मुखेड तालुक्यातील (जिल्हा नांदेड) हंगरगा आणि गुंडोपंत दापका या २ ग्रामपंचायतींच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. असे असतांनाच या विरोधात २० नोव्हेंबर आणि २ डिसेंबर या दिवशी ग्रामसेवकांनी ‘या दोन्ही ग्रामपंचायतींची फेरचौकशी करू नये, गटविकास अधिकार्यांना दिलेले निलंबनाचे आदेश रहित करावेत’, आदी मागणींसाठी असहकार आंदोलन केले. ग्रामसेवकांची ही कृती म्हणजे ‘चोर तो चोर वर शिरजोर !’
सरकारी कार्यालयांमध्ये ‘लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे’, असे पत्रक लावलेले असते. ते केवळ औपचारिकता म्हणून नाहीतर सध्या ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.’ पैसे न मोजता एखादे सरकारी काम होऊच शकत नाही, अशी सद्यःस्थिती असतांना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये; म्हणून आंदोलन करणारे ग्रामसेवक हे कुठल्या प्रशासकीय कारभाराचे उदाहरण जनतेसमोर ठेवू पहात आहेत ? ‘आम्ही भ्रष्टाचार करू; पण तुम्ही त्या विरुद्ध आवाज उठवायचा नाही आणि आवाज उठवाल, तर आम्ही असहकार आंदोलन करू’, ही मानसिकता देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. प्रशासनाने या ४० ग्रामसेवकांना निलंबित केले आहे; पण यावर निलंबन इतकीच शिक्षा पुरेशी आहे का ? निलंबन केले, तरी न्यायालयात निकाल लागेपर्यंत त्यांचे अर्धे वेतन घरबसल्या चालूच राहील आणि पुढे या प्रकरणाची चौकशी झालीच नाही, तर त्यांना पुन्हा शासकीय सेवेत रुजूही केले जाईल. सध्या काम करणारी प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे आणि न्याययंत्रणा तात्काळ न्याय मिळवून द्यायला असमर्थ असेल, तर जनतेने कुणाकडे पहायचे ?
भ्रष्टाचाराची मानसिकता समूळ नष्ट करायची असेल, तर त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. यासाठी लहानपणापासूनच शालेय अभ्यासक्रमात प्रामाणिकतेचे धडे विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत. जेणेकरून येणारी पुढची पिढी ही राष्ट्राभिमानी आणि समाजाची जाण मनात ठेवणारी असेल. वाल्या कोळीच्या घरच्यांनी जो पवित्रा घेतला, तोच पवित्रा देशातील प्रत्येक नागरिकाने घेणे अपेक्षित आहे, तसेच भ्रष्टाचार करणार्यांच्या विरुद्ध कठोर कायदे आणि शिक्षा झाली पाहिजे. कायद्याची भीती मनात न राहिल्याने हे लोक मनमानी कारभार करत आहेत. सद्यःस्थितीमध्ये भ्रष्टाचार हा १० रुपयांचा असो किंवा लाखो रुपयांचा शिक्षा ही कठोरच हवी. नाहीतर ‘चोर तो चोर …’ ही मानसिकता वाढायला वेळ लागणार नाही.
– श्री. जयेश बोरसे, पुणे