युक्रेनमधील खेरासनमध्ये संचारबंदी : रशियाकडून मोठ्या सैनिकी कारवाईचे संकेत

खेरासन (युक्रेन) – युक्रेनमधील खेरासन येथे ४ नोव्हेंबरला रात्री उशिरा संचारबंदी घोषित करण्यात आली. रशियाने नियुक्त केलेले खेरासनचे गव्हर्नर स्ट्रेमोसोव्ह म्हणाले की, येथे परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. युक्रेनचे सैन्य खेरासनचा गमावलेला प्रदेश परत मिळवत आहेत, तर दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी खेरासनमध्ये युक्रेनच्या सैन्याच्या विरोधात मोठी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पुतिन यांनी नागरिकांना युक्रेनव्याप्त खेरासनमधून निघून जाण्यास सांगितले आहे. खेरासन हा प्रांत रशियाच्या अखत्यारीत असल्याचा पुनरुच्चार पुतिन यांनी केला.

रशियासाठी खेरासन महत्त्वाचा प्रांत !

रशियाला काळ्या समुद्रातील बंदरे कह्यात घ्यायची आहेत. खेरासन हे काळ्या समुद्राजवळ स्थित एक प्रमुख बंदर आहे. हे रशियाच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. खेरासन एक अग्रगण्य जहाज उत्पादक केंद्र असून तेथे व्यापारी जहाजे, टँकर, कंटेनर जहाजे, आइसब्रेकर, वास्तुविशारद पुरवठा जहाजे बनवली जातात. हा भाग रशियात समाविष्ट करून रशिया स्वतः सागरी शक्ती वाढवू शकतो.