पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील जनता दरबारात करण्यात आले अनेक समस्यांचे निराकरण

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा जनता दरबार

रत्नागिरी, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्याचे उद्योगमंत्री, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या येथील पहिल्याच जनता दरबारात जनतेच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले. ४ नोव्हेंबर या दिवशी भरलेल्या जनता दरबाराला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. या दरबारामध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांचे तात्काळ म्हणणे ऐकून, लगेच त्या तक्रारींविषयी उत्तर देण्यात आले आणि जनतेचे प्रश्‍न सोडवण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहामध्ये हा दरबार भरवण्यात आला होता. या दरबारात अनुमाने २५० अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि विविध खात्यांचे अधिकारी अन् कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जनता दरबारात जनतेचे प्रश्न सोडवतांना पालकमंत्री उदय सामंत आणि उपस्थित जनता

या वेळी मंत्री सामंत यांनी शासकीय अधिकार्‍यांना सूचना देतांना म्हटले की, नागरिकांना जनता दरबारात येण्याची वेळ येता कामा नये. त्यांचे प्रश्‍न अगोदरच सोडवण्यात यावेत. कुणीही पूर्वग्रहदूषितपणे जनतेशी वागू नये.

राजीवडा खाडी मुखातील गाळ तत्परतेने काढा ! – मंत्री उदय सामंत

राजीवडा खाडी मुखातील गेली ३० वर्षे अडकलेला गाळ काढण्यासाठी मालवण येथील ‘ड्रेझर’ बोलावून घ्या आणि गाळ तत्परतेने काढा, असा आदेश मंत्री सामंत यांनी ‘मेरिटाईम बोर्डा’च्या अधिकार्‍यांना दिला. राजीवडा मच्छीमार सोसायटीच्या वतीने जनता दरबारात याविषयी तक्रार करण्यात आली होती. खाडीतल्या या गाळामुळे अनेक बोटी रुतल्याच्या घटना घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजिवडा गाळ काढण्यासाठी १ कोटी २६ लाख रुपयांची निविदा काढल्याची माहिती या वेळी संबंधित अधिकार्‍यांनी दिली. या वेळी मंत्री सामंत म्हणाले, ‘‘आपली शासकीय यंत्रणा असतांना निविदा कशाला ? कोकण पॅकेजमधून आवश्यक ती मशीनरी खरेदी केली आहे. दोन जिल्ह्यांसाठी दिलेला ड्रेझर येथे आणून गाळ काढावा.’’