मुलांवर साधनेचे संस्कार करणार्‍या आणि गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा अन् सतत कृतज्ञताभावात असणार्‍या ढोकेगाळी (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !

मुलांवर साधनेचे संस्कार करणार्‍या आणि गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा अन् सतत कृतज्ञताभावात असणार्‍या ढोकेगाळी (तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूजा परशुराम पाटील !

१७.१२.२०२२ या दिवशीच्या अंकात ढोकेगाळी (तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूजा परशुराम पाटील यांच्याविषयी त्यांचा मुलगा श्री. सूरज पाटील यांनी लिहिलेली काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/636712.html

सौ. पूजा पाटील

६. सेवेची तळमळ 

६ अ. नातेवाइकांकडे कार्यक्रमाला न जाता सेवेला प्राधान्य देणे : नातेवाइकांच्या घरी लग्न, पूजा इत्यादी कोणताही कार्यक्रम असल्यास आई त्यांचे मन न दुखावता त्यांना ‘येते’, असे सांगते; परंतु ती सेवेला प्रथम प्राधान्य देते आणि सेवा झाल्यानंतरच नातेवाइकांकडे कार्यक्रमाला जाते. तेथेही ती आवश्यक तेवढाच वेळ देते. एकदा माझ्या मामाच्या घरी त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त पूजा होती. त्याच दिवशी उत्तरदायी साधकाने आईला सेवेसाठी बोलावले. तेव्हा तिने सेवेलाच प्राधान्य दिले. मामाने तिला विचारले, ‘‘तू सेवेला गेलीस, तर इथली कामे कोण करणार ?’’ तेव्हा आई म्हणाली ‘‘माझी दोन्ही मुले कामे करतील’’ आणि ती सेवेला निघून गेली.

६ आ. नातेवाइकांना साधना करण्यास प्रोत्साहन देणे : मामांच्या नवीन घराचा गृहप्रवेश विधी होता. त्या वेळी आईने मामांना श्रीकृष्णाची मोठी प्रतिमा दिली. त्यांनी ती घराच्या प्रवेशद्वारावर लावली. तेव्हापासून मामांना वाटते, ‘श्रीकृष्ण जिवंत आहे आणि तो माझ्याकडेच सतत बघत आहे.’ हे त्यांनी आईला सांगितल्यावर आईने त्यांना श्रीकृष्णासमोर समोर बसून प्रतिदिन नामजप करण्यास सांगितले. तेव्हापासून मामा प्रतिदिन श्रीकृष्णासमोर बसून नामजप करतात. त्यामुळे आता त्यांना घरात कुठलाही त्रास होत नाही.

६ इ. चाकरीच्या ठिकाणी सहकर्मचारी असलेल्या साधिकेसमवेत साधना आणि सेवा करणे : आई अंगणवाडीतील मुलांना शिकवते. तिच्या समवेत काम करत असलेली सेविकाही साधिका आहे. त्यामुळे भाववृद्धी सत्संग, तसेच सेवेला जाण्यासाठी त्या दोघींना एकमेकींचे साहाय्य होते. त्या दोघी एकमेकींना साधनेसाठी साहाय्य करतात. त्या एकमेकींचा साधनेचा आढावा घेतात. त्यामुळे तिथेही तिची साधना होते.

७. आई करत असलेले भाववृद्धीचे प्रयत्न

श्री. सूरज पाटील

७ अ. आई सतत नामजप करण्याचा प्रयत्न करते.

७ आ. प्रत्येक कृती भावाच्या स्तरावर करणे : आई प्रत्येक कृृती भावाच्या स्तरावर करते. ती प्रत्येक कृती करतांना पुढीलप्रमाणे भाव ठेवते.

७ आ १. घरातील केर काढतांना : आई केर काढतांना ‘आश्रमातील केर काढत आहे’, असा भाव ठेवते आणि मोठ्याने प्रार्थना करते, ‘घरातील वाईट शक्ती बाहेर जाऊ दे. आश्रमातील चैतन्याप्रमाणे घरात चैतन्य निर्माण होऊ दे.’

७ आ २. अंघोळ करतांना : अंघोळीसाठी घेतलेले जल म्हणजे ‘परात्पर गुरुदेवांनी दिलेले तीर्थ आहे’, असा भाव ठेवून आई प्रार्थना करते, ‘या तीर्थाने माझे सर्व रोग नष्ट होऊ देत.’ ती अंघोळ करतांना मोठ्याने नामजप करते.

७ आ ३. कपडे धुतांना : आई ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांचे कपडे धूत आहे’, असा भाव ठेवते आणि त्यांच्या कृपेने कपडे धुण्याची सेवा मिळाली; म्हणून कृतज्ञता व्यक्त करते.

७ इ. आई दुपारी ४ वाजता चाकरीवरून घरी आल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ जवळ घेऊन बसते आणि तो पहात भाववृद्धीसाठी प्रयत्न करते.

८. सतत कृतज्ञताभावात रहाणे

आईमध्ये पुष्कळ भाव आहे. तो तिच्या प्रत्येक कृतीतून जाणवतो. आई सातत्याने कृतज्ञताभावात रहाते. ती देवाजवळ कृतज्ञता व्यक्त करतांना सतत म्हणते, ‘मला परात्पर गुरुदेवांसारखे गुरु भेटले. यांच्यासारखे (बाबांसारखे) पती मिळाले. चांगल्या स्वभावाची मुले मिळाली.’

९. ‘रामनाथी आश्रमातील पाणी म्हणजे तीर्थच !’, असा आईचा भाव असणे

‘रामनाथी आश्रमातील पाणी म्हणजे तीर्थ आहे’, असा तिचा भाव आहे. त्यामुळे ती बाबांना घरी येतांना आश्रमातील तीर्थ आणायला सांगते. ती बाबांनी आणलेल्या तीर्थातील अर्धे तीर्थ पिण्याच्या पाण्यात ओतते आणि अर्धे तीर्थ तसेच ठेवते. ती जेव्हा आजारी असते, तेव्हा ती ‘परात्पर गुरुदेवांचे तीर्थ’ या भावाने ते पिते. तिला तिच्या भावाप्रमाणे त्याचा लाभही होतो.

१०. आईचा संतांप्रतीचा भाव

बाबा आश्रमातून आल्यावर घरात प्रवेश करताच आई बाबांच्या पायांवर डोके ठेवून त्यांना नमस्कार करते आणि नंतर ती त्यांची विचारपूस करते. ती आम्हालाही बाबांना नमस्कार करायला सांगते. ‘बाबा आश्रमात राहून संतांच्या सहवासातील चैतन्य घेऊन आले आहेत. त्यांना नमस्कार केल्यावर त्या चैतन्याचा आम्हा सर्वांना लाभ होईल’, असा तिचा भाव असतो.

११. बहुगुणी आणि प्रेमळ आई दिल्याविषयी मुलाने व्यक्त केलेली कृतज्ञता !

आईने आम्हाला चांगले वळण लावले, प्रेम दिले आणि साधनेची गोडी लावली. ‘प्रत्येक गोष्ट करतांना भाव कसा ठेवायचा’, हे तिनेच आम्हाला शिकवले. बाबा पूर्णवेळ साधना करत असल्याने स्थानिक साधकांच्या माध्यमातून देवानेच आईला साहाय्य केले. आईच्या सहकार्यामुळेच बाबांना पूर्णवेळ साधना करता आली. अशी गुणी आणि प्रेमळ आई दिली, यासाठी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’          (समाप्त)

– श्री. सूरज परशुराम पाटील (सौ. पूजा पाटील यांचा मोठा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०१९)

६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. परशुराम पाटील यांच्यात त्यांचा मुलगा श्री. सूरज याला जाणवलेले पालट  !

१. तोंडवळा प्रकाशमान आणि तेजस्वी जाणवणे

श्री. परशुराम पाटील

‘पूर्वी मला बाबा (श्री. परशुराम पाटील) सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे वाटायचे. मार्च २०१९ मध्ये मी घरून रामनाथी आश्रमात साधना करण्यासाठी आलो. तेव्हा त्यांना पहाताक्षणीच मला त्यांचा तोंडवळा प्रकाशमान आणि तेजस्वी वाटला.

२. राग न्यून होणे

माझे बाबा पूर्वी रागीट स्वभावाचे होते, तसेच ते कुणाचेही ऐकत नसत. आता त्यांच्यात पुष्कळ पालट झाला आहे. आता ते शांत झाले आहेत आणि इतरांनाही समजून घेतात. मागील एक मास मी त्यांच्यासह सेवा करत आहे. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात प्रतिदिन मला पालट जाणवत आहे. एकाच वेळी २ – ३ सेवा करत असतांना ते चिडचिड न करता पूर्वीच्या तुलनेत आता सर्वांशी नम्रतेने वागतात.

३. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर बाबा दिवसभर भावावस्थेत असणे

मी आश्रमात आल्यावर साधक मला म्हणायचे, ‘‘आता तुझ्या बाबांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करतील’’; पण माझ्या मनात असा विचार कधीच आला नाही. त्यानंतर एका सोहळ्यात बाबांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या दिवशी बाबा देवाच्या पुष्कळ अनुसंधानात होते. मी त्यांना प्रथमच एवढ्या भावावस्थेत पाहिले.

बाबांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा सर्व कुटुंबियांना पुष्कळ आनंद दिला. यासाठी आम्ही सगळेच परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञ आहोत.’

– श्री. सूरज परशुराम पाटील (श्री. परशुराम पाटील यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०१९) ॐ