भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) पुरोगामित्व आणि नरबळी !

‘केरळमधील पथानामथिट्टामध्ये रोसलीन आणि पद्मा या दोघींची नुकतीच अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. आर्थिक संपन्नतेसाठी या दोघींचा नरबळी देण्यात आला. या भयंकर हत्याकांडाचे सूत्रधार महंमद शफी, भगवल सिंह आणि त्याची पत्नी लैला हे आहेत. भगवल आणि लैला दोघेही भारतीय कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्षाचे (मार्क्सवादी) कट्टर कार्यकर्ते आहेत. या घटनेची भयानकता पहाता अंधश्रद्धा, केरळ आणि भाकप यांच्याविषयी काही प्रश्न आपुसकच उपस्थित होतात. त्याचाच या लेखात घेतलेला मागोवा…

१. केरळमध्ये धर्मांधाच्या सांगण्यावरून दोन महिलांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात येणे

‘केरळमधील पथानामथिट्टामध्ये रोसलिन आणि पद्मा या दोघींची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आर्थिक संपन्नता येण्यासाठी या दोघींचा नरबळी देण्यात आला. रोसलिन हिचा गळा चिरण्यात आला आणि तिच्या गुप्तांगामध्ये शस्त्र खुपसण्यात आले. एवढेच नाही, तर मृत्यूनंतर तिचे स्तनही कापण्यात आले. पद्माचे तर हातपाय बांधून ती अर्धवट बेशुद्धावस्थेत असतांनाच तिच्या शरिराचे ५६ तुकडे करण्यात आले. दोघींनाही भयंकर यातना दिल्या गेल्या. या अत्यंत हिडीस आणि भयंकर हत्याकांडाचा सूत्रधार महंमद शफी हा आहे. त्याच्या सांगण्यानुसार भगवल सिंह (वय ६८ वर्षे) आणि त्याची पत्नी लैला (वय ५९ वर्षे) या दोघांनी  या २ महिलांची विकृतपणे हत्या केली. या सगळ्या घटनेने केवळ केरळच नव्हे, तर संपूर्ण देश हादरला आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) अंतरंगही यानिमित्ताने उघडे पडले आहे.

२. दोन महिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या होऊनही सर्व पुरोगामी, निधर्मी आणि  शाहीनबागसदृश्य आंदोलनकारी गप्प असणे

भगवल सिंंह हा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) पक्षाचा कट्टर स्थानिक नेता आहे. तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक शाखा सचिव पदावरही कार्यरत होता. सध्या तो केरळ राज्य ‘कार्शका थोझिलाली संघ पंचायत समिती’चा अध्यक्ष आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्याने तेथील बूथ क्र. १४२ वर ‘एल्.डी.एफ्.’चा (लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट – डाव्या लोकशाही आघाडीचा) एजंट (दलाल) म्हणून कामही केले आहे. त्याची पत्नी लैलाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कार्यकर्ती आहे. केरळमध्ये सध्या मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या नेतृत्वात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे. हा पक्ष स्वतःला अत्यंत पुरोगामी आणि प्रगतीशील दृष्टीकोन असलेला अन् मानवतावादी असल्याचे समजतो.

आपल्या महाराष्ट्रात या पक्षाला आडून समर्थन देणारी ‘डफली गँग’ही स्वतःला मानवतावादी पुरोगामी समजते. भाजपशासित राज्यात जरा काही खुट्ट झाले की, ही टोळी आणि भाकपचे राष्ट्रीय पातळीवरील तथाकथित नेते लागलीच ‘भाजपशासित राज्यात कशी असहिष्णुता आहे, जंगलराज आहे, तेथे माणसाला रहाण्याजोगे वातावरण नाही’, हे सांगायला पुढे सरसावतात. जेव्हा उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये निष्पाप मुलीचा मृत्यू झाला होता, तेव्हा नि:ष्पक्ष वार्तांकन आणि जनजागृतीसाठी ‘पी.एफ्.आय.’चा (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा) हस्तक म्हणून संशयित असलेला  कप्पन सिद्दीकी हा केरळमधून हाथरसला गेला होता. आज त्याच भाकपशासित केरळमध्ये मानवतेलाच कलंक फासणारे हत्याकांड घडले; परंतु त्यावर सर्व पुरोगामी, निधर्मी आणि अन्याय-अत्याचाराविरोधातील लढाईचे ठेकेदार असल्याच्या अविभार्वात वावरणारे सगळे शाहीनबागसदृश्य आंदोलनकारी गप्प आहेत ! रोसलीन आणि पद्मा काय मनुष्य नव्हत्या ? कि त्यांची विकृतपणे हत्या करणारा भगवल सिंह आणि लैला हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे कार्यकर्ते आहेत; म्हणून सगळे तोंडात मूग गिळून बसले आहेत? कि या दोघांनाही असले राक्षसी कृत्य करण्यास प्रवृत्त करणार्‍याचे नाव महंमद शफी आहे; म्हणून हे निधर्मी गप्पगार झाले आहेत ? जे काही आहे, ते सगळे संतापजनक आहे, हे निश्चित !

३. आरोपी महंमद शफी याने फेसबुकवरील बनावट (खोट्या) खात्याच्या माध्यमातून सहआरोपी आणि मृतक यांना जाळ्यात ओढणे 

योगिता साळवी

अ. सूत्र असे की, या दोघींची हत्या ज्या प्रकारे झाली, त्याने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या घटनेची कारणमीमांसा करतांना जे जे काही समोर येते, त्याचेही अनेक पैलू आहेत आणि तेही तितकेच भयंकर आहेत. भगवल सिंह आणि लैला हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते. भगवल हा आयुर्वेद चिकित्सक आणि डॉक्टर अशीही उपाधी लावायचा. भगवल आणि लैला यांची आर्थिक परिस्थिती तितकीशी वाईट नसणारच; पण तरीही त्यांना आणखीन पैसे हवे होते. या क्रूर गुन्ह्याचा सूत्रधार महंमद शफी याची फेसबुकच्या माध्यमातून भगवल सिंहशी मैत्री झाली. त्यामागेही एक चक्रावून टाकणारी घटना आहे. या घटनेमुळे फेसबुक आणि इतर समाजमाध्यमे यांच्या माध्यमातून मैत्री अन् पुढचे सर्व क्रियाकर्म उरकणार्‍यांनी काही तरी शिकावे, अशी किमान अपेक्षा आहे.

आ. महंमद शफी याने फेसबुकवर श्रीदेवी या नावाने खाते उघडले. ३ वर्षांपूर्वी या खात्याच्या माध्यमातून त्याचे भगवल सिंहशी सूत जुळले. भगवल सिंह महंमद शफी याला श्रीदेवी समजून स्वतःची सुख-दुःखे सांगू लागला. श्रीदेवी उपाख्य महंमद शफीने सांगितले, ‘‘ती अशा एका व्यक्तीला ओळखते, जो जादूटोणा करून भगवल सिंहची आर्थिक तंगी दूर करू शकेल.’’ श्रीदेवीने महंमद शफीशी, म्हणजे स्वतःशीच भगवल सिंहशी प्रत्यक्ष भेट करून दिली. महंमद  शफीने भगवल आणि लैला यांना सांगितले, ‘‘नरबळी दिला, तर देव प्रसन्न होईल आणि भगवलच्या घरी संपत्ती येईल.’’ नरबळी मिळवून देण्यासाठी स्वत: शफीने पुढाकार घेतला.

४. महंमद शफीने पैशाचे प्रलोभन देऊन रोसलीन आणि पद्मा यांना जाळ्यात ओढणे  

आरोपी महंमद शफी याने रोसलीन आणि पद्मा या दोघींना कसे संपर्कात आणले, याविषयी प्रसारमाध्यमांमधून जे समोर आले त्यानुसार एकीला अश्लील चित्रपटात काम देण्याचे, तर दुसरीला देहविक्रीतून १५ सहस्र रुपये देण्याचे प्रलोभन दाखवले. अशा प्रकारची प्रलोभने देऊन महंमद शफी याने या दोघींना जाळ्यात ओढले होते. महंमद शफी फेसबुकच्या माध्यमातूनच रोसलीन आणि पद्मा यांच्या संपर्कात आला. या दोघी रस्त्यावर लॉटरीची तिकिटे विकायच्या. दोघींचेही वय ५० वर्षांच्या पुढे होते; पण त्यांचा फेसबुकवर महंमद शफीशी संपर्क झाला. प्रलोभनामुळे रोसलीन जून अणि पद्मा सप्टेंबरमध्ये शफीच्या जाळ्यात अडकल्या.

५. अनोळखी शफीशी फेसबुकवरील मैत्री रोसलिन आणि पद्मा यांच्या जिवावर बेतली !   

आधीच शफी हा एक विकृत गुन्हेगार होता. वर्ष २०२० मध्ये ७५ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करून तिच्या गुप्तांगावर शस्त्राने आक्रमण केल्याप्रकरणी त्याला कारावास झाला होता. प्रसारमाध्यमांतील एका बातमीनुसार हा शफी लवकर संपत्ती मिळण्यासाठी भगवलच्या समोरच त्याच्या पत्नीशी, म्हणजे लैलाशी लैंगिक संबंध ठेवायचा. ‘नरबळी देतांना रोसलिनला अधिक यातना दिल्या नाहीत; म्हणून देव प्रसन्न झाला नाही’, असे शफीने भगवलला सांगितले होते. त्यावरही त्याचा विश्वास बसला. त्यामुळे पद्माची हत्या अत्यंत भयानक यातना देऊन करण्यात आली. तिच्या शरिराचे तुकडे करण्यात आलेच; पण नराधमांनी अवयवही खाल्ले ! जर रोसलीन आणि पद्मा या महिलांनी आभासी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनोळखी शफीवर विश्वास ठेवला नसता, तर त्या आज जिवंत असत्या.

सध्या बहुसंख्य लोक त्यांच्या जवळ दृश्यमानाने असणार्‍या नातेवाइकांपेक्षा आभासी स्वरूपाच्या प्रसारमाध्यमांतून अनोळखी लोकांशी संवाद साधण्यात मग्न असतात. ज्या व्यक्तीविषयी त्यांना शून्य माहिती असते, त्या व्यक्तीसमोर स्वत:चे भावविश्व उघड करतात. रोसलिन आणि पद्मा यांच्या भयानक मृत्यूतून तरी समाजाने धडा घेणे आवश्यक आहे.

६. एका दुसर्‍या घटनेत महिलेने एका बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न करणे 

या घटनेने देश हादरला असतांनाच या घटनेच्या २-३ दिवसांनंतर पुन्हा केरळच्या या पथानामथिट्टामध्ये दुसरी घटना घडली. गुन्हेगार शोभना उपाख्य वसंता हिच्यावर पोलीसही कारवाई करायला कचरत होते. पोलीस तिच्यावर कारवाई करायला का घाबरत होते, तर शोभना हिने अंधश्रद्धेतून एका बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला. त्याचा बळी घेण्याआधी ती विचित्र हातवारे करत असल्यामुळे मुलगा भेदरला आणि आरडाओरडा करू लागला. त्या आवाजाने लोक जमा झाले. यापूर्वी कुणी तिच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला नव्हता; कारण जो कुणी तिच्या विरोधात जाईल, त्याला ती शाप देईल, अशी सर्वांमध्ये भीती होती. त्यामुळे पूर्वी कुणीही तिच्या विरोधात गेले नाही. आता मात्र तिने एका चिमुकल्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने लोक संतापले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीसही तिच्यावर कारवाई करायला धजावत नव्हते; कारण त्यांनाही भीती वाटत होती की, त्यांनी कारवाई केली आणि शोभनाने शाप दिला तर ? शेवटी लोकांच्या आंदोलनामुळे पोलिसांना तिला अटक करावी लागली.

७. केरळमध्ये नृशंस हत्या होत असतांना काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना त्याची गंधवार्ताही नसणे 

येथे आणखीन एक नमूद करावेसे वाटते की, जेव्हा या घटना घडत होत्या, तेव्हा काँग्रेसचे नेते आणि केरळच्या वायनाड जिल्ह्याचे खासदार राहुल गांधी हे ‘भारत जोडो’ यात्रा करत होते. केरळमधील अनेक अबालवृद्ध स्त्रिया त्यांना भेटत होत्या. राहुल गांधी किंवा त्यांच्या यात्रेत सहभागी असलेल्यांना केरळमधील या काळ्या जादूचा गंभीर प्रश्न कुणीही सांगितला नसेल का? कारण याच यात्रेदरम्यान केरळमध्ये हे क्रूर हत्याकांड घडत होते. राहुल यांनाच नाही, तर केरळचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन्, त्यांच्या पक्षाचे नेते किंवा स्थानिक कार्यकर्ते यांपैकी कुणालाच केरळमधील या अंधश्रद्धेविषयी कधीच माहिती मिळाली नाही का ? असा प्रश्न पडतो.

८. धार्मिकतेच्या प्रभावामुळे आरोपींनी हत्या घडवल्याचे मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगणे

धर्म आणि अधर्म यांची सीमारेषा मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तर केव्हाच ओलांडली आहे. केरळमध्ये प्रतिवर्षी रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या अशाच क्रूर हत्यांचे सत्र अजूनही कायम आहे. त्यात भाकपचे कार्यकर्ते-पदाधिकारी गुन्हेगार असल्याचेही निष्पन्न होते; पण त्याची खंत किंवा लाज या मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कधीही व्यक्त केली नाही आणि त्यांची पिलावळही मौनच बाळगत आली. तेच आता केरळच्या या विकृत हत्याकांडाविषयी होतांना दिसते. विकृत भयानक हत्याकांडाविषयी मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते पी.आर्. प्रदीप यांनी काय प्रतिक्रिया द्यावी ? या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे, ‘‘भगवल सिंह हा पक्षाचा कार्यकर्ता होता आणि त्याच्यासमवेत आम्ही पक्षाचे कार्यक्रमही केले; पण तो पूर्वी पुरोगामी होता आणि दुसरा विवाह केल्यानंतर तो धार्मिक झाला. कदाचित् हा त्याच्या पत्नीचा प्रभाव असेल.’’ आता काय म्हणावे ? म्हणजे पी.आर्. प्रदीप या मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रवक्त्याने, म्हणजे पर्यायाने मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे म्हणणे असे आहे की, भगवल सिंह याने रोसलीन आणि पद्माचा क्रूर यातना देऊन नरबळी दिला; कारण भगवल सिंह धार्मिक झाला होता. तसे असेल, तर भगवलची दुसरी पत्नी लैला हीसुद्धा या पक्षाची सक्रीय कार्यकर्तीच होती. धार्मिक आणि अधार्मिक याचा अर्थ तरी या पक्षाच्या प्रवक्त्याला आणि खुद्द पक्षाला माहिती आहे का? केरळमधील हे हत्याकांड, कोट्यवधी धार्मिक लोकांच्या श्रद्धा आणि धर्मसंवेदना विचार यांचा अपमान करणारा प्रवक्ता अन् त्याचा पक्ष यांचा निषेध करावा, तेवढा थोडाच !

९. १०० टक्के साक्षर असलेल्या केरळमध्ये अंधश्रद्धेचा थयथयाट पहायला मिळणे, हे दुर्दैव !

वर्ष २०१८ मध्ये केरळमध्ये असाच भयावह प्रसंग घडला होता. इडुक्की येथे कृष्णन्, त्याची पत्नी सुशीला आणि त्यांची २ अपत्ये यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. कृष्णन् हा परिसरात जादूटोणा किंवा काळी जादू वगैरे करणारा म्हणून प्रसिद्ध होता. या सगळ्या माध्यमातून त्याने पुष्कळ पैसेही जमवले होते. कृष्णन्कडे अनिष नावाचा व्यक्ती कामाला होता. त्याच्या अंधश्रद्धा तंत्रमंत्रामध्ये तो पडेल ते काम करायचा. अनिषला वाटायचे की, कृष्णन्ला मारून टाकले, तर त्याची शक्ती स्वतःला मिळेल आणि तोही कृष्णन् सारखाच काळ्या जादूचा शक्तीमान अन् श्रीमंत होईल. त्याने कृष्णन्ची हत्या केली. हत्या करतांना पाहिले; म्हणून त्याने कृष्णन्च्या पत्नीचा, मुलीचा, तसेच गतिमंद मुलाचीही हत्या केली. काय म्हणावे या अंधश्रद्धेला अन् अपसमजाला ? १०० टक्के साक्षर अन् पुरोगामित्वाचे गोंदणच भाळी आहे, असा अविर्भाव असलेल्या केरळमध्ये अशा घटना घडणे, हे दुर्दैव आहे.

१०. जगभरात अंधश्रद्धेचा भयानक पगडा !

अंधश्रद्धा ही केवळ केरळमध्येच आहे का ? देशभरात अशा जादूटोण्यामुळे वर्षाला शंभरच्या आसपास लोक मृत्यूमुखी पडतात. जगभरात अंधश्रद्धेचा भयावह पगडा आहे. मागे एक बातमी वाचली होती की, कॅथॉलिक समुदायाच्या मागणीनुसार व्हॅटिकन चर्चने एक अभ्यासक्रम चालू केला. ५० देशांतील २५० पाद्री २४ सहस्र रुपये शुल्क भरून जादूटोणा शिकण्यासाठी रोमला गेले होते. या अभ्यासक्रमाचे नाव आहे, ‘एंटाईटल्ड एक्सॉर्सिजम् अँड द प्रेयर ऑफ लिबरेशन.’ हा कोर्स वर्ष २००५ मध्ये चालू झाला. या अभ्यासक्रमात म्हणे जादुटोण्याचे धार्मिक, मनोवैज्ञानिक आणि मानवशास्त्रीय आयाम शिकवले जातात. खरेखोटे  देवच जाणो ! याच जादूटोण्याविषयी संयुक्त राष्ट्रांकडून एक विधान केले गेले. संयुक्त राष्ट्राने म्हटले, ‘नायजेरियातील गरीब महिलांना देहविक्रीसाठी पाश्चात्त्य देशांमध्ये नेले जाते. या महिलांनी देहविक्री स्वखुशीने करावी; म्हणून त्यांच्यावर जादूटोणा झाला असल्याचे भासवले जाते.’ दुसरीकडे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या तिसर्‍या पत्नी बुशरा बीबी आणि तिने पाळलेला जीनच इम्रान यांना सातत्याने यश देत होता, हे बहुसंख्य पाकिस्तानी शपथेवर सांगतात.’

– योगिता साळवी

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, १५.१०.२०२२)