नैतिकतेचे अधःपतन !

शिक्षिकेला ‘आय लव्ह यू मेरी जान’ म्हणणारे विद्यार्थी – नैतिकतेचे अधःपतन !

उत्तरप्रदेशातील मेरठ येथील डॉ. राम मनोहर स्मारक इंटर कॉलेजमधील एका शिक्षिकेला अमन, अतश आणि कैफ हे विद्यार्थी ‘आय लव्ह यू मेरी जान’ असे म्हणतांनाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात शगुफा नावाची मुसलमान मुलगीही सहभागी आहे. शगुफा आणि अमन ही भावंडे आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे अश्लाघ्य कृत्य करत असतांना त्यांनी त्याचे ध्वनीचित्रीकरणही करून ते प्रसारित केले. थोडक्यात ते करत असलेले कुकृत्य त्यांना झाकून ठेवायचे नव्हते, तर ते समाजातही प्रसारित करायचे होते. यातून त्यांची उद्दाम वृत्ती आणि त्यांना कशाचेही भय नसल्याचे स्पष्ट होते. मुलांना हे कृत्य करण्यास साहाय्य करणारी शगुफा ही मुलगी आहे, तर हे ध्वनीचित्रीकरण चालू असतांना वर्गातील काही मुली हसतांना दिसत आहेत. सामान्यतः एका स्त्रीवर अशा प्रकारे अन्याय होत असतांना तिला होणारा त्रास किंवा यातना हे दुसरी स्त्रीच समजू शकते; मात्र येथे मुली हसून संबंधित मुलांना प्रोत्साहन देतांना दिसत आहेत, तर स्वतःचा भाऊ हे कुकृत्य करत असतांना शगुफा त्याला साहाय्य करतांना दिसत आहे. एका विशिष्ट समाजातील युवकांकडून मुली आणि महिला यांचे होणारे लैंगिक शोषणाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असतांना महिला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घातक आहे. वास्तविक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांच्या आयुष्यात कर्तव्यनिष्ठ आणि सत्शील शिक्षक लाभणे महत्त्वाचे असते. येथे मात्र विद्यार्थी शिक्षिकेचे जीवन उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. विद्यार्थ्यांच्या नैतिकतेचा स्तर इतका खालावला असतांना त्याला उत्तरदायी कोण ?

पूर्वी भावी पिढीवर संस्कार होण्यासाठी कुटुंब, समाज, शिक्षकवर्ग असे सर्वजण प्रयत्न करत असत. संस्कारहीन, बेशिस्त मुलांना ताळ्यावर आणण्यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवून प्रयत्न केला जात असे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रसंगी त्यांना कठोर शिक्षाही दिली जात असे. आज असे होतांना दिसत नाही. शिक्षिकेला त्रास देणार्‍या या मुलांना शिक्षा होईल का ? आणि समजा झालीच, तर ती पुरेशी असणार का ? या मुलांना मोकाट सोडले, तर शिक्षिकेला त्रास देणारी ही मुले समाजातील मुली आणि महिला यांच्याशी कशा प्रकारे वागतील, याचाही विचार व्हायला हवा. नीतीवान पिढी घडवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र पालट हवा, हे मात्र नक्की !