे आहे’, अशी तळमळ असेल, त्याने पक्षकाराला हा भाग नक्कीच सांगावा.
८. षड्रिपूयुक्त माणसांमध्ये वावरणार्या अधिवक्त्यांनी साधना करण्याची आवश्यकता
‘द्रष्टा दृष्यवशात बद्ध: ।’, या संस्कृत वचनाचा अर्थ ‘पहाणारा दृष्यात बद्ध होतो (अडकतो). त्याला जे सतत दिसत असते, तेच त्याच्या अंगवळणी पडते’, असा आहे. रुग्णालयात प्रथमच शवविच्छेदन पहाणारा वैद्यकीय विद्यार्थी प्रारंभी चक्कर येऊन पडेल, त्याला मळमळेल; पण कालांतराने त्याचे त्याला काहीच वाटणार नाही. त्याचप्रमाणे अधिवक्तेही षड्रिपूयुक्त माणसांमध्ये वावरत असतात. कालांतराने त्यांनाही त्याची सवय होते. लोकांमध्ये दिसून आलेली अपप्रवृत्ती ‘सर्वसामान्य गोष्टच’ वाटू लागते. एकदा ही स्थिती निर्माण झाली की, अधिवक्ता खरे-खोटे, चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक यांच्यातील सीमारेषांना अप्रत्यक्षरित्या पुसट करत जातो.
‘पैसा कमावणे आणि राज्यघटनेत म्हटल्याप्रमाणे आपल्या पक्षकाराचा बचाव करणे, हे अधिवक्ता म्हणून आपले एकमेव कर्तव्य आहे’, असे अधिवक्त्याला वाटत असते. तसेच ते योग्य ठरवण्यासाठी तो स्वत:ची बुद्धी वापरायला लागतो. ‘मिळालेला खटला नीतीमत्तेच्या कारणाने नाकारू नये’, असे तत्त्व न्यायप्रणालीने घालून दिलेले असल्यामुळे धर्म-अधर्म, योग्य-अयोग्य ही सर्वच चर्चा मागे पडते. अशा स्थितीत त्याचे रूपांतर काळा कोट घातलेल्या आणि बौद्धिक स्तरावर गुन्हा करणार्या गुंडामध्ये होणार नाही का ? आणि तसे झाले, तर मागील जन्माची पुण्याई किंवा साधना यांमुळे मिळालेले वैभव वाया घालवून अधिवक्ता आयुष्याचे वाटोळे करणार नाही का ? म्हणून अधिवक्त्यांनी साधना करणे आवश्यक आहे.
९. अधिवक्त्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहायला हवे !
आधुनिक वैद्य कोरोना किंवा अन्य संसर्गजन्य आजारापासून स्वत:च्या जीविताचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी मास्क वापरणे, हात धुणे अशी काळजी घेतात. पुरोहितांनाही इतरांसाठी आध्यात्मिक विधी केल्यानंतर गायत्री मंत्र, संध्या, विश्वदेव आदी उपासना करणे आवश्यक असते. मग स्वभावदोष आणि षड्रिपू यांनी बरबटलेल्या लोकांमध्ये सतत वावरणार्या अधिवक्त्यांना काहीच करावे लागू नये का? या गोष्टी पुष्कळ किचकट आहेत; म्हणून अधिवक्त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि अर्थप्राप्तीचा विचार बळकट होऊ शकतो. अधिवक्त्यांच्या अयोग्य गोष्टींचा परिणाम त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यावरही होऊ शकतो. हे लक्षात घेऊन त्यांनी व्यवसायाकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे. याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा; कारण त्यांनाही साधना करण्याची नितांत आवश्यकता आहे.’
१०. अधिवक्ता म्हणजे भाडोत्री योद्धा नव्हे !
विदेशात ‘मर्सिनरी’ (mercenary) अशी एक संकल्पना आहे. मर्सिनरी म्हणजे पैसे देईल त्याच्या बाजूने लढणारा सैनिक अथवा योद्धा ! या शब्दाचा अर्थ ‘नीतीमत्ता झुगारून पैशासाठी काम करणारा’, असाही होतो.
आपल्या अशिलासाठी अधिवक्ते लढतात. त्याच्याकडून त्याचे पैसेही घेतात. ‘जितकी मोठी सामाजिक प्रतिष्ठा असणारा पक्षकार आणि गंभीर त्याचा घोटाळा, तितके त्याच्याकडून अधिक उत्पन्न’, असे ठरते. ‘असे पक्षकार असणारा अधिवक्ता म्हणजे मोठा व्यवसाय असणारा अधिवक्ता’, अशी काहीशी आज समाजात प्रतिमा होत चालली आहे.
अधिवक्त्याकडे असणारी बुद्धी, एकाग्रता, वक्तृत्व, शब्दसंपदा, कायद्यातील खाचा-खोचा लगेच अवगत होण्याची क्षमता, न्यायाधीश, प्रतिपक्षांचे अधिवक्ते यांच्या मनात काय चालू आहे ? आणि त्यांचा लाभ कसा घ्यायचा ? हे समजण्याची क्षमता, तसेच असे अनेक गुण व्यक्ती केवळ अभ्यासाने मिळवते, असे नाही. जर तसे असते, तर सर्व अधिवक्ते एकाच क्षमतेचे झाले असते. काही गोष्टी जन्मजात असतात, त्या कुठून येतात ? याचे उत्तर विज्ञानाकडे नसेल, तर ‘त्या पूर्वजन्मीच्या साधनेने अथवा पुण्याईने येतात’, असे म्हणावे लागेल. मग पूर्वसुकृतामुळे मिळालेले गुण अधिवक्ते कशासाठी वापरतात ? तर स्वतःचे गुण आणि बुद्धीमत्ता भाड्याने देऊन पैसे कमावण्यासाठी ! भाडे देणारा कोण असतो ? ज्याच्यावर गुन्हा केल्याचा आरोप असतो, तो माणूस. मला याच्या नैतिकतेची चर्चा करायची नाही; परंतु या सर्वांची एक आध्यात्मिक बाजू असेल का ? आपले गुण, बुद्धीमत्ता आपण बाजारात विकायला बसलो आहोत का ?, जेथे गुन्हेगार आणि कायदे मोडण्यात धन्यता मानणारेच ग्राहक आहेत. तसे असेल, तर अधिवक्त्यांनी त्याचा विचार करावा का ? इतके तरी अधिवक्त्यांपर्यंत पोचावे, ही अपेक्षा आहे. (समाप्त)
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (३०.४.२०२२)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/635091.html
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !हा लेख वाचल्यावर अधिवक्ते अथवा समाजातील व्यक्ती ज्यांनी न्यायप्रक्रियेचा लेखात म्हटल्याप्रमाणे अनुभव घेतला आहे, अशांना यासंदर्भात काही सांगायचे असेल, तर त्यांनी पुढील पत्त्यावर स्वतःचे अनुभव पाठवावेत. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल. पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, चित्तार भाट, नागेशी, फोंडा, गोवा. |