घरच्यांचा विरोध पत्करून पतीला पूर्णवेळ साधनेसाठी पाठिंबा देणार्‍या आणि गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा असून सतत कृतज्ञताभावात असणार्‍या ढोकेगाळी (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !

घरच्यांचा विरोध पत्करून पतीला पूर्णवेळ साधनेसाठी पाठिंबा देणार्‍या, मुलांवर साधनेचे संस्कार करणार्‍या आणि गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा असून सतत कृतज्ञताभावात असणार्‍या ढोकेगाळी (तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) !

साधनेची तळमळ आणि भगवंतावर दृढ श्रद्धा असलेले साधक-दांपत्य – श्री. परशुराम अन् सौ. पूजा परशुराम पाटील !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ‘गुरुसेवा हाच ध्यास’ असलेले आणि सर्व भार सर्वार्थांनी भगवंतावर सोपवून आनंदी रहाणारे रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम पाटील !

‘मूळचे खानापूर, बेळगाव (कर्नाटक) येथील श्री. परशुराम पाटील मागील १५ – १६ वर्षांपासून रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. त्यांचे कुटुंबीय खानापूर येथे असतात. श्री. पाटील हे वाहनांशी संबंधित सेवा करत असून रात्री-अपरात्री कधीही आनंदाने आणि उत्साहाने सेवा करतात.

त्यांच्या जीवनात अनेक कौटुंबिक अडचणी येऊनही त्यांनी परिस्थिती सहजतेने स्वीकारली आणि तिचा सेवेवर यत्किंचितही परिणाम होऊ दिला नाही. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अशा परिस्थितीची जाणीव इतरांना कधीच होऊ दिली नाही. त्यांनी सर्व कौटुंबिक भार भगवंतावरच सोपवल्याने भगवंतानेच वेळोवेळी त्यांच्या सर्व अडचणी सोडवल्या.

२. सर्व कौटुंबिक कर्तव्ये विनातक्रार निभावणार्‍या आणि ‘घर म्हणजे श्री गुरूंचा आश्रम आहे’, असा भाव असलेल्या खानापूर (बेळगाव) येथील सौ. पूजा पाटील !

श्री. परशुराम पाटील अनेक वर्षे घरापासून दूर असल्याने त्यांची पत्नी सौ. पूजा पाटील सर्व कौटुंबिक कर्तव्ये आनंदाने पार पाडत आहेत. घरी कितीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली, तरी ‘पतीच्या साधनेत खंड नको’, म्हणून त्या प्राप्त परिस्थितीला देवावरील श्रद्धेच्या बळावर एकट्या सामोरे जातात.

घरातील कामे सेवा म्हणून करून आणि ‘घर म्हणजे श्री गुरूंचा आश्रमच आहे’, असा भाव ठेवून त्या प्रयत्न करतात. सौ. पाटील यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना संत आणि साधक यांचा विशेष सत्संग मिळाला नसतांनाही त्यांनी जलद आध्यात्मिक उन्नती केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांवर सुसंस्कार करून त्यांनाही साधनेची गोडी लावली.

श्री. परशुराम आणि सौ. पूजा पाटील यांनी एकमेकांच्या केवळ आध्यात्मिक प्रगतीचा विचार करून सर्वच पती-पत्नींपुढे एक फार मोठा आदर्श ठेवला आहे. ‘विवाहातील सप्तपदीप्रमाणेच अध्यात्मातील सप्तपदीही एकत्र चालणार्‍या पाटील दांपत्याची अशीच उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती होऊ दे’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.३.२०२०)

१. बाबांनी पूर्णवेळ साधनेसाठी अनुमती मागितल्यावर आईने लगेचच होकार देणे आणि त्यानंतर आईने कुटुंबाचे पूर्ण दायित्व सांभाळणे

श्री. परशुराम पाटील
सौ. पूजा पाटील

‘बाबा (श्री. परशुराम पाटील , आताची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) गोव्याला नोकरी करत असतांना त्यांचा सनातन संस्थेशी संपर्क आला. तेव्हापासून त्यांनी साधनेला आरंभ केला. त्यानंतर बाबांनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी आईकडे अनुमती मागितली. तेव्हा आईने बाबांना होकार दिला. ती म्हणाली, ‘‘दोन वेळचे जेवण मिळणे आणि मुलांना सांभाळणे एवढेच तुमचे कर्तव्य पार पाडा. यातच मी समाधानी आहे.’’ (त्या वेळी आईला ‘तुम्ही जिथे असाल, तिथून तुमचे आमच्यावर लक्ष असू दे’, असे सांगायचे होते.) ‘बाबांनी साधना करावी आणि आम्हा सगळ्यांना साधनेत पुढे घेऊन जावे’, इतकीच आईची अपेक्षा होती. यातच तिला समाधान होते. आईने बाबांना प्रोत्साहन दिले; म्हणून बाबा रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करू शकले. बाबा आश्रमात असतांना आईने संपूर्ण घराचे दायित्व सांभाळले.

२. आजोबांनी बाबांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध केल्यावर बाबांना खंबीरपणे पाठिंबा देणारी आई !

२ अ. बाबांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यावर आजोबांनी आमच्या कुटुंबाला कोणतेही साहाय्य करण्यास नकार देणे : बाबांनी पूर्णवेळ साधना करण्याचा त्यांचा निर्णय माझे आजोबा (वडिलांचे वडील) आणि घरातील इतर कुटुंबीय यांना सांगितला. त्या वेळी आजोबांनी बाबांना विरोध केला. ते म्हणाले, ‘‘तू चाकरी (नोकरी) केली नाहीस, तर तुझ्या कुटुंबाला कोण सांभाळेल ? मी तर तुला काही देणार नाही. तुझे तू बघ.’’ त्या वेळी आजोबा रेल्वेमध्ये चाकरीला असल्याने त्यांच्याकडे पुरेसे पैसेही होते, तरीही तेव्हा त्यांनी आमचे (आई आणि आम्ही दोन भावंडे यांचे) दायित्व घेण्यास नकार दिला.

२ आ. आजोबांचे घर सोडून दुसरीकडे रहायला जावे लागणे : आई आणि बाबा यांनी आजोबांचा हा निर्णय शांतपणे स्वीकारला. ते त्यांना उलट बोलले नाहीत. आमचे एकत्र कुटुंब होते. त्यानंतर आम्ही आमचे घरातील सामान घेऊन दुसरीकडे रहायला गेलो. त्या वेळी आई साधनेत नव्हती. ती बाबांना धीर देत म्हणाली, ‘‘काहीही झाले, तरी साधना सोडायची नाही.’’ तिच्यामुळे बाबांना साधनेसाठी प्रोत्साहन मिळाले.

२ इ. बाबांच्या मित्राचे घर रहायला मिळणे आणि मित्राने कोणताही मोबदला न घेता ४ वर्षे त्या घरी राहू देणे : त्यानंतर बाबांनी त्यांच्या एका मित्राला घडलेला प्रसंग सांगून ‘‘रहाण्यासाठी घर मिळेल का ?’’, असे विचारले. मित्राने बाबांना सांगितले, ‘‘तू माझ्या घरात हवे तितके दिवस राहू शकतोस.’’ त्या मित्राने बांधलेल्या घरात अनेक वर्षे कुणीच रहात नव्हते. आई-बाबांनी घराची स्वच्छता केली. त्यानंतर आम्ही तेथे राहू लागलो. त्या मित्राने आमच्याकडून कोणताही मोबदला न घेता ४ वर्षे आम्हाला त्यांच्या घरी राहू दिले.

बाबांनी आमची आवश्यक ती सोय केली आणि वर्ष २००१ पासून ते रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करू लागले.

३. कष्ट करून आनंदाने कुटुंबियांचे दायित्व स्वीकारणारी आई !

श्री. सूरज पाटील

३ अ. आईने परिस्थिती स्वीकारून चाकरी करून मुलांचा सांभाळ करणे, बाबा आश्रमातून घरी अल्प दिवस रहायला येत असूनही आईने त्यांना कधीही घरी जास्त दिवस रहाण्याचा आग्रह न करणे : आई पहिल्यापासून शांत स्वभावाची आहे. ती इतरांना समजून घेते. प्राप्त परिस्थिती स्वीकारून ती नेहमी समाधानी असते. बाबा आश्रमात रहायला गेल्यानंतर प्रारंभी मासातून (महिन्यातून) एकदा घरी यायचे आणि २ – ३ दिवसांनी परत जायचे. आता मात्र आम्ही मोठे झाल्यापासून त्यांना कधी वेळ मिळाला, तरच ते घरी येतात. असे असूनही आईने त्यांना ‘तुम्ही अजून काही दिवस थांबा’, असे कधीच म्हटले नाही किंवा आग्रहही केला नाही. तिने ही परिस्थिती आनंदाने स्वीकारली. तिने स्वतः चाकरी करून आम्हाला सांभाळले.

३ आ. कठीण परिस्थितीला विनातक्रार सामोरे जाऊन कर्तव्यकर्मे पार पाडणे : आम्ही लहान असतांना आमच्या गावी वाहनांची सोय नव्हती. त्यामुळे घरातील सामान आणण्यासाठी आईला ३ कि.मी. चालत जावे लागायचे. एवढे कष्ट होत असूनही तिने त्याविषयी कधीच गार्‍हाणे (तक्रार) केले नाही. आजपर्यंत जी परिस्थिती समोर आली, ती स्वीकारून तिने ‘कर्तव्य’ म्हणून एकटीने सर्व केले. नातेवाईक आईला विचारत असलेल्या प्रश्नांनाही ती शांतपणे उत्तरे द्यायची.

३ इ. बाबांमधील पालट पाहून आजोबांनी साहाय्य करणे आणि आईनेही आनंदाने आजोबांची काळजी घेणे : कालांतराने माझ्या बाबांमधील सकारात्मक पालट पाहून आणि आई एकटीच सर्व करत असल्याचे पाहून माझ्या आजोबांनी त्यांच्या घराशेजारीच आम्हाला घर बांधायला जागा दिली आणि घर बांधण्यास साहाय्यही केले. त्यानंतर आम्ही पुन्हा आजोबांच्या शेजारी रहायला गेलो. माझे काका परगावी स्थायिक झाल्यामुळे आईच आजोबांची काळजी घेते, उदा. त्यांना रुग्णालयात नेणे, वेळच्या वेळी औषधे देणे, त्यांना काही हवे-नको ते पहाणे इत्यादी. हे सर्व ती आनंदाने करते.

३ ई. बाबा सणाला घरी येत नसल्याने नातेवाइकांनी विचारलेल्या प्रश्नांना आईने शांतपणे उत्तरे दिल्याने वाद टळणे : बाबा कुठल्याही सणाला घरी येत नाहीत. गणेशोत्सवालाही ते पाचव्या दिवशी घरी यायचे आणि तीन दिवसांनी परत आश्रमात जायचे. बाबा सणाला घरी न आल्याने नातेवाईक आणि गावातील लोकही आईला बाबांविषयी सतत प्रश्न विचारायचे. त्या वेळी आई शांत राहून सर्वांना समजावून सांगायची, ‘‘त्यांना सेवा अधिक असल्यामुळे ते नंतर येणार आहेत.’’ आईने या गोष्टीवरून घरात कधी वाद होऊ दिला नाही आणि बाबांनाही घरी येण्याचा आग्रह केला नाही. ती शांत राहून घरातील सर्व सांभाळत असल्याने सणासुदीलाही घरातील वातावरण चांगले असते.

४. मुक्या प्राण्यांवर असलेले आईचे प्रेम !

आईचे प्राण्यांवर पुष्कळ प्रेम आहे. ती घरातील मांजराची काळजी घेते. तिच्यामुळे ती मांजर सात्त्विक झाली आहे. आई नामजप करतांना मांजर तिच्या शेजारी येऊन बसते. तिचा नामजप पूर्ण होईपर्यंत ती मांजरही घंटाभर बसते. आई रांगोळी काढत असतांना ती तिच्या जवळ जाऊन बसते. आईने कुंकू लावल्यावर मांजरीला कुंकू लावले नाही, तर ती तिच्या पायाशी घुटमळते आणि तिने तिला कुंकू लावल्यानंतरच ती शांत होते.

५. आईच्या साधनेला प्रारंभ

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रथम पाहिल्यावर आईची भावजागृती होणे आणि तिच्या साधनेला आरंभ होणे : साधनेमुळे बाबांमध्ये झालेला पालट पाहून आई साधना करू लागली. त्या कालावधीत परात्पर गुरु डॉक्टरांची माणिकवाडी (जिल्हा बेळगाव) येथे जाहीर सभा झाली. त्या वेळी आईने परात्पर गुरु डॉक्टरांना प्रथमच पाहिले. त्यांना पाहून आईचा भाव जागृत झाला. तिची त्यांच्यावर श्रद्धा बसली. तेव्हापासून ती तळमळीने साधना करू लागली.

५ आ. मुलांना साधनेची गोडी लावणे : आई साधना करू लागल्यावर तिने मला आणि माझ्या धाकट्या भावाला साधना करण्यास शिकवले. त्यामुळे आम्ही दोघे लहान असल्यापासून नामजप करू लागलो. आमच्याकडून प्रतिदिन नियमितपणे नामजप करून घेतला. ती आम्हाला म्हणते, ‘तुम्हाला हवे ते माझ्याकडे मागा, मी ते देईन; पण तुम्ही साधना करा.’ तिच्या अशा प्रेमळ बोलण्यानेच आमच्यात साधनेची इच्छा आणि गोडी निर्माण होते.

५ इ. आईने तत्त्वनिष्ठ राहून बाबांच्या चुका सांगून त्यांना साधनेत साहाय्य करणे : बाबा घरी आल्यावर आई बाबांना साधनेत साहाय्य करते. पूर्वी बाबांना पुष्कळ राग यायचा. बाबा घरी आल्यावर आई त्यांना त्याची जाणीव करून द्यायची. ती म्हणायची, ‘तुम्ही संतांच्या संगे आश्रमात रहाता, तर तुमचा राग न्यून व्हायला हवा.’ तिने बाबांना हे पुनःपुन्हा सांगितल्यामुळे बाबांच्यात पालट होण्यास साहाय्य झाले.         (क्रमश:)

– श्री. सूरज परशुराम पाटील (सौ. पूजा पाटील यांचा मोठा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०१९)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/637312.html