जगाने इराणशी संबंध तोडावेत !

अयातुल्ला खामेनी यांच्या भाचीचेच जगाला आवाहन

इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (डावीकडे) त्यांची भाची आणि इराणमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या फरीदेह मोरादखानी (उजवीकडे)

तेहरान (इराण) – इराणमध्ये हिजाबच्या विरोधातील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून चालूच आहे. हिजाबचे आंदोलन दडपण्यावरून लोकांमध्ये सरकारच्या विरोधात रोष कायम आहे. आता इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची भाची आणि इराणमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या फरीदेह मोरादखानी यांनी जगातील देशांना इराणशी सर्व संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे फरीदेह यांना पोलिसांनी अटक केली आहे. फरीदेह यांनी आतापर्यंत १५ वर्षांचा कारावास भोगला आहे. फरीदेह यांचे वडील इराणमध्ये विरोधी पक्षनेते होते. त्यांनी खामेनी यांच्या बहिणीशी विवाह केला होता.

१. व्यवसायाने अभियंता असलेल्या फरीदेह यांनी याविषयी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, या खुनी आणि बालहत्या करणार्‍या सरकारला पाठिंबा देणे थांबवा. ही राजवट आपल्या कोणत्याही धार्मिक तत्त्वाशी एकनिष्ठ  नाही. शक्ती आणि सत्ता टिकवून ठेवण्याखेरीज कोणतेही नियम या सरकारला ठाऊक नाहीत.

२. इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनात आतापर्यंत ४५० आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. यांत ६३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, तसेच १८ सहस्रांहून अधिक आंदोलनकर्त्यांना इराण सरकारने अटक केली आहे.