झाशीच्या राणीने दिलेला लढा आणि तिचे दिव्य हौतात्म्य !

आज, १९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची १८७ वी जयंती आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

झाशीची राणी लक्ष्मीबाई

१. झाशीच्या राणीच्या शौर्यावरील आक्षेप आणि खंडण

‘आपल्या देशात इतिहासाची मोडतोड करून इतिहासाला विकृत करण्याची स्पर्धा चालू आहे का?, असा संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कुणीही उठतो आणि ऐतिहासिक पुरुष आणि त्यांचे शौर्य यांविषयी संदेह निर्माण करतो. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नि:स्वार्थी आणि पराक्रमी स्वातंत्र्याच्या महत्त्वाकांक्षेलाही न्यूनपणा आणणारी विधाने केली गेली. अनेकांनी त्यांच्याविषयी आक्षेप घेतले. काही जण म्हणतात,‘‘राणी लक्ष्मीबाई या स्वार्थी हेतूनेच या युद्धात सहभागी झाल्या होत्या. इंग्रजांनी त्यांचे राज्य गिळंकृत केले नसते, तर त्या युद्धात सहभागी झाल्या नसत्या.’’

काही जणांच्या मते… ‘‘त्या प्रथमपासूनच इंग्रजांशी स्नेहपूर्ण वर्तन करत होत्या. बंड करणार्‍यांच्या आग्रहाने त्या युद्धात सहभागी झाल्या. इंग्रजांचा युनियन जॅक (ब्रिटिशांचा झेंडा) काही काळ त्यांच्या झाशीत फडकत होता. त्यामुळे त्यांची स्वातंत्र्यप्राप्ती ही बेगडी ठरते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या ध्येयाने त्या प्रेरित झाल्या नव्हत्या.’’

काही जणांच्या मते… ‘‘धार्मिक कारणामुळेच १८५७ चा उठाव झाला. त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणता येणार नाही. तो राष्ट्रीय उठाव नव्हता. त्यात संपूर्ण राष्ट्र सहभागी झाले नव्हते. ते सैनिकांचे बंड होते. राजपुरुषांनी केलेली ती एक उठावणी होती.’’

हे आक्षेप तर्काच्या कसोटीवर उतरणारे नाहीत.

श्री. दुर्गेश परूळेकर

राणी लक्ष्मीबाईंचे राज्य गिळंकृत करण्यात आले होते, हे त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे तत्कालीन कारण झाले. त्याच कारणासाठी त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध केले. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची आई आजारी असतांना त्यांना सुट्टी मिळाली नाही; म्हणून त्यांनी ब्रिटीश सरकारच्या विरुद्ध बंड केले. लाला लजपतराय यांना मारण्यात आले; म्हणून सरदार भगतसिंह यांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात लढण्याचे ठरवले. या तत्कालीन घटनांची संगती खरी आहे; पण त्यामुळे ते स्वार्थी ठरत नाहीत. त्यांचा ध्येयवाद राष्ट्राला स्वतंत्र करण्याचा होता. राष्ट्राला स्वतंत्र करण्याची अनेक कारणे होती. त्यापैकी एक वैयक्तिक कारण होते. अन्याय आणि अत्याचार यांच्या विरोधात लढण्याची वृत्ती असलेल्या व्यक्तीला स्वतःवर झालेला अन्याय सहन होत नाही. संपूर्ण देशावर होत असलेला अन्याय त्यांनी अनुभवलेला आहे. त्याविषयीही त्यांच्या मनात अत्यंत चीड होती. या गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. परकीय सत्ता उलथून टाकण्यासाठी आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यसिद्धतेसाठी राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात शस्त्र उपसले.

ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईंना वार्षिक ६० सहस्र रुपयांची संपत्ती देऊ केली होती. त्यांनी ती नाकारली आणि त्यांच्याशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही कृती त्यांची ध्येयनिष्ठा आणि स्वातंत्र्यनिष्ठा व्यक्त करण्यास पुरेशी आहे. १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध धार्मिक कारणासाठी होते. संपूर्ण राष्ट्र त्यात सहभागी नव्हते. त्यामुळे ते राष्ट्रीय नव्हते; म्हणून राणी लक्ष्मीबाई साहजिकच एखाद्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आणि राष्ट्रीय युद्धाच्या नेत्या ठरत नाहीत. हा आक्षेपही निरर्थक ठरतो.

१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व स्तरांत लढण्याची आणि सहानुभूतीची आकांक्षा होती, असा स्पष्ट पुरावा आपल्याला आढळतो. चपात्यांच्या माध्यमातून पाठवलेला संदेश हा राष्ट्रीय लढा होता. याची साक्ष देण्यास हा प्रसंग पुरेसा आहे.

२. स्वातंत्र्यदेवता झाशीची राणी लक्ष्मीबाईने इंग्रजांशी लढून रणांगणात वीरमरण पत्करणे

१८ जून १८५७ या दिवशी सर ह्यू त्याच्या सैन्यासह चालून येत असल्याचे कळताच राणी लक्ष्मीबाईंनी रणवेश धारण केला, डोक्याला भरजरीचा चंदेरी फेटा बांधला, पायजमा घातला, अंगात अंगरखा घातला आणि गळ्यात मोत्याचा कंठा होताच. त्यांचा नेहमीचा राजरत्न घोडा घायाळ झाला होता; म्हणून त्या दुसर्‍या घोड्यावर स्वार झाल्या. हातात बिचवा, तलवार आणि ढाल होती. त्यांच्या भोवती विश्वासू सरदारांचे कडे होते. मंदार आणि काशी या त्यांच्या निकटच्या दासी पुरुषी रणवेश धारण करून घोड्यावर स्वार झाल्या.

सर ह्यू त्याच्या सैन्यासह राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात घुसला. राणीच्या सैन्याचा धुव्वा उडाला; पण या रणरागिणीने माघार घेतली नाही. शत्रूची फळी फोडून त्या बाहेर पडल्या आणि  त्यांनी हातातील तलवारीने समोर येणार्‍या शत्रूला गारद केले. त्या वेळी त्यांच्यासमवेत रामचंद्रराव देशमुख, रघुनाथसिंह, गणपतराव नावाचा एक मराठा सैनिक, काशी आणि मंदार या दोन दासी एवढीच निवडक माणसे होती. या रणधुमाळीत मंदारदासी कामी आली. तिला इंग्रज सैनिकांनी गोळी घालून ठार मारले होते. ज्याने मंदारदासीवर गोळी झाडली, त्यालाच राणी लक्ष्मीबाईने तलवारीचा वार करून मारून टाकले. राणी लक्ष्मीबाईंच्या अंगावर गोरे सैनिक चालून आले. त्यापैकी एका सैनिकाने त्यांच्या मस्तकावर प्रहार केला. त्यांच्या मस्तकाचा एक भाग छिन्नभिन्न झाला. त्यामुळे त्यांचा उजवा डोळा बाहेर लोंबकाळू लागला. दुसर्‍याने त्यांच्या छातीवर प्रहार केला. त्याही परिस्थितीत त्यांनी वार करणार्‍या गोर्‍या सैनिकाला ठार मारले आणि त्या घोड्यावरून खाली पडल्या. त्यानंतर राणी लक्ष्मीबाईंनी रामचंद्रराव देशमुख नावाच्या त्यांच्या एकनिष्ठ सेवकाला खूण करून बोलावून घेतले. त्यांनी झाशीच्या राणीला रणांगणातून दूर असलेल्या गंगाधर बाबा यांच्या मठात नेले. तेथे त्यांच्या मुखात गंगोदक घातले. राणी लक्ष्मीबाई म्हणाल्या, ‘‘माझ्या देहाला एकाही इंग्रजांचा हात लागता कामा नये.’’ एवढे सांगून त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या इच्छेप्रमाणे रामचंद्रराव देशमुख यांनी गवताची गंजी रचून त्यांच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले. तो दिवस होता १८ जून १८५८. स्वातंत्र्यदेवता झाशीची राणी लक्ष्मीबाई याच ठिकाणी रणांगणात पडली आणि अमर झाली.’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (१६.११.२०२२)