वर्ष २०२१ च्या दत्तजयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील साधक, धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

७ डिसेंबर या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने…

‘१८.१२.२०२१ या दिवशी अनेक ठिकाणच्या दत्तमंदिरांमध्ये ‘दत्तजयंती’चा उत्सव साजरा झाला. सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली. दळणवळण बंदीनंतर ग्रंथप्रदर्शनाची सेवा पुन्हा करायला मिळाल्यामुळे सर्व साधकांमध्ये कृतज्ञताभाव आणि उत्सुकता होती. सर्व साधकांना या सेवेतून आनंद मिळाला.

सनातनच्या साधकांसह सत्संगात आणि धर्मशिक्षणवर्गात येणारे जिज्ञासू, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनीही विविध सेवांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती अन् समाजातून मिळालेला विशेष प्रतिसाद यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

१. मुंबईत ठिकठिकाणच्या दत्तमंदिरांत लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे

१ अ. सौ. सुहासिनी परब, वडाळा

१ अ १. श्री दत्तमंदिर, नायगाव, भोईवाडा येथे मंदिराच्या पुजार्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद अनुभवणे : ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला २ दिवस ग्रंथप्रदर्शनाची सेवा करण्याची संधी मिळाली. प्रदर्शन सेवा झाल्यावर मंदिराचे पुजारी श्री. आंब्रेगुरुजी आणि विश्वस्त श्री. रमेश पवार म्हणाले, ‘‘वर्ष २०२१ हे मंदिराच्या स्थापनेचे १०० वे वर्ष आहे. तुम्ही लावलेल्या ग्रंथप्रदर्शनामुळे आमचा उत्सव चांगला झाला आणि पुष्कळ भाविक दर्शनाला आले !’’ ग्रंथप्रदर्शन झाल्यावर त्यांनी स्वतःहून साधकांना बोलावून त्यांच्यासह छायाचित्रे काढली आणि साधकांना श्रीफळ अन् प्रसाद दिला.’

१ आ. सौ. मेघना सागवेकर, वरळी

१. ‘प्रभादेवी येथील दत्तमंदिरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला येथील नगरसेविका आणि मुंबईच्या माजी उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांनी सदिच्छा भेट दिली.

२. एक जिज्ञासू म्हणाल्या, ‘‘मी पुष्कळ दिवसांपासून सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन शोधत होते. साधकांना पाहून आणि भेटून मला पुष्कळ आनंद झाला.’’

१ इ. सांताक्रूझ येथील सत्संगात येणार्‍या जिज्ञासू श्रीमती सविता तावडे (वय ७० वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे

१ इ १. ग्रंथप्रदर्शनावर सेवा करायची तीव्र इच्छा असणे; पण ते रहित झाल्याचे कळल्याने मन निराश होणे आणि देवळात गेल्यावर ग्रंथप्रदर्शन लागल्याचे पाहून आनंद होऊन सेवेची इच्छा पूर्ण होणे : ‘ग्रंथप्रदर्शनावर सेवा करण्याची माझी पुष्कळ इच्छा होती; पण मला ‘ग्रंथप्रदर्शन रहित झाले आहे’, असे कळले आणि त्यामुळे माझे मन निराश झाले. नंतर मी दत्तजयंतीनिमित्त देवळात गेले, तर मला तेथे  ‘सनातन संस्थे’ने लावलेले ग्रंथप्रदर्शन आणि साधक दिसले. ते पाहून मला पुष्कळ आनंद झाला. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच मला तिथे पाठवले’, असे मला जाणवले. साधकांनी मला सेवेला बोलावल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. ग्रंथप्रदर्शन पहायला आलेल्या जिज्ञासूंचा प्रतिसाद पुष्कळ चांगला होता. त्यामुळे मला उत्साह वाटत होता. सेवा करतांना माझे पाय दुखले नाहीत आणि मला थकवाही जाणवला नाही. ‘ज्यांना सात्त्विक उत्पादने मिळाली नाहीत, त्यांच्यापर्यंत ती पोचायला पाहिजेत’, असे मला वाटले.

१ इ २. लहान मुलांची देवाप्रती असलेली ओढ पाहून कृतज्ञता वाटणे : लहान मुले देवतांची चित्रे असलेली पदके आणि चित्रे घ्यायला ग्रंथप्रदर्शनावर आली. तेव्हा त्या मुलांमध्ये मला देवताच दिसत होत्या. मुलांमध्ये देवाबद्दल असलेली इतकी ओढ पाहून मला देवाबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

१ ई. गोरेगाव येथील सत्संगात येणार्‍या जिज्ञासू सौ. हर्षदा टकले

१ ई १. ‘ग्रंथप्रदर्शनाची सेवा म्हणजे ज्ञानाचा प्रसार’, असा भाव ठेवून सेवा करणे : ‘ग्रंथप्रदर्शनावर सेवेला जायची मला खूप ओढ लागली होती. गोरेगाव (प.) येथे लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी मी सेवा करत असतांना उत्पादनांचे वितरण होत होते. त्या वेळी मला ‘आपल्याला सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करायचा आहे’, हे गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) लक्षात आणून दिले. तेव्हा माझ्याकडून तशी प्रार्थना झाली. ग्रंथांची माहिती सांगायला आरंभ केल्यावर अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्या वेळी उत्तरदायी साधकांनी काही उपाय सुचवले. हे उपाय केल्यावर खूप फरक जाणवला. सर्व साधकांचे संघटित प्रयत्न वाढले आणि त्याचा परिणाम जाणवू लागला. सेवा आणखी परिणामकारक होण्यासाठी साधक वेगवेगळे प्रयत्न करू लागले. हे सर्व मी गुरुकृपेनेच मी अनुभवू शकले, त्याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता !

२. ठाणे येथील सत्संगात येणार्‍या जिज्ञासूंना जाणवलेली सूत्रे

२ अ. सौ. संगीता वालावलकर (शिक्षिका)

२ अ १. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने सेवेतून भीडस्तपणा न्यून होऊन आत्मविश्वास वाढणे : ‘मी ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी उभी असतांना ‘तुम्ही शिक्षिका असून येथे का उभ्या आहात ?’, असे मला काही परिचित लोकांनी विचारले. मी फलकावर धर्मशास्त्राचे लेखन करणे, ही सेवा करते. आरंभी ही सेवा करत असतांना मी फलक लिहायचे; पण कुणी काही प्रश्न विचारला, तर भीडस्तपणामुळे मी उत्तर देण्याचे टाळत असे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझा भीडस्तपणा जाऊन माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

फलकावर लिखाण करतांना एक गृहस्थ ‘परात्पर गुरु डॉक्टर’ आणि ‘सनातन संस्थेचे कार्य’, यांविषयी नेहमी अयोग्य बोलायचे. ते मला आवडत नसे; पण मला त्यांना उत्तर देता येत नव्हते. त्यानंतर मी माझ्या प्रार्थना वाढवल्या. आता त्या गृहस्थांनी काही प्रश्न विचारलेच, तर मी त्यांना आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकते. ‘गुरुदेवांच्या कृपेने माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला’, याचा मला पुष्कळ आनंद वाटतो.

२ अ २. फलक लेखनाच्या सेवेविषयी समाजाचा सकारात्मक प्रतिसाद पाहून आनंद होणे : आता माझ्याकडून अधिकाधिक फलक लेखनाची सेवा होत आहे. सार्वजनिक ठिकाणी फलकावर लिखाण करत असतांना मला काहींनी सांगितले, ‘‘फलक आता हसरा झाला आहे. त्यामुळे पुष्कळ चांगले वाटते. तुम्ही नेहमी फलक लिहित जा.’’ मध्यंतरी काही कारणाने माझ्याकडून फलकांवर लिखाण करायला जमले नाही. तेव्हा तेथील काही जणांनी मला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘तुम्ही फलक लिहायला आला नाहीत. तुम्ही ठीक आहात ना ?’’ लोकांचा चांगला प्रतिसाद पाहून मला पुष्कळ आनंद झाला. आधी मी केवळ मला सांगितले आहे; म्हणून सेवा करत होते. आता ही सेवा अधिकाधिक वेळ करण्याचा माझा निश्चय झाला आहे.’

२ आ. सौ. रूपा दुबे

२ आ १. सेवेला जातांना अडचण आल्यामुळे देवाला प्रार्थना करणे आणि अडचण दूर होऊन सेवेला जाता येणे : ‘मी ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी सायंकाळी ६ वाजता जाणार होते; पण अकस्मात् माझा मुलगा आणि यजमान यांना बाहेर जावे लागले. घरी ९५ वर्षांच्या माझ्या सासूबाई आहेत. त्यांना घरात एकट्या सोडून मी सेवेला जाऊ शकत नव्हते. तेव्हा मी देवाला शरणागतीने प्रार्थना केली. तितक्यात माझी बहीण घरी आली. तिला पाहून मला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. बहिणीला सासूबाईंच्या समवेत बसण्याची विनंती करून मी ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी गेले.

२ आ २. जिज्ञासूंना भ्रमणभाष करून ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची मागणी घेतांना पुष्कळ आनंद अनुभवता येणे : सेवेच्या ठिकाणी मला पुष्कळ चैतन्य आणि सकारात्मकता जाणवली. मी सतत प्रार्थना करत होते, ‘गुरुदेव, माझ्याकडून काहीतरी सेवा करवून घ्या !’ तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने मला परिचितांना भ्रमणभाष करून त्यांच्याकडून सात्त्विक उत्पादनांची मागणी घेण्याचे सुचले. तेव्हा प्रत्येक जिज्ञासूने मला ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची मागणी दिली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून सेवा करून घेतली’, याचा मला पुष्कळ आनंद झाला.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २५.१२.२०२१)

(क्रमशः)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधक, धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक