प्रतापगडाप्रमाणे लोहगडावरील अतिक्रमण हटवावे ! – शिवभक्तांची पुरातत्व विभागाकडे मागणी

लोहगड किल्ला

कामशेत (जिल्हा पुणे) – येथील मावळ तालुक्यात पवन मावळात असलेल्या लोहगडावर गेल्या काही वर्षांपासून दर्ग्यांचे, कबरींचे आणि त्याच्या चारीबाजूला गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोहगड आणि विशाळगड यांवर होणार्‍या अतिक्रमणांच्या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे, तसेच प्रतापगडाप्रमाणे लोहगडावरील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी मागणीही केली आहे. हीच मागणी आता शिवभक्तांनी पुढे केली असून छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीचा आदर करून पुरातत्व विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी इतिहासप्रेमी आणि शिवभक्त यांनी केली आहे.

शिवप्रेमींनी सांगितले की, लोहगडावरील अतिक्रमण हटवावे या संदर्भात वारंवार आवाज उठवला आहे; मात्र पुरातत्व विभागाने याची नोंद घेतलेली नाही. लोहगडावर पुरातत्व विभागाचे अधिकारी असून त्या ठिकाणी गडावर जाण्यासाठी तिकीट आकारले जाते; परंतु त्याठिकाणी पर्यटकांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. साधे स्वच्छतागृहही नाही. तटबंदीच्या कडेला लावलेले लोखंडी रॉड तुटलेले आहेत. लोहगडावर गेल्यानंतर समोर महादेव मंदिर आहे. तेथून पुढे जायचे झाल्यास कोणत्या बाजूला काय आहे ? हे दर्शवणारे दिशा फलकही तुटलेले आहेत.

(राज्यात पुरातत्व विभाग सक्षमपणे कार्यरत नसल्याचे उदाहरण ! प्रत्येक मासाला लाखो रुपयांचे वेतन घेणारे पुरातत्व विभागाचे अधिकारी नेमके काय करतात ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? असा भोंगळ कारभार असणार्‍या पुरातत्व विभागाकडून गड-दुर्गांचे जतन केले जाईल याची अपेक्षा काय ठेवणार ? कामचुकार अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी ! – संपादक)

लोहगडावरील दर्ग्याला एकही ऐतिहासिक संदर्भ नाही ! – डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास संशोधक

इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी सांगितले की, लोहगडावर एक दर्गा बांधण्यात आला आहे, त्यास एकही ऐतिहासिक संदर्भ नाही. प्रतिवर्षी याचा आकार, रचना आणि रंगात पालट दिसून येतो. शिवकाळ ते ब्रिटिशकाळ आणि भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत येथे दर्गा असल्याचा कोणताच प्राथमिक पुरावा नसल्याने हा दर्गा नव्याने स्थापन करण्यात आला आहे, असे निदर्शनास येते. येथील उरुसाच्या परंपरेचाही पुरावा उपलब्ध करून द्यावा.

(छत्रपती शिवरायांच्या गडांवर थडगे बांधणे, नंतर त्यावर हिरवी चादर चढवणे, हळूहळू तेथे उरूस साजरा करून काही वर्षांनी ती जुनी परंपरा असल्याचे भासवणे आणि नंतर दर्गा उभारून ते ‘धार्मिक केंद्र’ बनवणे, हा सर्व प्रकार नियोजनबद्ध चालू आहे. पोलीस, प्रशासन, पुरातत्व विभाग आणि राजकीय नेते यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील गड-दुर्गांवरील अवैध बांधकामे वाढत आहेत. आतातरी दुर्गावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष न करता राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अवैध बांधकामे शासनाने त्वरित हटवावीत, अशी दुर्गप्रेमींची अपेक्षा आहे ! – संपादक)

दुर्गावरील अतिक्रमणे न काढल्यास संपूर्ण महाराष्ट्रात जनआंदोलन उभे करू ! – बजरंग दल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेल्या दुर्गांवर धर्मांध लोक मजारी बांधून अतिक्रमण करत आहेत. इतिहासात कुठेही उल्लेख नसणार्‍या या मजारी दिवसागणीक वाढतच आहेत. सरकारने ही अतिक्रमणे त्वरित पाडावीत, अन्यथा बजरंग दल संपूर्ण महाराष्ट्रात मोठे जनआंदोलन उभे करेल, अशी चेतावणी बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे यांनी दिली आहे.