बॉलीवूड आणि हवाला !

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३० नोव्हेंबरला ९ घंटे चौकशी केली. देवरकोंडा याच्या ‘लायगर’ चित्रपटासाठी जो पैसा पुरवण्यात आला आहे, त्यात ‘फेमा’ (परकीय चलन) कायद्याचे उल्लंघन होऊन त्यासाठी विदेशी चलनाचा वापर झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या अगोदर चित्रपटाचे निर्माते चार्मी कौर आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांचीही याच प्रकरणी चौकशी झाली आहे. तेलंगाणा येथील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने या चित्रपटात ‘हवाला’चा पैसा गुंतवण्यात आल्याची तक्रार केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे केली होती. यानंतर याचे अन्वेषण चालू झाले. त्यामुळे ‘या चौकशीमागे भाजप आहे’, असे म्हणण्याचे काही कारण नाही. याच चित्रपटात ज्या अभिनेत्रीने काम केले आहे, त्या अनन्या पांडे हिचेही यापूर्वी ‘कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज’ प्रकरणात संशयित आरोपी आर्यन खान याच्याशी संबंधित अमली पदार्थ सेवन करण्याच्या संदर्भात अमली पदार्थ नियंत्रक विभागाने अन्वेषण केले आहे. ‘लायगर’ चित्रपटात सहभागी असलेल्यांची ही वादग्रस्त पार्श्वभूमी येथे मुद्दामहून नमूद करावीशी वाटते. ‘लायगर’ चित्रपटाद्वारे काळा पैसा पांढरा झाल्याच्या आरोपात कितपत तथ्य आहे ?’, असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित होतो. त्याही पुढे जाऊन ‘काळा पैसा पांढरा होण्याचा प्रकार अन्य चित्रपटांच्या माध्यमातूनही होतो का ?’, याचीही चौकशी व्हायला हवी. अलीकडेच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने ४०० कोटी रुपयांचा गल्ला कमावल्याचे म्हटले गेले. प्रत्यक्षात या चित्रपटाचे खेळ चालू असतांना चित्रपटगृहे रिकामी असल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली होती. हीच स्थिती काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ या हिंदुद्रोही चित्रपटाची ! हिंदुद्वेषी चित्रपट अभिनेता आमिर खान यांचा हा चित्रपट. याला हिंदूंनी प्रचंड विरोध केला आणि त्या चित्रपटाच्या विरोधात बहिष्काराचे शस्त्र उगारले. चित्रपटाची कथाही तशी सुमार आणि हिंदूंच्या भावना दुखावणारी; मात्र हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे, तर विदेशांतही म्हणे ‘सुपरहिट’ झाला. या चित्रपटाच्या वेळी ‘हाऊसफुल’ची पाटी चित्रपटगृहांच्या बाहेर लावली गेली होती; मात्र प्रत्यक्षात चित्रपटगृहे ओस पडली होती. असे असतांना चित्रपट ‘सुपरहिट’ होण्याचे कोडे काही सुटलेले नाही. ते सुटण्यासाठी  ‘लायगर’ चित्रपटाविषयी नुसती चौकशी नको, तर सत्य जनतेला समजायला हवे.

अनेक कलाकारांचे अन्वेषण !

यापूर्वीही महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी २०० कोटी रुपयांच्या हेराफेरीच्या संदर्भात अन्वेषण करतांना अभिनेत्री श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी, जॅकलिन फर्नांडिस यांसह अनेकांची नावे जोडली असल्याचे समोर आले आहे. यांतील नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांचे अन्वेषण झाले आहे. आयकर विभागाच्या एका अहवालात म्हटले आहे की, चित्रपट निर्मितीसाठी पैशांचा एक मोठा भाग ‘हवाला’च्या माध्यमातून गुंतवला जातो. ज्यामुळे केवळ करचोरीच होते, असे नाही, तर कायदा-सुव्यवस्थेसाठीही तो एक मोठा धोका आहे. चित्रपट क्षेत्रात या मार्गाने गुंतवला जाणारा बहुतांश पैसा हा काळा पैसाच असतो. अनेक निर्माते आणि वितरक यांचे ‘अंडरवर्ल्ड’शी अत्यंत घनिष्ठ संबंध असून या माध्यमातून ‘अंडरवर्ल्ड’ चालवणारे त्यांना हवे ते साध्य करून घेतात. चित्रपट निर्मिती करणार्‍या अनेक आस्थापनांनी त्यांची कार्यालये परदेशातही उघडली आहेत. ज्याच्यावर केंद्रीय यंत्रणांचे लक्ष आहे.

मार्च २०२२ मध्ये उत्तराखंड येथील ‘सायबर क्राईम युनिट’ला भोपाळमधील २ चित्रपट निर्मात्यांनी १०० कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण करतांना या प्रकरणात मुंबईतील अभिनेता आणि दिग्दर्शक यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. वर्ष १९९७ मध्ये ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रिज’चे सर्वेसर्वा गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील एक संशयित म्हणून संगीतकार नदीम अख्तर सैफी याचेही एक नाव होते. ‘यातील खुन्यांशी आणि अंडरवर्ल्डमधील अनिस कासकर, अबू सालेम, कय्यूम यांच्याशी संबंध होते अन् दुबईत खुनाचा कट रचला गेला’, असे पोलिसांचे म्हणणे होते. नंतर चाललेल्या खटल्यात पुरेशा पुराव्यांअभावी नदीम याचे नाव खटल्यातून वगळण्यात आले होते; मात्र यावरून हे लक्षात येते की, ‘अंडरवर्ल्ड’ चित्रपट सृष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किती जुन्या काळापासून काम करत आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथून अमली पदार्थ हे पंजाबमार्गे भारतभरात वितरित केले जातात. एकूणच भारत आणि हिंदु धर्म यांवर आघात करण्यासाठी ‘बॉलिवूड जिहाद’चे षड्यंत्र आहे, असा आरोप कर्नाटकातील चित्रपट वितरक तथा उद्योजक श्री. प्रशांत संबरगी यांनी मागे केला होता. त्याचे प्रत्यक्ष पुरावेच ‘लायगर’च्या निमित्ताने आता मिळत आहेत.

‘आदर्श कोण ?’, हे ठरवण्याची वेळ !

वरील उदाहरणे ही केवळ समोर आलेली उदाहरणे असून यापेक्षा कैकपटींनी अधिक व्यवहार हे पडद्याआड चालतात. सध्या राष्ट्रप्रेमी मोदी शासन सत्तेत असल्याने त्यांनी या सर्व ‘रॅकेटस्’ना उद्ध्वस्त करण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्यांना ज्यांना आजचे तरुण आदर्श मानतात, त्यांतील बहुतांश कलाकारांची वैयक्तिक पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. अनेक अभिनेते हे अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, तसेच अन्य व्यसनांच्या अधीन आहेत. काही जण तर राष्ट्रविघातक कारवायांना पाठिंबा देतात. अशांनी पांघरलेला मानवतावाद, सुधारणावाद यांचा बुरखा फाडणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे अशांना आदर्श मानणार्‍या तरुणांनी लक्षात घ्यायला हवे. ज्यांनी देव, देश आणि धर्म यांसाठी बलीदान दिले, अशांचा आदर्श समोर ठेवणे अपेक्षित आहे !