लम्पी विषाणूच्या संसर्गातून बर्‍या झालेल्या २५ गायींसाठी उघडण्यात आले द्वारकाधीश मंदिर !

  • गोशाळेचे मालकांचा गायींसह ४५० कि.मी. पायी प्रवास !

  • मालकाने बोलला होता नवस !

द्वारका (गुजरात) – कच्छ येथील गोशाळेतील २५ गायींना २ मासांपूर्वी लम्पी या विषाणूचा संसर्ग झाला होता. त्या वेळी सौराष्ट्रात लम्पी विषाणूमुळे शेकडो गायींचा बळी गेला होता. त्यामुळे या गोशाळेचे मालक महादेव देसाई यांनी ‘गायी बर्‍या झाल्या, तर गायींसह दर्शनाला येईन’, असा नवस भगवान द्वारकाधीशाकडे (भगवान श्रीकृष्णाकडे) बोलला होता. २० दिवस सर्व काही भगवंतावर सोपवून त्यांनी गायींवर उपचार करून घेतले. त्यानंतर गायी बर्‍या झाल्याने, तसेच त्यांना झालेला संसर्ग गोशाळेतील अन्य गायींमध्ये न पसरल्याने देसाई यांनी या गायींसह कच्छ ते द्वारका असे ४५० कि.मी. पायी चालून २३ नोव्हेंबरच्या सायंकाळी द्वारकानगरी गाठली. या २५ गायींसाठी द्वारकाधीश मंदिराची कवाडे मध्यरात्री उघडण्यात आली होती.

सौजन्य राज द्वारकाधीश दर्शन

मंदिर प्रशासनापुढे सर्वांत मोठी अडचण गायींना मंदिरात प्रवेश देण्याची होती; कारण येथे प्रतिदिन सहस्रो भक्तांची गर्दी असते. दिवसा गायींना मंदिरात प्रवेश देण्यात आला असता, तर मंदिराची व्यवस्था बिघडली असती. त्यामुळे मंदिर मध्यरात्री उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. भगवान श्रीकृष्ण गायींचे भक्त होते. त्यामुळे ते रात्रीही त्यांना दर्शन देतील, असा विचार करण्यात आला. त्यानुसार मध्यरात्री १२ वाजता मंदिराची कवाडे उघडण्यात आली.