पुणे महापालिकेत ‘बायोमेट्रीक’ स्वाक्षरीची सक्ती; परंतु यंत्रणाच विस्कळीत !

(‘बायोमेट्रीक’ म्हणजे यांत्रिक उपकरणांद्वारे व्यक्तीची ओळख पटवणे)

पुणे – महापालिकेतील कर्मचार्‍यांनी ‘बायोमेट्रीक’ उपस्थिती (हजेरी) लावावी. असे न केल्यास वेतन काढता येणार नाही, असा आदेश प्रशासनाने दिला आहे; परंतु ‘बायोमेट्रीक’ यंत्राला हजेरी देण्याचा प्रयत्न केला तरी न होणे, इंटरनेट बंद पडणे, हजेरी विलंबाने लागणे अशा अडचणी समोर येत आहेत. डोळे ‘स्कॅन’ करण्याचे यंत्र अद्यापही पालिकेत लावले नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एकीकडे प्रशासनाचा आदेश, तर दुसरीकडे अशा अडचणींमुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये प्रशासनाने ‘बायोमेट्रीक’ हजेरी बंद केली होती. पारंपरिक पद्धतीने संबंधित विभागातील वहीमध्ये स्वाक्षरी करून उपस्थिती लावली जात होती; परंतु सध्या सर्वकाही सुरळीत चालू झाल्याने अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी ‘बायोमेट्रीक’ स्वाक्षरी चालू केली; मात्र बहुतांश कर्मचारी स्वाक्षरीलाच प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘बायोमेट्रीक’ स्वाक्षरीने कर्मचारी कामावर कधी आला, कधी गेला, याची माहिती मिळते. त्यामुळे कामावर उशिराने येणार्‍या कर्मचार्‍यांना शिस्त लागत होती; मात्र पालिकेतील ‘बायोमेट्रीक’ यंत्रणाच सुस्थितीत नसल्याचे लक्षात येत आहे. आता प्रशासनाने आदेश काढल्यानंतर ज्या कर्मचार्‍यांनी बोटाचे ठसे, आधारकार्ड क्रमांक दिला, अशा कर्मचार्‍यांनी विद्युत विभागामध्ये गर्दी केली होती. दिवसभरात ३०० कर्मचार्‍यांनी माहिती भरल्याचे समजते.