हिंदुद्वेषाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे !

आपल्याला ज्या गोष्टींविषयी माहिती असते, ती परिपूर्ण मानून आपण त्या आधारे काहीतरी निष्कर्ष काढत असतो किंवा त्याविषयी स्वतःचे मत बनवत असतो. तथापि त्याच गोष्टींमध्ये असे अनेक पैलू असतात, ज्यांविषयी आपल्याला काहीही ठाऊक नसते. गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर झालेल्या टीकेच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. इस्रायलमधील साम्यवादी डोक्याचे निर्माते नदव लॅपिड यांनी ‘हा चित्रपट अश्लील आणि प्रचारकी आहे’, असे अत्यंत संतापजनक विधान केले. त्यावरून त्यांच्यावर सध्या देशभरातून टीका केली जात आहे.

‘जिहाद’ हा शब्द आपल्यापैकी अनेकांना ऐकून माहिती असेल. ‘जिहाद पुकारणे आणि त्यानुसार कृती करणे, म्हणजे नेमके काय असते ?’, हे जर जाणून घ्यायचे असेल, तर १९९० च्या दशकात इस्लामी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदूंच्या केलेल्या वंशविच्छेदाकडे पहायला हवे. त्या वेळी इस्लामी आतंकवाद्यांनी असंख्य हिंदूंच्या हत्या केल्या. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार केले. अनेकांना काश्मीर खोर्‍यातून पळून लावले. त्यांची घरे, मालमत्ता आणि भूमी सर्रासपणे बळकावल्या. एवढे करूनही या ‘निधर्मी’ भारतात कुणीही या घटनेविरुद्ध एक शब्दही बोलले नाही. तत्कालीन केंद्र सरकार आणि राज्य सरकार डोळ्यांवर पट्टी बांधून शांत राहिले. तथाकथित मानवतावादी, साम्यवादी, काँग्रेसवाले, पुरोगामी, बुद्धीवादी आदी सर्व जण मूग गिळून गप्प बसले. परिणामी तब्बल साडेचार लाख काश्मिरी हिंदूंना स्वतःच्या हक्काच्या भूमीतून निर्वासित व्हावे लागले आणि आजही त्यांना कुणीही वाली नाही, ही वस्तूस्थिती आहे. याला म्हणतात जिहाद ! या अत्याचारांना ३२ वर्षांनंतर काही प्रमाणात वाचा फोडली, ती दिग्दर्शक विवेकरंजन अग्नीहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने. सांगायचे तात्पर्य इतकेच की, हा चित्रपट हॉलिवूड, बॉलिवूड आदींसारख्या झगमगाटातील चित्रपटांसम मनोरंजनात्मक चित्रपट नव्हता, तर लाखो हिंदूंच्या भावना मांडणारा होता. त्यामुळे लाखो हिंदूंनी तो पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक हिंदूंना स्वतःच्या धर्मबांधवांवर झालेल्या अमानुष अत्यारांविषयी माहिती समजली. असे असतांना नदव लॅपिड यांनी या चित्रपटाला कोणत्या तोंडाने ‘अश्लील’ आणि ‘प्रचारकी’ संबोधले ? त्यांना भारतातील गोष्टींत नाक खुपसण्याचा काय अधिकार ?, हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत. लॅपिड हे या महोत्सवात चित्रपटांचे परीक्षण करणार्‍या मंडळाचे प्रमुख अर्थात् ‘ज्युरी’होते. याखेरीज ते इस्रायलमधील चित्रपट निर्मातेही आहेत. अशा पदावरील व्यक्तीला हिंदूंच्या आघातांवरील घटना ‘अश्लील’ आणि ‘प्रचारकी’ वाटत असतील, तर ‘या चित्रपटाविषयी निरीक्षण नोंदवतांना ते शुद्धीत होते का ?’, असा प्रश्न पडल्याविना रहात नाही.

लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’वरील प्रतिक्रिया एकाएकी व्यक्त केलेली नाही. त्याकडे नीट पाहिल्यास हिंदुद्वेषाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे सहजपणे उलगडतात. ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करतांना लॅपिड तीच भाषा बोलत होते, जी भारतातील पुरोगामी, बुद्धीवादी, साम्यवादी आदी मंडळी बोलत असतात. म्हणूनच या सर्वांप्रमाणे लॅपिड यांनीही ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करणे, हा योगायोग असू शकत नाही. म्हणूनच वर ‘अनेक गोष्टींमधील पैलू आपल्याला ठाऊक नसतात’, असे म्हटले आहे. अनेक बिभत्स आणि घाणेरडे चित्रपट लॅपिड यांना ‘अश्लील’ वाटत नाही; पण कश्मीर फाइल्स वाटतो, यातच सर्व आले !

सरकारी व्यासपिठावरून हिंदुविरोध !

दुर्दैव म्हणजे लॅपिड ज्या व्यासपिठावरून हिंदुविरोधी बरळले, ते गोव्यातील आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे व्यासपीठ सरकारचेच होते. लॅपिड यांच्या हिंदुद्वेषी विधानांवर सरकारी पातळीवरून काहीही कारवाई झालेली नाही. याउलट इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांनी मात्र तात्काळ याचा निषेध करून या वक्तव्याविषयी क्षमा मागितली. कुणीही उपटसुंभ आपल्या देशात येतो, हिंदूंच्या भावना दुखावून निघून जातो आणि आपल्याकडील कुणीही काहीही बोलत नाही, इतक्या हिंदूंच्या भावना बोथट झाल्या आहेत. सरकारी पातळीवरील आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे लॅपिड यांच्यासारख्या हिंदुद्वेषी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची ‘ज्युरी’ म्हणून का आणि कुणी निवड केली ?, त्याचे नाव समोर आले पाहिजे, या निवडीमागचे निकष काय होते ? हेही समजणे महत्त्वाचे आहे. अशी व्यक्ती कधी तरी चित्रपटांचे समतोल समीक्षण करू शकेल का ? लॅपिड यांनी ही हिंदुद्वेषी गरळओक केल्यानंतर ‘मी येथे माझ्या भावना मनमोकळेपणाने मांडू शकतो’, असे विधान केले. थोडक्यात एक ख्रिस्ती व्यक्ती हिंदूबहुल भारतात येऊन हिंदूंच्या विरोधात सहजपणे गरळओक करून सुरक्षितपणे निघून जाऊ शकते. तरीही पुरोगामी, तसेच विदेशी मानवाधिकार संघटना हिंदूंनाच तालिबानी ठरवतात. लॅपिड यांनी इस्लामविरोधी विधान कधी सौदी अरेबिया, पाकिस्तान किंवा अन्य इस्लामी देशांत करून दाखवले असते का ? केले असते, तर कदाचित् ते तेथून परत जाऊही शकले नसते.

लॅपिड यांचा हिंदुद्वेषच ‘प्रचारकी !’

वास्तविक ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सत्य इतिहासावर आधारित आहे. मग अशा चित्रपटाला विरोध करणे, ही इतिहासाची गळचेपी नव्हे का ?  एरव्ही ‘इतिहासाची गळचेपी होते’, अशी ओरड करणारे लॅपिड प्रवृत्तीवालेच ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करून इतिहासाची गळचेपी करत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. लॅपिड यांनी हिंदूंना डिवचल्यामुळे पुरोगामी, साम्यवादी, काँग्रेसवाले, धर्मांध, बुद्धीवादी आदींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. आव्हाड यांच्यासारखे लोकप्रतिनिधी तर उघडपणे लॅपिड यांची बाजू घेत आहेत. यावरून ‘द कश्मीर फाइल्स’ नव्हे, तर लॅपिड यांचा हिंदुद्वेषच ‘प्रचारकी’ होता, हेच खरे !