अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कारवार येथील शिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) !

कारवार (कर्नाटक) येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) यांच्याकडून सनातन संस्थेने श्री सिद्धिविनायकाची मूर्ती घडवून घेतली. सनातन संस्थेचे साधक श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार त्यांच्याकडे शिल्पकला शिकण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना गुरुजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी या लेखातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू. (हे लिखाण पू. नंदा आचारी हे संत होण्यापूर्वीचे असल्यामुळे त्यांच्या नावापुढे ‘श्री’ लावण्यात आला आहे.)

पूर्वी शिष्य गुरूंकडे शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आश्रमात (गुरुकुलात) जात असत. तेव्हा ते आपल्या गुरूंना ‘गुरुजी’ असे संबोधत असत. त्याप्रमाणे शिल्पकार श्री. नंदा आचारी यांच्याकडे साधक श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार हे शिल्पकला शिकायला गेले होते. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या पुढील लेखात शिल्पकार श्री. नंदा आचारी यांना साधकांनी ‘गुरुजी’ असे संबोधले आहे.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/624896.html

पू. नंदा आचारी

१५. भाव

१५ आ ३. श्री पद्मावतीदेवीची मूर्ती भटकळ येथे नेल्यावर गावकर्‍यांना ती न आवडल्याने ते मूर्ती फोडण्याच्या सिद्धतेत असणे आणि एका स्वामींनी ‘या मूर्तीत सूर्यासमान तेज आहे. तिची स्थापना करा’, असे सांगितल्यावर गावकर्‍यांनी मूर्तीची मंदिरात स्थापना करणे : भटकळ येथे श्री पद्मावतीदेवीची मूर्ती नेल्यावर तेथील गावकर्‍यांनी ‘ती मूर्ती आवडली नाही’, असे म्हणून ती मूर्ती तेथे जवळच नदीकिनार्‍यावर नेऊन ठेवली. ते ती मूर्ती फोडण्याच्या सिद्धतेत होते. तेव्हा एक स्वामी तेथे आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘या मूर्तीत सूर्यासमान तेज आहे. तिची स्थापना करा.’’ हे ऐकून गावकर्‍यांनी तेथून मूर्ती उचलून मंदिरात स्थापन केली.

१५ आ ४. जलाधिवास विधीसाठी रात्री देवीची मूर्ती कुंडात ठेवून बाजूला फुलांच्या बिया घातल्यावर सकाळपर्यंत त्या बियांपासून रोपे तयार होऊन त्यांना फुले लागणे : तेथे विटा आणि माती यांचे पाण्याचे कुंड बनवून जलाधिवास विधीसाठी रात्री ती मूर्ती त्या कुंडात ठेवली अन् बाजूला फुलांच्या बिया घातल्या. सकाळपर्यंत म्हणजे ८ घंट्यांत त्या बियांपासून रोपे तयार होऊन त्यांना फुले लागली होती.’

– श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२०)

१५ इ. गुरुजींची अनुभवलेली स्थिरता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव

१५ इ १. गोव्यातील एका व्यक्तीने गुरुजींना एका मंदिरासाठी पितळी चौकट करायला देणे, गुरुजींनी ते काम वेळेत पूर्ण केलेले असूनही ‘विलंब झाला’, असे सांगून त्या व्यक्तीने काही स्त्रियांच्या समवेत येऊन गुरुजींना अर्वाच्य भाषेत धमकावणे : ‘गोव्यातील एका व्यक्तीने गुरुजींना एका मंदिरासाठी पितळी चौकट बनवण्याचे काम दिले होते. गुरुजींनी ते काम वेळेतच पूर्ण करून ठेवले होते; पण संबंधित व्यक्ती ती चौकट घेण्यासाठी वेळेत आली नाही. ती व्यक्ती आली आणि ती अतिशय रागाने अन् अरेरावीने गुरुजींशी बोलू लागली. त्या व्यक्तीने गुरुजींना मूर्ती बनवत असतांना अयोग्य पद्धतीने हाताला धरून उठवले आणि ती म्हणाली, ‘‘तुम्ही चौकट देण्यास विलंब केला आणि त्यातील काही भाग व्यवस्थित केला नाही.’’ ती व्यक्ती गुरुजींना वाटेल तसे बोलू लागली. त्या व्यक्तीच्या समवेत आलेल्या स्त्रियांनी गुरूजींना शिव्या दिल्या आणि त्या म्हणाल्या, ‘‘तू आमच्या अंगाला हात लावला’, असे आम्ही तुझ्याविरुद्ध पोलीसात गार्‍हाणे देऊन तुला कारागृहात डांबून ठेवायला लावतो, म्हणजे तुला कळेल, तरीही गुरुजी शांत आणि स्थिर होते. गुरुजी मला म्हणाले, ‘‘मी या स्त्रियांच्या वडिलांच्या वयाचा आहे, तरीही त्या कसे बोलतात ?’, ते पाहा.’’

श्री. रामानंद परब

१५ इ २. त्या व्यक्तीने गुरुजींना कामगारांकडे घेऊन जाणे, गुरुजींनी साधकाला समवेत नेणे, त्या व्यक्तीने दारू पिऊन गुरुजींना शिवीगाळ करून धमकावणे, तरीही गुरुजी स्थिर असणे आणि त्यानंतर ‘तुझ्या माध्यमातून स्वामीच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) तेथे आले असल्याने ते मला मारू शकले नाहीत’, असे साधकाला सांगतांना गुरुजींचा भाव जागृत होणे : ती व्यक्ती त्यांना गुरुजी आपल्या कामगाराकडून काम करवून घेतात, तेथे घेऊन जाणार होती. त्या वेळी गुरुजी मला म्हणाले, ‘‘तू माझ्या समवेत चल, म्हणजे ते मला मारणार किंवा कोणतीही इजा करणार नाहीत.’’ त्यांनी सांगितल्यानुसार मी त्यांच्या समवेत गेलो. ती व्यक्ती आम्हाला त्या गुरुजींच्या कामगाराच्या घरी घेऊन गेली. तेथे ती व्यक्ती दारू पिऊन आली होती आणि तिच्या समवेतची इतर मंडळी गुरुजींना वाटेल तसे बोलत होती. त्यांनी त्यांच्यावर खोटे आरोपही केले. ‘तुला कारागृहात घालू’, असे ते बोलत होते, तरीही गुरुजी स्थिरच होते. हा प्रसंग झाल्यावर गुरुजी मला म्हणाले, ‘‘तू माझ्या समवेत होतास आणि तुझ्या माध्यमातून स्वामीच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) तेथे आले होते. त्यामुळे ते मला मारू शकले नाहीत.’’ हे सांगतांना त्यांचा भाव जागृत झाला होता.

१५ इ ३. ‘या प्रसंगाच्या माध्यमातून साडेसाती माझे वाईट प्रारब्ध घेऊन गेली, आता माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट होणार’, असे गुरुजींनी सांगणे : हा प्रसंग घडल्यावर गुरुजी मला म्हणाले, ‘‘२५.१.२०२० ला माझी साडेसाती संपली. ‘साडेसाती जातांना काहीतरी घेऊन जाते’, असे म्हणतात. २६.१.२०२० या दिवशी घडलेल्या या प्रसंगाच्या माध्यमातून साडेसाती माझे वाईट प्रारब्ध घेऊन गेली. आता माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट होणार आहे. माझ्या राशीत मंगळ आणि गुरु उच्च स्थानी आहेत.’’

– श्री. रामानंद परब

१६. गुरुजींची सनातनच्या साधकांवरील प्रीती

१६ अ. गुरुजींच्या श्री गुरूंनी त्यांना दिलेला आशीर्वाद त्यांनी साधकांना देणे : गुरुजींना त्यांच्या श्री गुरूंनी (श्री बाबा महाराज यांनी) आशीर्वाद दिला होता, ‘‘तू ज्या दगडाला हात लावशील, त्या दगडातून तुला जी मूर्ती करायची आहे, ती आपोआप पूर्ण होईल.’’ तोच आशीर्वाद त्यांनी आम्हाला दिला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या दगडाला हात लावाल, त्या दगडातून तुम्हाला जी मूर्ती साकारायची आहे, ती आपोआप पूर्ण होईल. स्वामीजींनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) तुम्हा दोघांना केवळ पाठवले असे नाही, तर तुम्ही २ कोटी लोकांच्या समान आहात.’’

– श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार (१.२.२०२०)

१७. श्री. नंदा आचारी यांना आलेल्या अनुभूती

१७ अ. बद्रिनाथहून आलेल्या एका साधूने गुरुजींकडे ५० सहस्र रुपये मागणे, त्यांना ते पैसे दिल्यावर दुसर्‍याच दिवशी गुरुजींना १ लाख रुपये मिळणे आणि ‘आपण देवाला सर्व दिले की, देव आपल्याला दुप्पट देतो’, असे गुरुजींनी सांगणे : ‘एकदा बद्रिनाथहून एक साधू गुरुजींकडे आले होते. त्यांनी गुरुजींना सांगितले, ‘‘मला ५० सहस्र रुपये दे.’’ त्या वेळी गुरुजी म्हणाले, ‘‘माझ्याकडे ५० सहस्र रुपये नाहीत.’’ तेव्हा ते साधू म्हणाले, ‘‘नाही कसे म्हणतोस ? तुझ्या कपाटातील खणात ५० सहस्र रुपये आहेत. ते मला हवे आहेत, ते मला आणून दे.’’ गुरुजींना एका मूर्तीचे ५० सहस्र रुपये आदल्या दिवशीच मिळाले होते. गुरुजींनी ते पैसे साधूला आणून दिले. ते पैसे घेऊन ते साधू निघून गेले. दुसर्‍याच दिवशी गुरुजींना एक लाख रुपये मिळाले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण देवाला सर्व दिले की, देव आपल्याला दुप्पट देतो.’’

– श्री. रामानंद परब

१७ आ. घराजवळची शापित जागा मूर्ती घडवण्यासाठी घेणे आणि तेथे मूर्ती घडवायला आरंभ केल्यावर ती जागा शापमुक्त होऊन तेथे कोणत्याही प्रकारचा त्रास न होणे : ‘एकदा त्यांना आम्ही विचारले, ‘‘तुम्ही पूर्वीपासून याच जागी मूर्ती बनवता का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘याच्या बाजूला माझे घर आहे. आरंभी मी तेथे मूर्ती बनवायचो. आता आपण मूर्ती घडवतो, ती जागा शापित होती. ‘इथे जो कुणी रहायला यायचा, त्याच्या कुळाचा नाश व्हायचा’, असे अनेकांनी अनुभवले होते. त्या जागेच्या मालकांनी मला विचारले, ‘‘ही जागा तू घेशील का ?’’ त्या वेळी मी त्यांना ‘हो’ म्हणालो आणि मी ही जागा घेतली. तेव्हापासून मी येथे मूर्ती बनवत आहे. येथे मूर्ती घडवायला लागल्यापासून ही जागा शापमुक्त झाली आणि मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आतापर्यंत मी या स्थानावर अनेक प्रकारच्या मूर्ती बनवल्या आहेत.

१७ इ. या जागेत एका वृक्षावर देवीचे स्थान असणे, त्या देवीचे गुरुजींना अनेक वेळा दर्शन होणे आणि तेथे मूर्तीसेवा करतांना ऋषिमुनींच्या आश्रमात असल्याचे साधकांनी अनुभवणे : या जागेमध्ये एका वृक्षावर देवीचे स्थान आहे. तिथे मला देवीचे अनेक वेळा दर्शन झाले आहे. तो वृक्ष ओवळीच्या फुलांचा आहे. त्या फुलांना पुष्कळ सुगंध असतो.’’

त्या ठिकाणी पुष्कळ शांतता आहे. ‘तेथे सेवा करतांना आम्ही ऋषिमुनींच्या आश्रमात आहोत’, असे आम्हाला जाणवते.

१७ ई. सनातन संस्थेसाठी श्री सिद्धीविनायकाची मूर्ती घडवतांना आलेल्या अनुभूती

श्री. राजू सुतार

१७ ई १. गुरुजींना श्री सिद्धीविनायकाची मूर्ती घडवण्यासाठी दोघांच्या साहाय्याची आवश्यकता भासणे आणि त्याच वेळी रामनाथी आश्रमातून दोन साधक साहाय्यासाठी त्यांच्याकडे येणार असल्याचे कळल्यावर गुरुजींचा भाव जागृत होणे : ‘आम्ही सनातन संस्थेसाठी श्री सिद्धीविनायकाची मूर्ती बनवून घेणार होतो. कारवार (कर्नाटक) येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) यांना दगडापासून श्री सिद्धीविनायकाची मूर्ती घडवण्यासाठी दोन जणांची आवश्यकता होती. ते त्यांच्या समवेत असलेले सनातनचे साधक श्री. सागर कुरडेकर म्हणाले, ‘‘दोन जण साहाय्यासाठी मिळाले असते, तर बरे झाले असते.’’

त्याच वेळी आम्ही त्यांच्या साहाय्यासाठी आणि ‘मूर्ती कशी घडवायची ?’ ते शिकण्यासाठी लगेच रामनाथी आश्रमातून निघालो. ‘आम्ही दोघे त्यांच्याकडे येण्यासाठी निघालो आहे’, हे कळल्यावर गुरुजींचा भाव जागृत झाला आणि ते म्हणाले, ‘‘माझ्या मनातील सर्व विचार श्री गुरूंना कळतात. त्यांनी माझी हाक लगेच ऐकली.’’ खरेतर त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना कधीच पाहिले नाही, तरीही त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आणि श्रद्धा आहे.

१७ ई २. एका मूर्तीकाराकडे गुरुजींना सिद्धिविनायकाच्या मूर्तीसाठी एक दगड योग्य वाटणे, तो दगड घट्ट असल्याने मूर्तीकार तो फोडून टाकणार असणे; परंतु ‘मला हाच दगड हवा आहे’, असे सांगून गुरुजींनी तो दगड आणणे : आपण गुरुजींना दगडापासून श्री सिद्धिविनायकाची मूर्ती घडवायला सांगितली होती. गुरुजी त्या मूर्तीसाठी कारवार येथील सदाशिवगड येथे एका मूर्तीकाराकडे दगड आणायला गेले होते. तेथे अनेक प्रकारचे दगड होते. त्यांनी तेथील एका दगडाला हात लावल्यावर त्या दगडाची स्पंदने त्यांना श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीसाठी योग्य वाटली. तो दगड घट्ट असल्याने त्यातून मूर्ती बनवू शकणार नाही; म्हणून त्या मूर्तीकाराने तो बाजूला ठेवला होता. तो दगड मूर्ती बनवण्यासाठी योग्य नसल्याने मूर्तीकार तो फोडून टाकणार होता. ‘तेथे असलेले अन्य दगड मूर्तीसाठी योग्य आहेत. त्यांच्यापैकी एक दगड घेऊन जाऊ शकता’, असे त्या मूर्तीकाराने गुरुजींना सांगितले; परंतु गुरुजी त्यांना म्हणाले, ‘‘मला हाच दगड हवा आहे’’ आणि त्यांच्याकडून तो दगड घेऊन आले.

१७ ई ३. दगडाचे वजन अधिक असल्याने एकही ‘टेम्पो’वाला तो दगड नेण्यास सिद्ध नसतांना एकाने ‘देवाची सेवा’ या भावाने तो दगड त्याच्या ‘टेम्पो’तून मूर्ती घडवण्याच्या ठिकाणी पोचवणे : गुरुजींना हवा असणारा दगड मिळाला; पण तेथून तो दगड मूर्ती घडवण्याच्या ठिकाणी नेण्यासाठी एकही ‘टेम्पो’वाला सिद्ध होत नव्हता; कारण त्या दगडाचे वजन ७०० किलो होते. ‘आमची गाडी खराब होईल’, असे म्हणून अनेक ‘टेम्पो’वाल्यांनी तो दगड वाहून नेण्यास नकार दिला. त्यानंतर गुरुजींच्या परिचयाचा एक ‘टेम्पो’वाला तो दगड घेऊन जाण्यास सिद्ध झाला आणि त्याने कोणताही विचार न करता ‘देवाची सेवा आहे’, या विचाराने तो दगड आपल्या गाडीत घालून मूर्ती घडवण्याच्या ठिकाणी आणून दिला.’

– श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार

१७ ई ४. गुरुजींच्या श्री गुरूंनी (श्री बाबा महाराज यांनी) त्यांना स्वप्नात येऊन मूर्तीत सुधारणा करण्यास सांगणे, तेव्हाच एका संतांनीही मूर्तीत आवश्यक असलेल्या सर्व सुधारणा करण्यास सांगणे आणि यावरून गुरुतत्त्व एकच असल्याची अनुभूती येणे : ‘श्री सिद्धिविनायकाची मूर्ती घडवण्याची सेवा चालू असतांना एका रात्री गुरुजींच्या गुरूंनी (श्री बाबा महाराज यांनी) रात्री १२.३० वाजता त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितले, ‘तू जी मूर्ती बनवत आहेस, त्या मूर्तीचे कान लहान-मोठे आहेत.’ त्यांनी इतरही काही सुधारणा करायला सांगितल्या. गुरुजींनी लगेच उठून दिवा चालू करून उशाशी ठेवलेले श्री सिद्धिविनायकाचे संदर्भ चित्र हातात घेऊन पाहिले. तेव्हा ‘श्री गुरूंनी त्यांना सांगितलेल्या सर्व सुधारणा त्यामध्ये कराव्या लागणार होत्या’, असे त्यांच्या लक्षात आले.

श्री. रामानंद परब यांना ते चित्र पाहून ‘मूर्ती घडवतांना त्यात काही सुधारणा करायला हव्यात’, असे वाटत होते. ‘त्या सुधारणा आपण मूर्ती बनवतांना करायच्या का ?’, हे मी एका संतांना विचारायला सांगितले. दुसर्‍या दिवशी आम्ही गुरुजींकडे सेवेसाठी गेल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या गुरूंनी स्वप्नात येऊन मूर्तीत काही सुधारणा करण्यास सांगितल्याचे सांगितले आणि त्याच वेळी संतांचाही निरोप आला, ‘‘मूर्तीत ज्या सुधारणा करणे आवश्यक आहेत, त्या सर्व सुधारणा करायच्या आहेत. आपण त्या सुधारणा केल्या, तर त्या गणेशमूर्तीतील तत्त्व अजून वाढू शकते.’’ तेव्हा गुरुजी म्हणाले, ‘‘माझ्या श्री गुरूंनी जे सांगितले, तेच त्या संतांनीही सांगितले. गुरुतत्त्व कसे एक असते ना ?’’

१८. गुरुजींविषयी आलेली अनुभूती

१८ अ. गुरुजींच्या जागी श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन होणे आणि तेव्हा त्यांनी त्यांचे नाव ‘विवेकानंद’ असल्याचे सांगणे : पहिल्या दिवशी आम्ही त्यांच्या समवेत सेवेसाठी बसलो होतो. त्या वेळी मला त्यांच्या जागी श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन झाले. याविषयी मी सहसाधक श्री. राजू सुतार यांना सांगितले. त्यानंतर १ – २ मिनिटांतच ते आम्हाला म्हणाले, ‘‘माझे खरे नाव ‘विवेकानंद’ आहे. सर्व जण मला ‘नंदा’ असे म्हणतात.’’

एकदा गुरुजी सहज म्हणाले, ‘‘माझे शरीर श्री रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे आहे. त्यांचा एक खांदा लहान आणि एक खांदा मोठा होता. माझेही तसेच आहे आणि त्यांचा जो खांदा मोठा होता, तोच माझाही खांदा मोठा आहे. ’’ हे ऐकल्यावर मला माझ्या वरील सूत्रातील अनुभूतीचा उलगडा झाला.’

– श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२०)

श्री गुरूंच्या आशीर्वादाने जन्म होणे : ‘श्री. नंदा आचारी गुरुजींनी सांगितले, ‘‘माझी आई गरोदर असतांना एकदा तिला संत गाडगेबाबा भेटले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला, ‘‘तुला एक मुलगा होईल. त्याचे चांगले संगोपन कर. त्याचे नाव ‘विवेकानंद’ ठेव. तो इतिहासात नाव कमवेल.’’ त्यानंतर त्यांनी तिला खाण्यासाठी एक फळ दिले. माझा जन्म गुरूंच्या आशीर्वादाने झाला आहे. त्यांनी मला जन्माला घातले आहे, तर ते सांगतील तसे करूया. दत्त संप्रदायाचे पद्मनाभस्वामी हे माझ्या आईचे गुरु होते.’’ – श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार (११.२.२०२०)

गुरुजींनी सांगितलेली काही अमूल्य सूत्रे

१. ‘इतरांना साहाय्य करणे’ हे आपले कर्तव्य आहे.

२. ज्यांना कुणाचा आधार नसतो, त्यांना भगवंताचा आधार असतो.

३. आपण जी कृती करतो, त्यातून आपल्याला आनंद आणि समाधान मिळायला हवे.

४. मनात शंका यायला नको. मनात शंका असल्यास कोणतेच कार्य नीट होत नाही. मनात शंका आल्यास तिचे निरसन करून नंतरच ती कृती करायला हवी, म्हणजे ती कृती भगवंताला अपेक्षित अशी होते.

५. देह आणि आत्मा देवाने बनवला आहे. देवाकडेही एक नोंदवही, म्हणजे संगणक आहे. आपला आत्मा आणि तो संगणक हे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे आपण जी काही कृती करतो, त्याची नोंद देवाकडील संगणकात संरक्षित होते.’

– श्री. नंदा आचारी (१.२.२०२०)

शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) यांची झालेली गुरुभेट आणि त्यांना आलेल्या अनुभूती

१. गुरुभेटीपूर्वीची पार्श्वभूमी

एकदा मी सहज गुरुजींना विचारले, ‘‘तुमच्या जीवनात गुरु कसे आले ?’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटगाव येथे श्री दत्तावतारी सद्गुरु समर्थ श्री बाळकृष्ण महाराज उपाख्य दादा महाराज यांच्या समाधीवर ठेवण्यासाठी मूर्ती बनवायची होती. त्यांच्या भक्तांनी मुंबईमधील एका उत्तम कलाकाराला ती मूर्ती घडवण्याचे काम देण्याचे ठरवले आणि तसे त्यांनी श्री दादा महाराज यांचे उत्तराधिकारी श्री बाबा महाराज यांना सांगितले; पण श्री बाबा महाराज यांनी सुचवले, ‘‘कारवारमध्ये एक विश्वकर्मा आहे. त्याच्याकडून आपण श्री दादा महाराज यांची मूर्ती सिद्ध करवून घेऊ.’’ प्रत्यक्षात त्या वेळी मला श्री बाबा महाराज यांच्याविषयी काहीही ठाऊक नव्हते. त्यापूर्वी मी कधीही श्री बाबा महाराज यांना भेटलो नव्हतो. श्री बाबा महाराज यांनी भक्तमंडळींना सांगितले, ‘‘आपण नमुना म्हणून त्यांच्याकडून विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती सिद्ध करवून घेऊ.’’ त्याप्रमाणे कारवारचे श्री. रामकृष्ण रायकर यांनी पुढाकार घेऊन माझ्याकडून विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती सिद्ध करवून घेतली. ती विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती श्री बाबा महाराज यांना फार आवडली. ती मूर्ती श्री बाबा महाराज यांच्या घराजवळ असलेल्या पिंपळाच्या कट्ट्यावर बसवण्यात आली.

त्यानंतर श्री बाबा महाराज यांनी मला श्री दादा महाराज यांची मूर्ती घडवण्याची संमती दिली. तेव्हा मी दादा महाराज यांची मूर्ती मोठ्या श्रद्धेने बनवली आणि ती घेऊन तिकडे गेलो. त्यानंतर त्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा दिवस ठरवण्यात आला. त्यांच्या बर्‍याच भक्तांच्या मनात ‘आपल्याला मूर्ती बसवण्याची संधी मिळावी’, अशी इच्छा होती; पण श्री बाबा महाराज यांनी ‘मूर्ती मी आणि नंदा (शिल्पकार) बसवणार’, असे सांगितले. मला पुष्कळ आनंद झाला आणि त्यासमवेत ‘आपल्याकडून कुठे चूक तर होणार नाही ना ?’, अशी थोडी भीतीही वाटली.

२. मूर्ती सिद्ध करतांना ती वजनदार वाटणे; मात्र प्रतिष्ठापनेच्या दिवशी श्री बाबा महाराज यांनी मूर्ती उचलण्यास सांगितल्यावर तिचे वजन अल्प जाणवणे

श्री बाबा महाराज यांच्या सांगण्यावरून मूर्ती बसवण्यासाठी मी मोठ्या धैर्याने मूर्ती उचलण्यासाठी पुढे झालो. मूर्ती सिद्ध करतांना मला मूर्ती थोडी वजनदार वाटत होती; परंतु जेव्हा श्री बाबा महाराज यांनी मला श्री दादा महाराज यांची मूर्ती उचलण्यास सांगितले, तेव्हा मला त्या मूर्तीचे वजन एकदम अल्प जाणवले. तेव्हा मला मोठे आश्चर्य वाटले. त्यामुळे ती मूर्ती सहजपणे उचलून समाधीवर ठेवून स्थापन करता आली. यानंतर श्री बाबा महाराज यांनी माझ्याकडून आपल्या आईची मूर्ती करवून घेतली.

३. आलेल्या अनुभूती

३ अ. श्री बाबा महाराज यांच्या घरामागे असलेल्या दत्तस्थानी श्री बाबा महाराज यांनी अनवाणी जाणे, दत्तस्थानी गेल्यावर श्री बाबा महाराज यांनी त्यांच्या पायांकडे पाहायला सांगितल्यावर त्यांच्या पायांत लाकडी पादुका दिसणे, ‘दत्तपादुका अशा असतात’, असे त्यांनी सांगणे आणि घरी परत आल्यावर त्यांच्या पायांत काही नसणे : मी पाटगाव येथे अधूनमधून जायचो आणि श्री बाबा महाराज यांच्या सान्निध्यात एक मास राहायचो. एकदा असेच मी श्री बाबा महाराज यांच्याकडे राहायला गेलो होतो. संध्याकाळ झाली होती. सूर्य संपूर्ण मावळलेला नव्हता. तेव्हा श्री बाबा महाराज यांनी मला आपल्याजवळ बोलावून घेतले आणि म्हणाले, ‘‘आपण जरा खाली जाऊन येऊ.’’ आम्ही दोघे श्री बाबा महाराज यांच्या घरामागे श्री दत्तपादुका आहेत, तेथे गेलो. श्री बाबा महाराज यांनी मला दत्तपादुका दाखवल्या आणि म्हणाले, ‘‘नंदा, माझ्या पायांकडे बघ.’’ मी श्री बाबा महाराज यांच्या पायांकडे बघून पुष्कळ आश्चर्यचकित झालो. आम्ही दोघे घरांतून बाहेर निघालो, तेव्हा आम्हा दोघांच्याही पायांत चपला नव्हत्या; पण जेव्हा श्री बाबा महाराज यांनी मला त्यांच्या पायाकडे बघायला सांगितले, तेव्हा मला त्यांच्या पायात लाकडी पादुका दिसल्या ! नंतर श्री बाबा महाराज यांनी मला सांगितले, ‘‘दत्तपादुका अशा असतात.’’ तेव्हा मला तो मोठा चमत्कार वाटला. मी काही न बोलता गप्प राहिलो. नंतर आम्ही घरी पोचलो. तेव्हा मी पुन्हा श्री बाबा महाराज यांच्या पायांकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या पायांत काही नव्हते !

३ आ. श्री बाबा महाराज यांनी समाधी घेतल्याचे त्यांचे उत्तराधिकारी श्री भाई यांच्याकडून समजणे, ‘श्री बाबा महाराज यांनी स्वप्नात येऊन ‘माझ्या पादुका श्री. नंदा आचारी गुरुजींना दाखवल्या आहेत, तशा पादुका बनवून घ्या’, असे सांगितले आहे’, असे श्री भाई यांनी सांगणे आणि त्याप्रमाणे त्यांना श्री बाबा महाराज यांच्या पादुका बनवून देणे : पुढे काही दिवसांनी श्री बाबा महाराज यांनी समाधी घेतली. ही गोष्ट मला कळली नव्हती; परंतु काही दिवसांनी मला पाटगावहून श्री भाई यांचा भ्रमणभाष आला. श्री भाई हे श्री बाबा महाराज यांचा मुलगा आहे आणि ते आता तेथील उत्तराधिकारी आहेत. श्री भाई यांनी मला सांगितले, ‘‘श्री बाबा महाराज आता नाहीत; परंतु त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितले, ‘माझ्या पादुका तुम्ही श्री. नंदा आचारी (गुरुजी) यांच्याकडून करवून घ्या; कारण मी त्यांना माझ्या पादुका दाखवल्या आहेत.’’ हे ऐकून मी फार चकित झालो. त्यानंतर मी स्वतः बघितल्याप्रमाणे श्री बाबा महाराज यांच्या पादुका त्यांना बनवून दिल्या.

तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘श्री दादा महाराज हे श्री साईबाबांचे परम मित्र होते. श्री बाबा महाराज हे पाटगावहून साईबाबांसाठी कफनी पाठवून देत असत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुरुपरंपराही श्री साईबाबांचीच आहे.’

– श्री. रामानंद परब, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक