‘एक देश, एक पोलीस गणवेश’, यावर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांनी चर्चा करावी ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

पंतप्रधान मोदी

नवी देहली – ‘एक देश, एक पोलीस गणवेश’ या संकल्पनेवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांनी चर्चा करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करतांना बोलत होते. ऑनलाईन चिंतन शिबिरात ८ राज्यांचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यासमवेत १६ राज्यांचे उपमुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. या शिबिरात पोलीस दलाचे आधुनिकीकरण, सायबर गुन्ह्यांचे व्यवस्थापन, न्याय व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर, भू-सीमा व्यवस्थापन, किनारी सुरक्षा, महिला सुरक्षा, अंमली पदार्थांची तस्करी आदी विषयांवर चर्चा केली जात आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था एखाद्या राज्यापुरती मर्यादित नाही; कारण गुन्हेगारी आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढत आहे. यामुळे राज्य आणि केंद्र यांतील यंत्रणांनी समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत या सूत्रावर पोलीस आणि केंद्रीय संस्था यांच्याकडून समान प्रतिसाद मिळत नाही आणि याविरोधात लढण्यासाठी ते एकत्र येणार नाहीत, तोपर्यंत या समस्येला तोंड देणे अशक्य आहे, असे त्यांनी नमुद केले. दोन दिवसीय हे शिबीर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे.