अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोन धर्मांधांना फाशीची शिक्षा

नवाबगंज (उत्तरप्रदेश) – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या दोन धर्मांध आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पंकज कुमार श्रीवास्तव यांच्या न्यायालयाने आरोपींना ‘पॉक्सो’ कायद्यासह इतर विविध कलमांखाली दोषी ठरवले.

उत्तरप्रदेशातील नवाबगंज तालुक्यातील परसाई गावातील रहिवासी हलीम उपाख्य खडबड आणि रिझवान यांना फाशीची शिक्षा आणि ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. २७ डिसेंबर २०२१ या दिवशी दोन्ही गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपींनी या मुलीची हत्या केली होती. या प्रकरणी ३० डिसेंबर २०२१ या दिवशी पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून नवाबगंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या खटल्यात बाजू मांडणारे सरकारी अधिवक्ता निर्भय सिंह यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघांनी या मुलीचा पाय तोडून तिच्या डोळ्यांना गंभीर इजा केली होती आणि मुलीला तेथेच सोडून पळ काढला होता.

निकाल देतांना न्यायालयाने व्यक्त केली खंत !

‘ज्या देशात दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांची पूजा केली जाते, त्या देशात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार होतो’, अशा शब्दांत न्यायालयाने सुनावणीच्या वेळी खंत व्यक्त केली.