चीनकडून त्याच्या नागरिकांना अफगाणिस्तान त्वरित सोडण्याची सूचना

काबुलमध्ये चिनी हॉटेलवर इस्लामिक स्टेटने केलेल्या आक्रमणाचा परिणाम !

बीजिंग (चीन) – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील चीनच्या मालकीच्या लाँगन हॉटेलवर आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर चीनने त्याच्या नागरिकांना अफगाणिस्तान लवकरात लवकर सोडण्याची सूचना केली आहे. या आक्रमणात ३ आतंकवाद्यांसह ५ जण ठार झाले होते. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने घेतले होती. इस्लामिक स्टेट अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या विरोधात आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी या आक्रमणाचे वर्णन ‘भीषण’ असे केले. चीनने या घटनेची तपशीलवार चौकशी करण्याची मागणी करून चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तालिबान सरकारला योग्य ती पावले उचलण्यास सांगितले आहे.