हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावी !

भोर आणि मंचर येथील हिंदुत्वनिष्ठांची तहसीलारांकडे निवेदनाद्वारे मागणी !

पुणे, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त  राबवण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाच्या अंतर्गत येथे विविध उपक्रम घेण्यात आले. येथील भोर तालुक्यात हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्यात आली. त्या वेळी हलालमुक्त दिवाळी साजरी करणे आणि शासनाला निवेदन देणे यांविषयी निश्चय करण्यात आला. भोर येथील प्रांताधिकारी सचिन कचरे आणि तहसीलदार सचिन पाटील यांना हिंदु जनजागृती समिती, हलाल सक्ती विरोधी कृती समिती, भोर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भोर अन् रवी सोहम् दत्त फौंडेशन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्था’ तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. असेच निवेदन मंचर येथेही देण्यात आले.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री गणेश बांदल, गौरव शेडगे, सचिन वीर, प्रतापगड उत्सव समितीचे श्री. विनायककाका सणस, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भोर तालुकाचे अध्यक्ष श्री. अमर बुदगुडे, वीररत्न श्री बाजीप्रभु देशपांडे यांचे ११ वे वंशज श्री. संदेश देशपांडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वजित चव्हाण, प्रा. श्रीकांत बोराटे, खाटिक समाजाचे श्री. संतोष गायकवाड, श्री. नीलेश घोणे आणि हलाल कृती विरोधी समितीचे श्री. पांडुरंग पाटील, कु. शिवप्रसाद बेडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व हिंदुत्वनिष्ठांनी आंबेगाव तालुका तहसीलदार मा. रमा जोशी यांना हलालविषयी निवेदन दिले. या वेळी भाजपचे माननीय श्री. भानुदास (नाना) काळे, महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे श्री. बाळासाहेब चासकर, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. अनिल बुवा काळे, बजरंग दल यांचे श्री. सुमित दिवेकर, श्री. सुशांत काळे आणि कार्यकर्ते श्री. नवनाथ काळे, उद्योजक श्री. मोरेश्वर शेटे, श्रीकांत शेटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.