साधकांच्या साधनेचा ‘सगुण ते निर्गुण’ असा प्रवास करून घेणारे आणि गुरुबोधामृत देणारे भाववृद्धी सत्संग !

१. प्रारंभीच्या टप्प्यातील भाववृद्धी सत्संगांचा स्तर सगुण आणि काही प्रमाणात सगुण-निर्गुण असल्याचे जाणवणे

‘वर्ष २०१६ पासून भाववृद्धी सत्संगांची मालिका चालू झाली. तेव्हा भाववृद्धी सत्संग घेणार्‍या साधिका स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करत असत. साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करण्यात येणार्‍या अडचणी अन् साधक करत असलेल्या प्रयत्नांतील बारकावे, यांविषयी सांगण्यात येऊन प्रत्येक भाववृद्धी सत्संगात त्या दृष्टीने आढावाही घेण्यात यायचा. भाववृद्धी सत्संगांत त्या त्या कालावधीत येणारे सण-उत्सव यांच्या संदर्भातही अतिशय सुंदर आणि समर्पक मार्गदर्शन केले जायचे. साधक ‘प्रयत्नांत कुठे न्यून पडले, त्यांनी संघर्ष आणि अडचणी यांवर कशी मात केली’, यांविषयी प्रांजळपणे सांगायचे. त्यामुळे समष्टीला त्यातून शिकता आले. या कालावधीतील भाववृद्धी सत्संगांचा स्तर सगुण आणि काही प्रमाणात सगुण-निर्गुण असा असल्याचे जाणवायचे.

सौ. नम्रता दिवेकर

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या भाववृद्धी सत्संगांचा स्तर निर्गुण असल्याचे जाणवणे

गेल्या ५ – ६ मासांपासून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भाववृद्धी सत्संगात पूर्णवेळ साधकांना मार्गदर्शन करतात. या सत्संगांमध्ये ‘श्रद्धा कशी वाढवावी ? गुरूंप्रतीचा भाव कसा असावा ? गुरुभक्ती म्हणजे काय ?’, यांसह आपत्काळाच्या दृष्टीनेही विविध टप्प्यांनुसार करायचे प्रयत्न, यांविषयीही सांगण्यात येते. हे भाववृद्धी सत्संग ऐकतांना ‘मी एखाद्या पोकळीत आहे’ किंवा ‘मी एखाद्या उच्च लोकात आहे’, असे मला जाणवते. त्यामुळे ‘या भाववृद्धी सत्संगांचा स्तर पूर्णतः निर्गुण आहे’, असे मला वाटते.

३. भाववृद्धी सत्संग हा ‘साधकांना अध्यात्मातील वेगळ्याच उंचीवर नेत आहे’, असे जाणवणे आणि ‘अध्यात्मातील श्रवणभक्ती अन् कीर्तनभक्ती यांपेक्षाही भाववृद्धी सत्संगांतील मार्गदर्शनातून अनुभवता येणारा भक्तीभाव शब्दातीत आहे’, असे वाटणे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे बोलणे, त्यांचा प्रत्येक शब्द, तसेच भाववृद्धी सत्संगात सांगण्यात येणारी कथा आणि तिच्यातून मिळणारा बोध, भाववृद्धी सत्संगाच्या कालावधीत अनुभवण्यास येणारा वातावरणातील पालट’, यांमुळे प्रत्येक भाववृद्धी सत्संग हा साधकांना अध्यात्मातील वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. ‘ती उंची म्हणजे अत्युच्च पातळी आहे’, असे मला जाणवते. ‘अध्यात्मातील श्रवणभक्ती आणि कीर्तनभक्ती यांपेक्षाही भाववृद्धी सत्संगांतील मार्गदर्शनातून अनुभवता येणारा भक्तीभाव शब्दातीत आहे’, असे मला वाटते.

४. कृतज्ञता

भाववृद्धी सत्संगांच्या माध्यमातून गुरुबोधामृत देऊन साधकांना अध्यात्माचे निराळे विश्व अनुभवण्यास देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.७.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक