सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांना प.पू. डॉक्टरांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांना प.पू. डॉक्टरांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये’ यातील काही भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

सद्गुरु (कै.) डॉ. वसंत बाळाजी आठवले

५. प.पू. डॉक्टरांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये

५ ए. गुरुकृपायोगानुसार साधना सांगून सामान्य जिवांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती करून घेणे

आ. समष्टी साधनेचे, म्हणजे समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी निष्काम सत्कार्य करण्याचे महत्त्व बिंबवणारे प.पू. डॉक्टर हे पहिलेच परात्पर गुरु आहेत. ‘समष्टी साधनेसह प्रत्येक साधकाची वैयक्तिक साधना आणि आध्यात्मिक उन्नती योग्य प्रकारे होत आहे कि नाही’, याकडे प.पू. डॉक्टरांचे सतत लक्ष असते.

इ. धर्म आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी महर्लाेकातील उन्नत जीव सनातनच्या साधकांच्या पोटी जन्माला येत आहेत. (‘२०.७.२०२२ पर्यंत २०७ बालसाधक महर्लाेकातून जन्माला आले आहेत.’ – संकलक)

ई. येत्या काही वर्षांत जन आणि तप लोकांतून अधिक उन्नत जीव जन्माला येऊन ईश्वरी राज्य निर्माण करून त्याची धुरा वहातील. (‘पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) आणि चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) हे बालसंत जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आले आहेत.’ – संकलक)

५ ऐ. गुरुकुलाची स्थापना आणि त्याचे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’त विलीनीकरण करणे : ही मुले जन्माला आल्यानंतर जेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या संपर्कात आली, तेव्हा ‘त्या मुलांनी ईश्वरी कार्यासाठी महर्लाेकातून जन्म घेतला आहे’, हे केवळ प.पू. डॉक्टरांनीच सर्वांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांची कार्यपूर्ती करण्यासाठी गुरुकुलाची स्थापना केली. हे प.पू. डॉक्टरांची कल्पनाशक्ती आणि कर्तृत्व यांचे वैशिष्ट्य आहे.

(‘उच्च माध्यमिक गुरुकुल (२५.७.२०१०) आणि माध्यमिक गुरुकुल (२४.९.२०१०) या दिवशी स्थापन करण्यात आले; पण काही कारणांमुळे त्यात सहभागी झालेल्या काही साधकांना संस्थेच्या प्रसारासाठी अन्यत्र पाठवण्यात आले, तर काही साधकांना संस्थेच्या आश्रमांत सेवा करण्यासाठी सांगण्यात आले. अशा प्रकारे वर्ष २०१४ च्या शेवटी गुरुकुलाचे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’त विलीनीकरण करण्यात आले.’ – संकलक)

पू. शिवाजी वटकर

५ ओ. प.पू. डॉक्टरांनी साधकांना गुरुकृपायोगाचे महत्त्व सांगूनही स्वतःच्या स्थूलदेहात न अडकता विश्वगुरु श्रीकृष्णालाच शरण जायला सांगणे : गुरूंचे महत्त्व सर्वच संत आणि गुरु सांगतात; पण प.पू. डॉक्टरांनी ‘शिष्याची आध्यात्मिक उन्नती होत असतांना शेवटच्या अवस्थेत त्याला गुरूंचा आधारही सोडावा लागतो’, हे स्पष्ट केले. त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच गुरुकृपायोगाचे महत्त्व सांगूनही ‘माझ्या स्थूलदेहात अडकू नका. विश्वगुरु श्रीकृष्णालाच शरण जा’, असे सांगितले. ‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।’, म्हणजे ‘संपूर्ण विश्वाला भगवद्गीतेच्या माध्यमातून ज्ञान देणारे, विश्वगुरुस्थानी विराजित असलेले परमतत्त्व भगवान श्रीकृष्णच आहे’, असे शिकवले. केवळ प.पू. डॉक्टरच साधकांना असे सांगू शकतात.

५ औ. प.पू. डॉक्टर साधकांना गुर्वेच्छेपासून ईश्वरेच्छेकडे जाण्यास आणि दिसेल ते कर्म साधना म्हणून करण्यास शिकवतात.

५ अं. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी मन, बुद्धी आणि प्राणही पणाला लावलेले असणे : हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे ध्येय केवळ प.पू. डॉक्टरच ठेवू शकतात. छ. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पुरे करण्यासाठी प्राण पणास लावले. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी केवळ प्राणच नव्हे, तर मन आणि बुद्धीही पणाला लावली आहे.

५ क. प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्थेची स्थापना करून तिची अंतर्गत व्यवस्था आणि यंत्रणा निर्माण करून निवृत्त होणे : ‘ईश्वराने सृष्टी निर्माण करून तिच्या कार्यप्रणालीचे नियम आखून दिले आणि त्या नियमांप्रमाणे सर्व सृष्टी आपोआप चालत राहील’, अशी व्यवस्था केली अन् तो स्वतः नामानिराळाच राहिला. प.पू. डॉक्टरांनीही सनातन संस्थेची स्थापना करून तिची अंतर्गत व्यवस्था आणि यंत्रणा निर्माण करून ठेवली आहे अन् ते संस्थेतून निवृत्त झाले आहेत.

५ ख. प.पू. डॉक्टरांमध्ये संत आणि देवता यांचे दर्शन होणे

१. प.पू. डॉक्टरांना बघितल्यानंतर प.पू. पांडे महाराज यांना त्यांच्या गुरूंचे दर्शन झाले.

२. अनेक साधकांना प.पू. डॉक्टरांमध्ये श्रीकृष्ण, इतर देवता किंवा संत यांचे दर्शन होते.

५ ग. प.पू. डॉक्टरांच्या वाणीत चैतन्य असणे

१. प.पू. डॉक्टरांच्या प्रत्येक कृतीतून आणि विशेषतः त्यांच्या बोलण्यातून चैतन्याचा ओघ वहात असतो.

२. प.पू. रघुवीर (दास) महाराजांनी ‘सनातनच्या साधकांना होणारे अनिष्ट शक्तींचे त्रास दूर व्हावेत’, यासाठी ५५ हनुमानकवच यज्ञ करण्याचा संकल्प केला होता. अंदाजे १३ यज्ञ पूर्ण झाल्यावर वर्ष २००३ मध्ये अनिष्ट शक्तींनी त्यांच्यावर आक्रमण केल्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्या वेळी दूरभाषवरून प.पू. डॉक्टरांचे बोलणे ऐकल्यावर ते शुद्धीवर आले.

(वर्ष २०१०)

(क्रमशः उद्याच्या अंकात)