अखंड भारतासाठी लढणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना फाळणी मान्य नव्हती; पण जवाहरलाल नेहरू यांनी ती अगोदरच मान्य केली होती ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

  • सावरकरांवरील आरोपांचा प्रतिवाद करत पुराव्यांद्वारे विरोधकांची चिरफाड

  • सावरकरांचे योगदान जाणण्यासाठी जुन्या नोंदी बाहेर काढून सत्य समोर आणण्याचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

श्री. रणजित सावरकर

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चिखलफेक करणार्‍यांना स्वातंत्र्याच्या चळवळीतील सावरकर आणि अन्य जहाल क्रांतीकारक यांचे योगदान जाणून घ्यायचे असेल, तर पोलिसांच्या जुन्या धारिकांमध्ये दडलेल्या सगळ्या नोंदी बाहेर काढा, मग सगळे सत्य समोर येईल, असे आवाहन मी मुख्यमंत्र्यांकडे करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड भारतासाठी लढत असतांना नेहरूंनी अगोदर फाळणीला तत्त्वतः मान्यता दिल्याचे खंडीभर पुरावे उपलब्ध असून त्याविषयी काँग्रेसी आजही मूग गिळून बसले आहेत, असा घणाणाती आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीवरील ‘माझा कट्टा’ या संवाद कार्यक्रमात केला. स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर होणार्‍या विविध आरोपांचा प्रतिवाद करतांना त्यांनी तत्कालीन विविध कागदपत्रांचे पुरावे सादर करत विरोधकांच्या आरोपांची चिरफाड केली.

ते पुढे म्हणाले…

१. हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेत आल्यामुळे हिंदुत्वाचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती केल्याने मतांचे ध्रुवीकरण होते. हेच धोरण गत २० वर्षांपासून काँग्रेसने अवलंबले आहे. पूर्वी वाजपेयी सरकार आणि आता पुन्हा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सावरकर यांच्या जाहीर अपकीर्तीला प्रारंभ झाला.

२. वर्ष २००० मध्ये सावरकर यांना ‘कपूर कमिशन’ने दोषी ठरवले’, असा धादांत चुकीचा आरोप काँग्रेसने त्याकाळी पसरवला. मुळात ‘कपूर कमिशन’ कुणी वाचले, तर लक्षात येईल की, गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी शेवटचे १० दिवस काँग्रेस सरकार पूर्णतः अपयशी ठरले होते.

३. राहुल गांधी यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा असल्याने त्यांना ठाऊक नाही की, सुटकेचा अर्ज हा अनेक क्रांतीकारकांनी केला होता. स्वतः गांधीही यात सहभागी आहेत. ‘शत्रूला दिलेले वचन मोडण्यासाठीच असते’, हे सावरकरांनीच लिहून ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी माफी कधीही मागितली नाही.

४. वर्ष १९२४ मध्ये सावरकरांना सोडले, तेव्हा चालू असणार्‍या सहकार आंदोलनाच्या काळात अटकेत असलेल्या गांधींनाही ‘अपेंडिक्स’च्या शस्त्रक्रियेमुळे सोडण्यात आले होते. ब्रिटिशांनी कोणतीही अट घातली नसताना गांधींनीही स्वातंत्र्याचे राजकारण पूर्णपणे सोडून सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. सावरकरांवर मात्र स्वातंत्र्याचे राजकारण सोडण्याविषयी ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक गंभीर अटी लादल्या होत्या.

५. सावरकर हे सर्वांत प्रखर क्रांतीकारी होते. ब्रिटीश सरकारला ते अत्यंत धोकादायक वाटत होते; म्हणून याचे सर्व परिणाम त्यांना भोगावे लागले. याउलट काँग्रेस आणि गांधी यांचे होते. कारावासातही सर्व सोयीसुविधा काँग्रेसी नेते आणि गांधी यांना मिळत असत.

६. भगतसिंह हे सावरकरांना भेटले होते. चंद्रशेखर आझाद हे स्वतः सावरकर सदनात राहिले होते. राजगुरू हे बाबाराव सावरकर यांचे शिष्य होते. अशा प्रकारे कारावासातून बाहेर आल्यानंतर सावरकर यांचे अनेक क्रांतीकारकांचे संघटन आणि चळवळ चालूच होती.

७. २४ घंटे पोलिसांच्या पहार्‍यात राहूनही सावरकर यांनी गुप्तपणे हे कार्य चालू ठेवले. तरीही काँग्रेसी म्हणतात, ‘‘सावरकर स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय राहिले नाहीत.’’

८. वर्ष १९४२ मध्ये ‘चले जाव’ आंदोलनाच्या वेळी गांधीजींनी मुस्लिम लीगचे साहाय्य मागितले होते. ‘त्या मोबदल्यात जिनांना पंतप्रधान करू’, हे आश्‍वासन गांधींनी दिले होते; पण याला सावरकरांचा ठाम विरोध होता; म्हणून ते यात सहभागी झाले नाहीत. ‘मुस्लिम लीगचे लांगूलचालन केले नाही, तरच आंदोलनात सहभागी होऊ’, ही सावरकरांची भूमिका होती. जिना जर पंतप्रधान झाले असते, तर देशात केव्हाच अराजक माजले असते.

९. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर केवळ एक ब्रिटिश सैनिक मारला गेला; म्हणून गांधींनी आंदोलन मागे घेतले. अनेकदा ब्रिटिशांनी देहलीहून विमाने बोलवून आंदोलकांवर मशीनगनने गोळीबार केला. या सैन्य कारवाईविरुद्ध गांधींनी कधी साधा निषेधही नोंदवला नाही, उलट आपल्या पत्रात ‘ब्रिटिशांना आपण हानी पोचवली, हे लज्जास्पद आहे; म्हणून शासनाने हा गोळीबार केला’, असा खुलासा गांधींनी केला.

१०. सावरकांना फाळणी मान्य नव्हती, तर नेहरूंना फाळणी अगोदर मान्य होती. माउंटबॅटन यांनी नेहरू कुटुंबियांना सिमल्याला नेऊन याविषयी विनवले. नेहरूंनी केवळ ७२ दिवसांत फाळणी मान्य केली. माउंटबॅटन यांनी ‘फाळणी १ वर्षानंतर म्हणजे जून-जुलै १९४८ मध्ये व्हावी, जेणेकरून रक्तपात किंवा दंगली होणार असल्यास पोलीस आणि प्रशासन यांना सक्षमपणे सिद्ध करता येऊन त्याची तीव्रता अल्प करण्यात येईल’, असा कयास ठेवला होता. नेहरूंनी घाई करत १ वर्ष अगोदरच म्हणजे १९४७ मध्ये फाळणी व्हावी, यासाठी अडून बसले. काँग्रेसला या रक्तपाताची साधी कल्पनाही नव्हती.

११. ब्रिटिशांनी, ‘फाळणीमुळे रक्तपात होईल आणि ब्रिटीश शासन अपकीर्त होईल’, अशी काळजी व्यक्त केल्यावर, ‘या रक्तपाताचे दायित्व ब्रिटिशांचे नाही, तर भारतियांचे असेल’, असे सांगून नेहरूंनी फाळणीचा हेका कायम ठेवला. यात पुढे जाऊन ‘आम्हाला लवकर सत्ता दिल्यास मुस्लिम लीगच्या सर्व अटी आणि शर्ती मान्य करू’, असेही नेहरूंनी माउंटबॅटन यांना सांगितले.

१२. सावरकरांना ते स्थानबद्ध असल्यामुळे आणि उदरभरणाची आवश्यकता म्हणून कायद्यानेच ‘पेन्शन भत्ता’ मिळत होता. गांधीजींनासुद्धा आगाखान पॅलेसमध्ये हा भत्ता मिळत होता. तो अनेक क्रांतीकारकांना मिळाला आहे, यात वाद घालण्यासारखे काहीही नाही.