तवांगमध्ये चिनी सैन्य भारतीय सीमेत घुसखोरी करत होते ! – लेफ्टनंट जनरल कलिता

सीमेवरील स्थिती सामान्य आणि नियंत्रणात असल्याची माहिती

लेफ्टनंट जनरल कलिता

कोलकाता (बंगाल) – चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील यांगत्सेमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भारतीय सैन्याने चिनी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चिनी सैन्याला परत फिरणे भाग पडले. मी देशवासियांना आश्‍वस्त करतो की, भारतीय सैन्य कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहे, असे प्रतिपादन भारतीय सैन्याच्या पूर्व कमांडचे लेफ्टनंट जनरल कलिता यांनी केले.

ते येथे ५१ व्या विजय दिवसानिमित्त पत्रकारांशी बोलत होते. ‘सध्या सीमेवरील स्थिती सामान्य आणि नियंत्रणात आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताने वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश युद्धात पाकिस्तानला पराभूत केल्यानिमित्त प्रतिवर्षी भारत १५ डिसेंबर हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करतो.