पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर रॉकेट लाँचरद्वारे आक्रमण

  • खलिस्तानी आतंकवादी पन्नू याने घेतले आक्रमणाचे दायित्व !

  • गुप्तचर विभागाकडून देण्यात आली होती पूर्वसूचना !

तरनतारन (पंजाब) – येथील सरहाली पोलीस ठाण्यावर ९ डिसेंबरच्या रात्री रॉकेट लाँचर द्वारे रॉकेट डागण्यात आले. रॉकेट डागून आक्रमणकर्ते पळून गेले. या आक्रमणात कोणतीही हानी झाली नाही. पोलीस ठाण्याच्या खिडकीच्या काचा फुटल्या. सुरक्षा यंत्रणांनी याला आतंकवादी आक्रमण म्हटले आहे, तर दुसरीकडे खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत पन्नू याने या आक्रमणाचे दायित्व घेतले आहे. विशेष म्हणजे ‘अशा प्रकारे आक्रमण होऊ शकते’, अशी पूर्वसूचना गुप्तचर विभागाकडून पंजाब पोलिसांना देण्यात आली होती.

(सौजन्य : Republic World)

१. पन्नू याने म्हटले आहे की, पंजाब सरकारने जालंधरच्या लतीफपुरा येथे वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानातून आलेल्या कुटुंबांना बेघर केले. हा त्याचा सूड आहे. पंजाबमधील प्रत्येक घरात रॉकेट लाँचर आणि बाँब पोचले आहेत. यामुळे पंजाबला भारताच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळेल.

२. पन्नू याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना, ‘माजी मुख्यमंत्री बियंत सिंग यांच्या मार्गावर चालणार्‍यांना त्यांच्याकडे पाठवले जाईल. धाडस असेल, तर तरनतारनचा पूल ओलांडून दाखवा’, अशी धमकी दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून खलिस्तानी आतंकवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे पहाता केंद्र सरकारने आताच कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !
  • गुप्तचर विभागाकडून पूर्वसूचना मिळूनही पंजाब पोलीस झोपा काढत असतील, तर हे देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. आतापर्यंत अनेकदा गुप्तहेरांनी पूर्वसूचना देऊनही सुरक्षायंत्रणा गाफील राहिल्याचे समोर आले आहे. याविषयी आता केंद्र सरकारने कठोर होण्याची आवश्यकता आहे !