अमरावती येथील ६ अवैध सावकारांची घरे आणि दुकाने यांच्यावर सहकार विभागाची धाड !

(प्रतिकात्मक चित्र)

अमरावती – सावकारीचा परवाना नसतांनाही शहरात अवैध सावकारी थाटणार्‍या ६ जणांच्या घरी आणि दुकाने अशा एकूण ८ ठिकाणी सहकार विभागाने धाड टाकली. या वेळी ८ ठिकाणांहून सहकार विभागाच्या पथकाने कोरे धनादेश, कोरे स्टँपपेपर, खरेदीखत, हुंडा चिठ्ठी आणि अन्य महत्त्वाचे दस्ताऐवज जप्त केले असून सहकार विभागाचे अधिकारी सखोल चौकशी करत आहेत. रमेश रंगारकर, विरभान झांबानी, सचिन कुबडे, आदेश अनुपमजी झंवर, मनोज वाधवानी आणि कमलाकर चर्जन अशी ६ अवैध सावकारांची नावे आहेत. (गेल्या अनेक वर्षांपासून ६ जण अवैध सावकारी करत असतांना सहकार विभाग झोपला होता का ? त्यांनी वेळीच लक्ष ठेवून या अवैध सावकारांवर कठोर कारवाई का केली नाही ? त्यामुळे आतापर्यंत ज्या लोकांची या सावकारांनी पिळवणूक केली असेल, त्याचा संपूर्ण व्यय सहकार विभागातील संबंधित अधिकार्‍यांकडून वसूल केला पाहिजे. – संपादक)