‘वकिली’ हा समाजात प्रतिष्ठित व्यवसाय समजला जातो. अधिवक्ता जसा राजकीय नेत्यांना कायद्याविषयी साहाय्य करतो, तसा सामाजिक संस्था, कामगार संघटना, तसेच मंदिरे अशा विविध घटकानांही दिशा देण्याचे काम करतो. त्यामुळे ‘अधिवक्ता’ हा समाजाचा अविभाज्य घटक झाला आहे. अशा अधिवक्त्यांना साधना करण्याची आवश्यकता विशद करणारा हा लेख आपण पहाणार आहोत.
१. न्यायालयामध्ये सूत्रे ठामपणे मांडतांना अधिवक्त्यांमध्ये ‘आपण म्हणू तेच खरे’, अशी घातक प्रवृत्ती निर्माण होण्याची शक्यता असणे
अधिवक्त्यांना कायद्याच्या व्यतिरिक्त अन्य अनेक क्षेत्रांतीलही थोडी माहिती असते. ते नानाविध व्यवसायांमधील प्रकरणे हाताळतात. ते बांधकाम व्यावसायिक, कारखानदार, शेतकरी, रुग्णालये, खासगी संस्था, शासकीय संस्था, शिक्षणसंस्था अशा सर्वांनाच कायदेशीर साहाय्य करतात. महत्त्वाचे म्हणजे वकिली क्षेत्रात आपल्याला किती येते, याचे मूल्यमापन करणारा तो स्वतः असतो. त्यामुळे ‘आपल्याला सर्व येते’, असा गोड अपसमज अधिवक्त्यांमध्ये निर्माण होण्याची शक्यता असते.
२. ‘आपल्याला सर्व येते’, असा अहं असण्याची अपरिहार्यता आणि वास्तव
अशा मानसिकतेचीही एक व्यावसायिक अपरिहार्यता असते. अधिवक्त्याला जर स्वत:च्या अभ्यासावर विश्वास नसेल आणि ‘आपली बाजू खरी आहे’, असे वाटत नसेल, तर ‘आपण सांगितलेले योग्यच आहे’, अशा ठाम आत्मविश्वासाने न्यायालयात खटला लढणार कसा ? प्रतिपक्षाचा युक्तीवाद निष्प्रभ कसा करणार ? किंवा न्यायाधिशांना ‘आपलीच बाजू सत्य आहे’, हे कसे पटवून देणार ? स्वत:चे म्हणणे न्यायालयाला पटवून देता देता अधिवक्त्यांची ‘आपण म्हणू तेच खरे’, अशी वृत्ती होऊ लागते. याला असेही एक कारण आहे, ते म्हणजे न्याय ही आज व्यक्तीसापेक्ष कल्पना झाली आहे. कनिष्ठ न्यायालयाला जो न्याय वाटेल, तोच न्याय उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय यांना वाटेलच, असे नाही. त्यामुळे ‘न्यायाधीश देतील तो निवाडा न्याय असेलच’, असे नाही. प्रतीपक्षाचा अधिवक्ताही स्वतःचीच बाजू खरी म्हणून सांगेल, मग ‘आपले तेच खरे असे वाटावे’, अशी स्थिती होते. बरे, यात पालट घडवणे अधिवक्त्याच्या हातात नाही. शेतकरी त्याच्या शेतभूमीचा कस पालटू शकतो, त्याला हवे ते त्याच्या शेतात पिकवू शकतो. काही अंशी स्थिती त्याच्या हातात असते; पण अधिवक्त्याचे तसे नसते, त्याला आहे ती स्थिती स्वीकारून सर्व करावे लागते.
३. अधिवक्त्यांना साधना आणि अध्यात्म शिकून घेण्याची सर्वाधिक आवश्यकता
आध्यात्मिक स्तरावर पाहिल्यास अधिवक्त्यांकडे असणारी एकाग्रता आणि बुद्धीमत्ता ही त्यांच्या पूर्वजन्मीच्या साधनेमुळे येत असते. पैसा, प्रसिद्धी आणि यश मिळण्यालाही पूर्वपुण्याईच कारणीभूत असते. अर्थात् ‘हे सर्व पूर्वजन्मांमुळे असते’, असे मला म्हणायचे नाही; परंतु या गोष्टी सहज शक्य झाल्यामुळे ‘आपल्याला यापेक्षा वेगळे काहीतरी मिळवायचे आहे’, असा प्रश्न त्यांना पडत नसावा; पण ‘एकाग्रता आणि बुद्धीमत्ता या गोष्टी आपण जन्माला येतांना कशा घेऊन आलो ?’, हे कोडे ते कधीच सोडवू इच्छित नसतात.
येणारा पक्षकार स्वतःच्या अडचणींवर उपाय विचारण्यास आलेला असतो. त्यामुळे सर्वसामान्यपणे अधिवक्ता समोरच्याला ‘सांगण्याच्या’ भूमिकेत असतो. ही भूमिका या व्यवसायाचा आणि अधिवक्त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचाही एक भाग होऊन जाते. मग त्यांना ‘आपल्याला कायद्यातील कळते, तर अध्यात्मातीलही कळते’, असे वाटण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते. ‘आज समाजात साधना आणि अध्यात्म शिकून घेण्याची सर्वाधिक आवश्यकता कुणाला असेल, तर ती अधिवक्त्यांना आहे’, असे मला वाटते. त्याची पुढील कारणे देता येईल.
३ अ. समाजाच्या दृष्टीकोनातून अधिवक्त्याचे महत्त्व : अधिवक्ता हा मुळात एक सामाजिक शास्त्रज्ञ किंवा सामाजिक अभियंता आहे. शास्त्रज्ञाची भूमिका सर्वाेच्च आणि उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्याची असली, तर कनिष्ठ न्यायालयात व्यवसाय करणारे अभियंते नक्कीच आहेत, असे म्हणता येईल. कायद्याच्या माध्यमातून समाजाच्या विकासाची प्रक्रिया घडते. कायदे कुठे चुकतात ? ते कुठे अपूर्ण आहेत ? समाजाला लाभ होण्यासाठी त्यांमध्ये कोणते पालट केले पाहिजेत ? हे अधिवक्ता अचूक जाणू शकतो. जरी हे समाजाच्या दृष्टीकोनातून असले, तरी त्याला स्वत:च्या दृष्टीने साधनेची अधिक आवश्यकता आहे.
३ आ. आधुनिक वैद्यांनी दिलेल्या औषधांच्या साहाय्याने रुग्ण बरा होणे : रुग्ण एखाद्या आधुनिक वैद्यांकडे (डॉक्टरकडे) जातांना ताप, पोटदुखी अशा स्वरूपाची तक्रार घेऊन जातो. या शारीरिक तक्रारींकडे आध्यात्मिक दृष्टीने बघायचे झाले, तर माणसाचे शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पंचमहाभूतांच्या रचनेत बिघाड झाला, तर रोग उद्भवतो. वैद्यांनी दिलेल्या औषधामुळे बिघाडाचे समप्रमाण व्हायला साहाय्य होते आणि रुग्ण बरा होतो.
३ इ. फौजदारी खटल्यांच्या मुळाशी गेल्यास मनुष्याचे षड्रिपू, त्याचा अहं अन् त्याचे प्रारब्ध किंवा कर्मफलन्याय हे असल्याचे लक्षात येणे : अधिवक्त्यांकडे येणार्या पक्षकारांची स्थिती कशी असते ? आपण प्रथम फौजदारी खटले, म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्यांचा विचार करू. फौजदारी न्यायालयांमध्ये अधिवक्ते त्यांच्या अशिलांचे प्रतिनिधित्व करतात. या अशिलांवर फसवणूक, चोरी, दरोडे, हत्या, विनयभंग, बलात्कार, अन्नधान्य अथवा औषधांमध्ये भेसळ, खोटी कागदपत्रे बनवणे, भ्रष्टाचार यांसंदर्भातील नानाविध गुन्हे नोंदवलेले असतात.
जसे आपण वैद्यकीय क्षेत्रातील पंचमहाभूतांचे उदाहरण पाहिले, तसे या फौजदारी खटल्यांमध्ये मुळापर्यंत जाणारे काय असेल ? भारतीय संस्कृती आणि हिंदु तत्त्वज्ञान यांच्या दृष्टीकोनातून पाहिले, तर याचे उत्तर ३ स्वरूपांचे आणि एकत्रितच वाचावे लागेल, ते म्हणजे मनुष्याचे षड्रिपू, त्याचा अहं अन् त्याचे प्रारब्ध किंवा कर्मफलन्याय ! पण त्यांचा अभ्यास संसद, विधी आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांपैकी कुणीही करत नाही.
३ ई. गुन्हा घडण्यास षड्रिपूच कारणीभूत असणे : श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे मनुष्याचे षड्रिपू, म्हणजेच शत्रू सांगितले आहेत. यांपैकी कुठल्यातरी एका रिपूमुळे अथवा अन्य एकत्रित रिपूंमुळे गुन्हा घडतो. उदाहरण म्हणायचे, तर बलात्कार्याला काम, तर फसवणार्याला लोभ आवरता येत नाही. लोभासमवेत ‘मद’ म्हणजेच ‘हा माझे काय बिघडवणार आहे ? त्याला मी बघून घेईन’, अशी भावना असते.
४. अहंकार दुखावल्याने दोन भावांमध्ये वाद निर्माण होऊन त्यांची विचारसरणी टोकाच्या निर्णयापर्यंत जाणे
दिवाणी खटल्यांमध्ये षड्रिपू कारणीभूत असतातच; परंतु त्यासमवेत अहंकारही मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतो. यासाठी एक उदाहरण पाहूया. शेताच्या बांधावरून २ भावांमध्ये किंवा शेतकर्यांमध्ये भांडण होते. कोर्ट-कचेरी चालू होते. एक भाऊ आपल्या अधिवक्त्याला सांगतो, ‘‘साहेब, कितीही व्यय झाला, तरी चालेल; पण या भावाला मी आता सोडणार नाही. काहीही झाले, तरी मी त्याला धडा शिकवणार. मग ही भूमी विकायला लागली तरी चालेल. तुम्ही दावा प्रविष्ट करा.’’ शेताच्या बांधावरील भांडणापायी तो शेत विकण्याच्या गोष्टी का करतो ? कारण त्याचा अहंकार दुखावलेला असतो. अधिवक्त्यांनी त्याच्या समोर येणार्या पक्षकारांच्या मनात जरा डोकावून पहावे. त्यांना अशा भावना निश्चितच पहायला मिळतील.
५. कर्मफलन्यायानुसार दोषी मनुष्य निर्दाेष सुटणे किंवा निरपराध्याला शिक्षा होणे
आता कुणी म्हणेल, ‘एखाद्या निरपराध मनुष्याला जेव्हा पोलीस नाहक खटल्यामध्ये गुंतवतात त्यांचे काय ?’
हा प्रश्न अगदी योग्य आहे. याचेही उत्तर आपल्याला शोधावे लागेल. हे पोलिसांचे पाप आहे कि, त्या निरपराध व्यक्तीचे आधीचे प्रारब्ध आहे ? हे शोधावे लागेल. पोलिसांचे पाप असेल, तर तेथे त्यांचे अहं/त्याचे दोष कार्यरत आहेतच. त्यातून नवीन हिशोब तो पोलीस निर्माण करत नसेल का ? पण असे प्रश्न आपल्याला व्यापक दृष्टीतून आधी पहायला हवेत. मोठे प्रश्न सुटले, तर अनेकदा छोटे प्रश्न आपोआपच सुटतात ही गोष्ट तशीच पहायला लागेल का ?
अनेकदा निरपराध माणसाला शिक्षा होते आणि दोषी निर्दाेष सुटतो, अशीही प्रकरणे अनुभवास येतात. यामागील कार्यकारणभाव काय असेल ? याची चर्चा केली जात नाही किंवा चर्चा झाल्यास ती पाश्चात्त्य चष्म्यातून केली जाते. हिंदु तत्त्वज्ञानानुसार पाहिले, तर आपल्याला काय दिसते ?
‘आपण जे कर्म करू, त्याची फळे ही भोगावीच लागतील’, असे हिंदूंचा कर्मसिद्धांत म्हणतो. ही काही अनाकलनीय संकल्पना नाही, तर सहस्रो वर्षांपासून चालत आलेली आहे. पाश्चात्त्य भौतिकशास्त्र हे न्यूटनच्या ज्या तिसर्या नियमाला मानते, तो नियम म्हणजे ‘क्रियेला तितकीच आणि त्याविरोधातील प्रतिक्रिया असते.’ (Every action has equal and opposite reaction) मग कर्माचा सिद्धांत याहून निराळा काय आहे ?
यात अधिवक्त्यांनी स्वतःचे व्यावसायिक अनुभव आठवावेत. माझ्या काही सहकारी अधिवक्त्यांचे अनुभव असे आहेत की, गुन्हा करून निर्दाेष सुटणारा नंतरचे आयुष्य चांगले जगतोच असे नाही, तो पुन्हा गुन्हा करून कारागृहात जातो अथवा भलत्याच संकटात अडकतो. खरे असे अनुभव आपण गोळा केले पाहिजेत.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (३०.४.२०२२)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/637028.html
साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !हा लेख वाचल्यावर अधिवक्ते अथवा समाजातील व्यक्ती ज्यांनी न्यायप्रक्रियेचा लेखात म्हटल्याप्रमाणे अनुभव घेतला आहे, अशांना यासंदर्भात काही सांगायचे असेल, तर त्यांनी पुढील पत्त्यावर स्वतःचे अनुभव पाठवावेत. तुमची इच्छा असल्यास तुमचे नाव गोपनीय ठेवता येईल. पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर, ‘सुखठणकर रिट्रिट’, फ्लॅट क्र. एजी-४, वागदोर, नागेशी, फोंडा, गोवा. |