अध्यात्मसंपन्न जीवन जगू इच्छिणार्‍यांना कायद्याचे संरक्षण !

अधिवक्त्या प्रीती पाटील

भारतभूमी ही आध्यात्मिक वारसा लाभलेली संपन्न भूमी आहे. अशा संपन्न भूमीत एखाद्याला मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल, तर ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ याची शिकवण देणारी ‘सनातन संस्था’ ही याच भारतात आहे, हे हिंदूंचे भाग्यच आहे. अध्यात्म हेही एक शास्त्र आहे. हे शास्त्र मनुष्याने चांगल्या-वाईट परिस्थितीतही शांत, स्थिर, समाधानी आणि आनंदी कसे रहायचे, हे शिकवते. सहस्रो साधक सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून त्यांच्या व्यावहारिक जीवनातील अडचणींवर मात करून सकारात्मक जीवन जगत आहेत. साधना केल्याने साधकांनी त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्या न्यून झाल्याचे अनुभवले आहे. यातून अध्यात्माचे महत्त्व अंकित होते; पण या गोष्टी समजून न घेता आजच्या काळात अनेक पालक ‘स्वतःच्या पाल्याने केवळ पैसा मिळवणारे शिक्षण घेऊन गाडी, बंगला आणि पैसा मिळवणे, हेच ध्येय ठेवावे’, अशा विचारांचे झाले आहेत. त्याचे दुष्परिणामही आज आपण पहात आहोत.

१. ‘पैसा हाच सर्व समस्यांवर उपाय आहे’, असे योग्य आहे का ?

याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आज घराघरात लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडून ते नैराश्यग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. आत्महत्या करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत; परंतु त्यावर योग्य उपाययोजना मात्र आजच्या या विज्ञानवादी युगात दुर्दैवाने मिळत नाही. ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’, अशीच स्थिती दिसून येते. त्यामुळे आज जरी ‘आपण भौतिक जगात प्रगती करत आहोत’, असे म्हणत असलो, तरी ती खरी प्रगती आहे का ? याचे चिंतन प्रत्येकानेच करणे काळाची आवश्यकता आहे, असे म्हणणे हे अतिशयोक्ती ठरणार नाही. ‘केवळ पैसा असेल, तर सगळ्या अडचणी सुटणार’, ‘पैसा हाच सर्व समस्यांवर उपाय आहे’, अशी भ्रामक कल्पना प्रत्येकाने करून घेतली आहे. कोरोना महामारीमध्ये आधुनिक वैद्यांनीही रुग्णांवर उपचार करतांना हात टेकल्याचे आपण सर्वांनी अनुभवले. पैसा हे जगण्याचे साधन असले, तरी चैनविलासात जगण्यासाठी प्रत्येक जण पैशामागे धावत आहेत आणि यालाच ते सुख मानतात.

२. ‘डिडरोट इफेक्ट’ आणि त्यावर ‘साधना’ हाच उपाय !

मानसशास्त्रात याला ‘डिडरोट इफेक्ट’ म्हटले आहे. रशियात १७ व्या शतकामध्ये डेनिस डिडरोट नावाचा एक अभ्यासू वाचक होता. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. त्याचे स्वतःचे मोठे ग्रंथालय होते. रशियाची राणी कॅथरीनला ज्या वेळी या डिडरोटविषयी कळले, त्या वेळी तिने ५० सहस्र डॉलर्स म्हणजे आताचे साधारण साडेतीन कोटी रुपये देऊन तिने त्याचे ग्रंथालय विकत घेतले होते. डिडरोट एका दिवसात श्रीमंत झाला होता. त्याने मिळालेल्या पैशातून स्वतःसाठी एक उच्च प्रतीचा महागडा पोशाख विकत घेतला. तो पोशाख घातल्यानंतर त्याला वाटू लागले की, पोशाखाला साजेश्या वस्तू घरात नाहीत; म्हणून मग त्याने एक एक करत घरातील सर्व वस्तू पालटल्या. त्याचा पोशाख आणि घर दोन्हीही शोभून दिसत होते; पण हे सर्व करता करता तो पुन्हा कंगाल झाला.

आजही आपण पहातो की, एक वस्तू घेतल्यावर तिच्यामुळे दुसर्‍या वस्तूचा दर्जा आपोआपच न्यून होतो आणि तो (दर्जा) वाढवण्यासाठी आपण अधिक खर्च करतो, उदा. नवीन सोफा (सुखासन) घेतला की, खिडक्यांचे पडदे पालटणे, मग सोफा आणि पडदे यांच्यासाठी खोलीतील रंग पालटणे, अशा कृती होत रहातात. एक गोष्ट खरेदी करत असतांना त्याच्यासह अनेक अनावश्यक गोष्टी घेण्याचा भागही होतो. या सर्व मानसिक समस्यांवर ‘साधना करणे’, हेच उत्तर आहे. आपल्या अडचणींमागे आध्यात्मिक कारण असू शकते, हेच आज कुणी मान्य करत नाही. किंबहुना त्याचा विचारच कुणी करत नाही. त्यामुळे मनुष्य या दुष्ट चक्रात अडकतो.

३. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाची दुतोंडी भूमिका !

या सर्व पार्श्वभूमीवर जर पाहिले, तर आज समाजामध्ये मुलींनी ‘एअर होस्टेस’ होणे, एखाद्या मोठ्या पंचतारांकित, सप्ततारांकित उपाहारगृहात ‘रिसेप्शनिस्ट’ म्हणून काम करणे, हे आजही प्रतिष्ठेचे समजले जाते. या कामांचे प्रत्यक्ष स्वरूप पाहिले, तर ‘तोंडवळ्यावर रंगरंगोटी करून, सौंदर्याचे प्रदर्शन करत भपकेबाज कपडे घालून आलेल्या ग्राहकासमवेत संभाषण करणे, त्यांना काय हवे नको, हे पहाणे’, असे असते; परंतु येणारे सर्वच ग्राहक हे सभ्य, सज्जन असतात का ? ते त्या मुलींना कशा प्रकारे वागणूक देतात, हाही एक वेगळा प्रश्नच आहे. तरीही मुलींनी अशा स्वरूपाचे काम करणे, हे त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य मानले जाते. मुलांच्या संदर्भातही परिस्थिती फारशी वेगळी नाही. सिनेमात काम करायचे; म्हणून घर सोडून जाणे, असे प्रकार होतात. का ? तर ते त्याचे व्यक्तीस्वातंत्र्य !

काही वर्षांपूर्वी ‘एक दुजे के लिए’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तो पाहून त्या काळी प्रेमी युगुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले होते. या समाजाने त्या चित्रपट निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला ‘चुकीचा संदेश समाजात दिला’, म्हणून दोष दिला नाही. हे त्या निर्मात्याचे, दिग्दर्शकाचे व्यक्तीस्वातंत्र्य ! अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेला सिनेमा म्हणजे दृश्यम. या सिनेमात गुन्हा लपवल्याचे दाखवण्यात आले आहे. असे दाखवणे, हे त्या दिग्दर्शकाचे व्यक्तीस्वातंत्र्य ! तसेच ‘मानसिक आरोग्य सेवा कायदा २०१७’ मध्येही उपचारांचे स्वातंत्र्य संबंधित रुग्णास राहील, अशी तरतूद आहे.

इस्लामचेच उदाहरण घ्यायचे म्हटले, तर इस्लाममध्ये एखादी व्यक्ती मौलवी असेल, तर तिला समाजात पुष्कळ मान असतो. मौलवी म्हणजे कुराण काय सांगते ? याचे ज्ञान असणारी व्यक्ती. याउलट आजच्या काळात जर कुणाला संन्यास घ्यायचा आहे, आश्रमात राहून आध्यात्मिक जीवन जगायचे आहे, तर त्याला विरोध का ? राज्यघटना जर सर्वांना घटनात्मक अधिकार देते, तर हा समाज तो अधिकार देतो का ?

४. सनातनच्या आश्रमात येऊन पूर्णवेळ साधना करायची इच्छा असणार्‍यांना पालकाकडून अज्ञानापोटी विरोध

सनातन संस्था मनुष्याच्या प्रगतीला बाधा ठरणारे आणि दुःखाचे कारण असलेले त्याचे दोष आणि अहंकार याचे निर्मूलन कसे करायचे ? याची प्रत्यक्ष कृती शिकवते. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून अनेक साधक आनंदी जीवन जगत आहेत. साधनेचे महत्त्व लक्षात आल्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेल्या कित्येक युवा साधक आणि साधिका यांना व्यावहारिक जीवनात नोकरी करून पैसे मिळवण्यापेक्षा साधना करून चिरंतन अशा आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असल्याने सनातनच्या आश्रमात येऊन पूर्णवेळ साधना करायची इच्छा असते; पण दुर्दैवाने त्यांना त्यांच्या पालकांचा अज्ञानापोटी विरोध होतो.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भारतामध्ये लोकशाही आहे आणि राज्यघटनेने सर्वांना मूलभूत अधिकारही दिलेले आहेत. राज्यघटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येक व्यक्तीला त्याचे जीवन जगण्याचे आणि व्यक्तीस्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत. एखाद्या साधकाला जर सनातनच्या आश्रमात राहून साधना करायची असल्यास कायद्याने त्याच्या पालकांना त्यास विरोध करता येणार नाही. साधना करण्याचा निर्णय हा त्या साधकाचा वैयक्तिक निर्णय असतो, मग तो कोणत्या का मार्गाने साधना करो.

काही समाजामध्ये त्यांच्या पाल्याने त्यांच्या पंथानुसार दीक्षा घेतली, तर त्यांचा मोठ्या स्वरूपात सोहळा साजरा करतात; पण इथेमात्र साधना करण्यासारख्या चांगल्या निर्णयासाठी कायदा आणि अधिकाराची भाषा करावी लागत आहे, हे दुर्दैव आहे. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एक व्यक्ती जरी साधना करत असली, तरी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना त्याचा लाभ होतो; कारण एक सकारात्मक विचार अडचणींवर मात करायला शिकवतो.

५. सध्याच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मक विचार करण्यासाठी अध्यात्मच महत्त्वाचे !

सध्याच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मक विचार करण्यासाठी अध्यात्मच महत्त्वाचे आहे. अध्यात्मानेच आत्मिक बळ मिळते. त्यामुळे साहजिकच विचारांची दिशा योग्य राहिली, तर आपसूकच जीवनात अनेक चांगले पालट होतात. मानसिक त्रासाला योग्य नामस्मरणाची जोड दिली, तर नकारात्मकता रहात नाही. याचा अनुभव कित्येक साधकांनी घेतला आहे. साधना करू लागल्यानंतर या भौतिक जगातील मर्यादा लक्षात आल्यानंतर साधकाला कुठे थांबायचे ? याची जाणीव होते. गरजा न्यून होतात. साधक साधना करून त्याचे अध्यात्मसंपन्न जीवन जगू इच्छित असेल, तर त्यास कायद्याने संरक्षण दिले आहे. ज्या साधकांच्या पालकांकडून विरोध होत असेल, ते साधक कायद्याने त्यांना दिलेल्या अधिकाराचा वापर करून स्वतःचा वैयक्तिक निर्णय घेऊ शकतात.

– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली (२८.१०.२०२२)