मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्‍याकडून उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकार्‍याचा विनयभंग !

आरोपीच्या निलंबनाची भाजपची मागणी

मुंबई – येथील मंत्रालयाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍याने संबंधित विभागात काम करणार्‍या उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकार्‍याचा विनयभंग केला आहे. आरोपी अधिकार्‍याने ‘मला कंटाळा आला आहे. माझ्यासाठी गाणे म्हण’, अशी मागणी पीडित महिला अधिकार्‍याकडे केली होती. हा प्रकार आरोपी अधिकार्‍याच्या कक्षातच घडला. या वेळी विभागाचे उपसचिवही तेथे उपस्थित होते. या प्रकरणी पीडित महिला अधिकार्‍याने संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे लेखी तक्रार प्रविष्ट केली आहे. विधिमंडळाच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी पीडित महिला अधिकार्‍याशी भ्रमणभाषवरून चर्चा केली. यानंतर त्यांनी ‘संबंधित आरोपी अधिकार्‍याची तात्काळ चौकशी करून त्याला निलंबित करण्याचा आदेश द्यावा’, अशी मागणी विभागाच्या मंत्र्यांकडे केली. ‘मुली आणि महिला यांचा विनयभंग करणार्‍या अन् त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पहाणार्‍यांची गय केली जाणार नाही’, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

संपादकीय भूमिका 

मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वासनांध वृत्तीचे अधिकारी असणे राज्यासाठी लज्जास्पद !