|
नागपूर – महाराष्ट्राने गेल्या ६ वर्षांत वातावरणीय पालटाशी संबंधित विविध घटनांमध्ये ३५ जिल्ह्यांमध्ये १९ सहस्र ६३७ कोटी रुपयांची हानीभरपाई दिली आहे. तीव्र हवामान घटना, पूर आणि चक्रीवादळे यांमुळे सर्वाधिक बाधित झालेले नांदेड, बीड, जालना, संभाजीनगर, नाशिक आणि सांगली या प्रत्येक जिल्ह्याला १ सहस्र कोटी रुपयांहून अधिक हानीभरपाईची रक्कम देण्यात आली आहे, अशी माहिती नागपूरस्थित ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट’च्या (सी.एफ्.एस्.डी.) संस्थापक लीना बुद्धे यांनी १३ डिसेंबर या दिवशी दिली.
वर्ष २०१६ आणि २०२१ मध्ये राज्याने अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वारा यांमुळे झालेल्या हानीपोटी ८१२६.९६ कोटी रुपये दिले. अतीवृष्टी आणि पूर यांपोटी ४१२६.०४ कोटी रुपये, तर केवळ मुसळधार पावसामुळे ३९९२.७ कोटी रुपये, पुरामुळे होणारी हानी अल्प करण्याच्या उपायांसाठी ७६९.८५ कोटी रुपये आणि चक्रीवादळाने झालेल्या हानीसाठी २६६६.४७ कोटी रुपये दिले आहेत.
‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस’चे संशोधन संचालक, सहयोगी प्राध्यापक आणि आयपीसीसीचे मुख्य लेखक अंजल प्रकाश म्हणाले, ‘‘सांगली, कोल्हापूर, चिपळूण यांसारख्या भागांत आलेला महापूर आणि इतर काही प्रदेशांत वातावरणात झालेले पालट यांचा राज्याला असलेला धोका उघड झाला आहे. राज्यातील काही भागांत दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने तेथे पाणी पुरवण्यासाठी विशेष रेल्वे पाठवावी लागते.’’