नगर येथील मिशनरी शाळेत शीख विद्यार्थ्यावर धर्मांतरासाठी दबाव : शाळेच्या उपमुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा नोंद !

धर्मांतरबंदी कायद्याची अनिवार्यता स्पष्ट करणारी घटना !

नगर – तू नावासमोर सिंग का लावतोस ? पगडी का घालतोस ? मोठे केस का ठेवतोस ? हातात कडे का घालतोस ? आमच्या शाळेत यायचे असेल, तर हे सगळे काढून टाक आणि इतर मुलांप्रमाणे रहा. यासाठी इतर धर्माचा स्वीकार कर किंवा ख्रिस्ती धर्मात ये, असे इयत्ता नववीत शिकणार्‍या हरदिलसिंग सोदी या शीख विद्यार्थ्याला धमकावणार्‍या राहुरीतील ‘डिपल इंग्लीश मिडियम स्कूल’चे उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणी शीख धर्मियांनी संताप व्यक्त केला असून ते लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंग वधवा यांनी सांगितले. (देशातील ख्रिस्त्यांच्या शाळांतत बहुतेक वेळा अशा प्रकारचा छळ केला जात असल्याच्या घटना समोर येऊनही सरकारी यंत्रणा याविषयी ठोस पावले उचलतांना दिसत नाहीत. त्यामुळे पालकांनीच आता   अशा शाळांमध्ये त्यांच्या पाल्यांना पाठवायचे कि नाही ?, हे ठरवले पाहिजे ! – संपादक)

हरदिलसिंग याने सांगितले की, मी धर्मांतर करण्यास ठाम नकार दिल्याने या गोष्टीचा राग येऊन फादर जेम्स मला मारण्यासाठी अंगावर धावून आले आणि विविध कारणे सांगून मला धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करू लागले.