कोल्हापूर शहरात युवकांच्या विविध गटांकडून गडांच्या हुबेहूब प्रतिकृतींद्वारे इतिहास जागवण्याचा प्रयत्न !

‘हिंदवी ग्रुप’ संघटनेच्या वतीने साकारण्यात आलेला मोरा-मुल्हेर आणि हरगड यांची प्रतिकृती

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास आजही गड-दुर्गांच्या रूपाने आपल्यासमोर आहे. हा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी कोल्हापूर शहरात विविध गटांकडून, तसेच काही वैयक्तिक स्तरावर गडांच्या हुबेहूब प्रतिकृतीद्वारे इतिहास जागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे आताच्या तरुण पिढीला गडांची माहिती मिळण्यास साहाय्य होत आहे.

विजेता तरुण मंडळाने गडाच्या प्रतिकृतीच्या ठिकाणी ठेवलेल्या तोफा, तसेच शिवकालीन शस्त्रे यांचे प्रदर्शन

१. कबसा बावडा येथील पोवार मळा येथील विजेता तरुण मंडळाने सुधागड आणि सरसगड यांची प्रतिकृती साकारली आहे. या ठिकाणी शिवकालीन तोफा, गडदुर्गांसाठी वापरण्यात आलेले शिवकालीन दगड, शस्त्रे यांचेही प्रदर्शन लावण्यात आले आहे.

विजेता तरुण मंडळाने साकारलेली सुधागड, सरसगड यांची प्रतिकृती

या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष श्री. पंकज पोवार म्हणाले, ‘‘गेल्या १२ वर्षांपासून आम्ही विविध गडांच्या प्रतिकृती बनवत आहोत. आतापर्यंत आम्ही पुरंदर, लोहगड, वल्लभगड, कलानिधीगड, सिंहगड यांसह अनेक गडांच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. आम्ही गड साकारण्यापूर्वी प्रथम तो प्रत्यक्ष पाहून येतो आणि नंतर साकारतो. गड साकारतांना आम्ही केवळ मातीचाच उपयोग करतो. सायंकाळी या प्रतिकृतीसमोर आम्ही मावळ्यांचा वेष घालून उपस्थित असतो, तसेच प्रतिकृतीरूपी तोफ उडवतो. गडांच्या व्यतिरिक्त आम्ही वर्षभर शिवजयंतीला रक्तदान मोहीम, गडस्वच्छता असे उपक्रमही राबवतो. माझ्यासमवेत सर्वश्री ओंकार पोवार, तन्मय पोवार, अथर्व पोवार यांसह २५ हून अधिक कार्यकर्त्यांचा चमू यांत सहभागी असतो.’’

२. ‘हिंदवी ग्रुप’ संघटनेच्या वतीने विचारेमळा, कदमवाडी येथे मोरा-मुल्हेर आणि हरगड यांची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या ठिकाणी गडांची संपूर्ण माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे.