‘गॅलप वर्ल्ड’ या संस्थेच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष !
वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्या १० वर्षांच्या कालावधीमध्ये जागतिक स्तरावर महिलांच्या रागीटपणामध्ये वाढ झाली आहे, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘गॅलप वर्ल्ड’ या संस्थेने वर्ष २०११ ते २०२१ या १० वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील १५० देशांमधील १२ लाख लोकांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष घोषित केला आहे.
अ. १० वर्षांपूर्वी महिला आणि पुरुष यांच्यातील रागीटपणाचे प्रमाण पाहिले, तर महिलांपेक्षा पुरुष अधिक रागीट होते; पण गेल्या १० वर्षांमध्ये हे प्रमाण वाढले आहे. पुरुषांपेक्षा महिला ६ टक्के अधिक रागीट झाल्या आहेत. भारतीय महिलांचा विचार करता हे प्रमाण १२ टक्के आहे. म्हणजे जगातील इतर महिलांच्या तुलनेने भारतीय महिलांचा रागीटपणा दुप्पट प्रमाणात वाढला आहे.
आ. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये रागीटपणाची ही पातळी अधिकच वाढल्याचे लक्षात आले. भारत आणि पाकिस्तान देशांमधील महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.
भारत की महिलाएं ज्यादा गुस्सैल, आखिर क्या कहती है गैलप वर्ल्ड पोल की ये रिपोर्ट?#LatestNews #gallupworldpoll https://t.co/FTscs0W3zI
— Zee Delhi-NCR Haryana (@ZeeDNHNews) December 9, 2022
इ. मानसोपचार तज्ञ डॉ. लक्ष्मी विजय कुमार यांनी दिलेला माहितीप्रमाणे महिला आता स्वावलंबी असल्याने स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या कोणत्या निर्णयाला पुरुषांनी विरोध केला, तर त्यांना राग येतो.
ई. महिला बाहेरच्या जगात जरी स्वावलंबी असल्या, तरी घरात मात्र पितृसत्ताक पद्धत अद्यापही अस्तित्वात असल्याने हा असमतोल सहन करणे त्यांच्यासाठी अवघड जाते आणि त्यातूनच त्यांच्यातील रागीटपणा वाढत चालला आहे.
उ. शिक्षणाचा प्रसारही वाढल्याने महिलांच्या अपेक्षाही वाढत चालल्या आहेत. शिक्षणाच्या तुलनेत जर अपेक्षित वेतनाची नोकरी मिळाली नाही, तर तेही राग वाढण्याचे एक कारण मानले जात आहे.