संपादकीय : युक्रेनला आरसा भेट द्या !

‘कीव इंडिपेंडेंट’च्या वृत्तानुसार युक्रेनच्या सैन्य गुप्तचर विभागाने असा दावा केला आहे की, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणात वापरलेल्या शस्त्रांमध्ये भारतातील बेंगळुरूस्थित एका आस्थापनाने बनवलेली इलेक्ट्रॉनिक चिप सापडली आहे. या घटनेच्या आधारावर या युद्धात भारत रशियाला साहाय्य करत असल्याचे खोटे कथानक पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशांमध्ये वाद निर्माण करून युद्धाला प्रोत्साहन देणार्‍या अशा बातम्यांमागील वास्तव समजून घेणे आवश्यक आहे. भारताकडे बोट दाखवण्याआधी युक्रेने स्वतःकडे पाहिले पाहिजे. रशियाच्या शस्त्रांमध्ये भारतीय बनावटीचा एखादा भाग सापडल्यावर आक्षेप घेणार्‍या युक्रेनने दशकानुदशके भारतासह जगभरात आतंकवाद पसरवणार्‍या पाकिस्तानला शस्त्रे पुरवली आहेत. वर्ष २००८ मधील मुंबईवरील आक्रमण असो वा वर्ष २०१९ मधील पुलवामा येथील आक्रमण यांसारखी भारतावरील अनेक आक्रमणे पाकिस्तान प्रायोजित आतंकवादाचे परिणाम आहेत. अशा देशाला शस्त्र देणार्‍या युक्रेनला भारताच्या सुरक्षेचा विचार आला होता का ? कि आताची ही केवळ राजकीय खेळी आहे, जिचा नैतिकतेशी काहीही संबंध नाही ? हा युक्रेनचा भारताविरुद्धचा प्रकार उघड उघड दुटप्पीपणा आहे.

भारताची संरक्षण उपकरणांची निर्यात ही अत्यंत काटेकोर परवाने आणि नियम यांद्वारे केली जाते. अनेक वेळा नागरी वापरासाठी बनवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर अन्य देशांतील आस्थापनांकडून शस्त्र उत्पादनात केला जातो. त्यामुळे एखादी भारतीय चीप रशियाच्या शस्त्रांत सापडणे म्हणजे ‘भारत सरकारने त्यासाठी अनुमती दिली’, असा अर्थ होत नाही. युक्रेनने ज्या प्रकारे पाकिस्तानला शस्त्रे दिली, तसे भारताने रशियाला विशेषतः वर्ष २०२२ नंतरच्या काळात कोणतेही थेट सैनिकी साहाय्य केल्याचा पुरावा नाही. रशिया-युक्रेन युद्धावर भारताने नेहमीच तटस्थ आणि शांततेच्या बाजूने भूमिका घेतली आहे. इतकेच नव्हे, तर युक्रेनने स्वतः रशिया-युक्रेन युद्धात भारताच्या मध्यस्थीची मागणी केली होती. एका बाजूला भारताकडून मध्यस्थीची मागणी करायची आणि दुसरीकडे भारताकडे बोट दाखवायचे, असा प्रकार युक्रेनकडून चालू आहे. युक्रेनला जर भारताकडून सहकार्य आणि नैतिकता जपण्याची अपेक्षा असेल, तर त्याने भारतावर आक्षेप घेणे थांबवायला हवे. कोणत्याही प्रकारच्या बातम्यांमधील अशा खोट्या आरोपांना बळ देणे, ही युक्रेनची नैतिक आणि धोरणात्मक चूक असून भारतावर आरोप करून युक्रेन जगाचे लक्ष स्वतःच्या प्रश्नांकडे वळवू इच्छित आहे. त्यामुळे भारताने युक्रेनला साहाय्य करतांना समवेत काही आरसेही पाठवायला हवेत, म्हणजे युक्रेनही स्वतःची नीतीमत्ता त्यात पडताळून पाहू शकेल !